लंडनवासियांना घेरतेय जगण्याची असुरक्षितता

London Terror Attack
London Terror Attack

ब्रिटनच्या संसदेसमोर 22 मार्चला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यासह चारजण ठार झाले. या हल्ल्याने लंडन हादरले. लंडनमधील मराठी नागरीक अश्विनी काळसेकर यांनी हल्ल्यानंतर सामान्य लोकांच्या मनामध्ये उमटलेल्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

हल्ल्याची माहिती समजल्यावर लोकांची पहिली प्रतिक्रिया होती, ती ब्रिटनवर का व्हावा हल्ला? खरं सांगायचं, तर 'ब्रेक्झिट'मधून ब्रिटीश नागरीक पूर्णतः सावरलेले नाहीत. आतापर्यंतचे अतिरेकी हल्ले करणारे मुस्लिम असल्यामुळे ताज्या हल्ल्यानंतर मुस्लिम नागरीक सर्वाधिक धोक्यात येत आहेत. हा काही इतर नागरीकांचा दोष नाही; तथापि तशी सार्वत्रिक भावना बनते आहे, हे निश्चित. 'ब्राऊन' कातडीचे सर्वच नागरीक मुस्लिम द्वेषाची शिकार बनू शकतात.

इथल्या स्थानिक आणि अन्य देशातील नागरीकांशी बोलताना हल्ल्याचे वेगवेगळे परिणाम समजतात. उदाहरणार्थ, एका गृहस्थाला त्याच्या गर्भवती पत्नीची काळजी वाटते आहे. हल्ल्यानंतर त्याच्या सासूचा व्हिसा मंजूर होईल की नाही, याबद्दल त्याला शंका आहे. एका व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह्य लिखाण फेसबूकवर पोस्ट केले.

अशा स्वरुपाच्या घटना या मुलतः मानवेतवर हल्ले असतात, असं मला वाटतं. एखादा धर्म बदलून अथवा व्यवस्था बदलून हल्ल्यांचे प्रश्न सुटतील, असं काही नाही. मला वाटतं, आपण मानसिकतेमध्ये मुलभूत बदल घडवायला हवेत.

संसदेसमोरील हल्ल्यात एका पोलीसाला प्राण गमवावे लागले. दोन नागरीक अकारण बळी गेले. ही घटना घडत होती, त्या ठिकाणापासून मी दहा मिनिटांच्या अंतरावर ट्रेनमध्ये होते. वेस्टमिन्स्टर ब्रिजवर दहशतवादी हल्ला झाला आणि मी साऊथ बँक सेंटरजवळ होते. आमच्या आगामी प्रोजेक्टबद्दल एका मित्राशी बोलत होते. तो थिएटर आर्टिस्ट आहे. हल्ल्याची माहिती समजताच क्षणात वातावरण बदलले. ट्रेनमधून प्रवास करणारे नागरीक अस्वस्थ होते. प्रत्येकाला घरी लगेच पोहोचायची घाई झाली होती. वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळी वेशभुषा परीधान करणारे आणि जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या नागरीकांमध्ये केवळ एकच घटक सामाईक होता, आणि तो म्हणे जगण्याची सुरक्षितता.

हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मरण पावलेल्यांसाठी मी प्रार्थना करते आहे. आपल्या रोजच्या जगण्यातली हरवत चाललेली सुरक्षितता कदाचित एखाद दिवशी परत मिळेल...माझी इतकीच अपेक्षा आहे.

लेखिकेबद्दल :
इंग्लंडच्या कलाक्षेत्रात जी काही मोजकी मराठी नावे आहेत, त्यामध्ये अश्विनी काळसेकर यांचा समावेश होतो. त्या कथ्थक नृत्यांगना आहेत. आर्टस् कौन्सिल ऑफ इंग्लंड, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, आयर्लंड फिल्म फेस्टिवल आदी नामांकित संस्थांमध्ये कथ्थक सादर केले आहे. त्या मुळच्या नाशिकच्या. पुणे विद्यापीठातून कथ्थकमध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. गेली पंधरा वर्षे त्या इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत. तेथे कला सादर करण्याबरोबरच त्या कथ्थकचे प्रशिक्षणही देतात.
- टीम ई सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com