आयुर्वेदाला राष्ट्रवादाचा दर्प

Ayurveda
Ayurveda

आयुर्वेदामुळे राष्ट्रवादाला खतपाणी मिळते एवढेच नसून त्यामुळे राष्ट्रवाद फोफावतो असा निष्कर्ष अमेरिकेतील पिटसबर्ग विद्यापीठातील मानववंश शास्त्राचे प्राध्यापक जोसेफ आल्टर यांनी संशोधनपर लेखात काढला आहे (बॉडी अँड सोसायटी जर्नल 14 मार्च 2014, पुनर्मुद्रित 2015, 21(1) पृष्ठ 3-28). ‘निसर्गोपचार आणि आयुर्वेद: राष्ट्रवाद, दैहिक एकजीवता (व्हिसेराल) आणि जैविक पर्यावरण (बायो इकॉलॉजि)’ या शीर्षकाचा लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. http://bod.sagepub.com/content/21/1/3.full

राष्ट्रवाद हा पूर्णपणे तर्क विरोधी आहे आणि अशा राष्ट्रवादाला आयुर्वेद बळ देतो असा लेखकाचा दावा आहे. शाब्दिक कोलांट्या, वैचारिक गोंधळ, दुर्बोधता वृद्धिंगत व्हावी यासाठीच जणू लिहिली असावीत अशी लांबलचक वाक्ये, आयुर्वेदाचा राष्ट्रवादाशी जोडलेला बादरायणी संबंध, निसर्गोपचाराची (तो यूरोपीय म्हणून?) भलावण आणि आयुर्वेदावर आसूड असे लेखाचे एकंदरीत स्वरूप वाचल्यावर लक्षात येईल.

निसर्गोपचार जर्मनी मध्ये शोधला गेला व तेथे प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तका मुळे महात्मा गांधीना व त्यांच्यामुळे उर्वरित भारताला त्याची ओळख झाली असे ते सांगतात.

काही महिन्यापूर्वी कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथील विद्यापीठात त्यांच्या वरील लेखावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होती. आयुर्वेद, योग आणि भारतीय तत्वज्ञान याचा व्यासंग असल्यामुळे मी उपस्थित होतो. विविध विषयातील सुमारे 20 संशोधकामध्ये मी आणि एक महिला असे दोनच मूळचे भारतीय होते. चर्चासत्राच्या नंतर दोन दिवस ख्रिस्ती योगावर शिबीर होते.

लेखाबाबतचे अनेक प्रश्न मी जर्नल च्या संपादकांना कळविले आहेत आणि काही वरील चर्चासत्रात उपस्थित केले. त्यातील मोजके खाली देत आहेः

निसर्गोपचार आणि आयुर्वेद पद्धती या वरवर पाहता सारख्याच वाटत असल्या तरी निसर्गोपचार हा वैश्विक आहे परंतु धार्मिक मूलतत्त्ववाद, सरकारी धोरण, आणि व्यापारिक दृष्टिकोनात अडकल्याने आयुर्वेद हा केवळ एक रूढीवादी विचार राहिला आहे असा उल्लेख लेखात आहे. आयुर्वेदामुळे राष्ट्रवाद जोपासला जातो एवढेच नव्हे तर त्यामुळे त्याला प्रोत्साहनही मिळते हा निष्कर्ष भारतातील निसर्गोपचार केंद्रातून जमविलेल्या माहिती आधारे काढला असा उल्लेख आहे. पण तुलना जर दोन पद्धतींची आहे तर आयुर्वेदाचे तज्ज्ञ, प्राध्यापक, रुग्णालयातील रुग्ण यांच्या कडून माहिती गोळा केली का आणि नसल्यास का नाही याचा उल्लेख लेखात असायला हवा होता. त्यामुळे शोध लेखात पुरावा गोळा करण्यासाठीची जी पथ्ये पाळावी लागतात ती पाळली गेली नसावीत अशी शंका वाचकांना येऊ शकेल.

शरीर आणि पर्यावरणीय घटकांच्या (पंचमहाभूते - पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) परस्पर संबंधांची जाणीव मध्यमवर्गीय भारतीयांना, निसर्गोपचार या युरोपियन पद्धतीची विसाव्या शतकात ओळख झाल्यावर, सुरवातीला साम्राज्यवादी शक्ती विरोधात व तदनंतर राष्ट्रवादामुळे झाली असे लेखात म्हटले आहे. पण नंतरच्या परिच्छेदात सांख्य तत्वज्ञानातील महाभूतांशी जर्मनीत उगमपावलेला निसर्गोपचार सुसंगत आहे तितका आयुर्वेद नाही असे अभिप्रेत आहे. आयुर्वेदाच्या राष्ट्रवादी विचारसरणीमुळेच भारतातही आयुर्वेदा ऐवजी निसर्गोपचारच अधिक लोकप्रिय झाला आहे असा दावा लेखात केला आहे. मात्र या विधानाला आधार कोणता, लोकप्रियता कशी मोजली याचा लेखात उल्लेख नाही. निसर्गोपचाराचे आयुर्वेदाशी वितुष्ट नाही पण निसर्गोपचारामुळेच शरीर आणि पंचमहाभूतांच्या संबंधाची दैहिक जाणीव टिकून आहे मात्र राष्ट्रवादाच्या गर्तेत सापडल्याने आयुर्वेद अशी जाणीव निर्माण करण्यास असमर्थ आहे असे विधान लेखात केले आहे.. 

लेखात पंचकर्म या आयुर्वेदीय उपचार पद्धतीमधील महत्वाच्या घटकांबद्दल कोठेच उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटते. यावर प्रा आल्टर यांनी उपस्थितांना पंचकर्मा बद्दल सविस्तर माहिती दिली आणि लेखात त्याचा अंतर्भाव हवा होता असे सांगितले.

निसर्गोपचार पद्धत जर्मनीमध्ये शोधली गेली असा दावा लेखात आहे. निसर्गोपचार पद्धतीचे उपवास हे अत्यंत महत्वाचे अंग आहे. उपवास तर धार्मिक परंपरेने (उदा.एकादशी, संकष्टी) कित्येक वर्षे भारतीय लोक करीत आहेत. उपवासाला धार्मिक गोष्टींची जोड दिली गेली तशी ती जर्मनीत दिली गेली नसावी पण त्यामुळे सगळा निसर्गोपचारच जर्मन शोध कसा ठरतो? पोट बिघडले कि भारतीय लंघन करतात, सर्दी खोकला झाला कि गवती चहा, तुळशीचा किंवा अडुळशाच्या काढा असे अनेक घरगुती उपचार वर्षानुवर्षे चालत आले आहेत. निसर्गोपचार कोणत्याना कोणत्या स्वरूपात इतर देशात (जसे इजिप्त, चीन) रूढ होता हे गूगल शोध करूनही कळते. त्यावर पुस्तक प्रसिद्ध करण्याचे कार्य प्रथम जर्मनी मध्ये झाले असेलही पण त्यामुळे निसर्गोपचार हि संकल्पनाच जर्मनी मध्ये उगम पावली हा दावा धाडसी वाटतो. उरळीकांचन येथील व तत्सम निसर्गोपचार केंद्रात जर्मन मधून भाषांतरित अनेक पुस्तके आहेत. त्यामुळे भारतीयांना तो जर्मनां कडूनच कळला असा लेखात उल्लेख आहे.

आयुर्वेद हा वैदिक काळापासूनच अस्तित्वात होता हे सर्वश्रुत आहे. ती केवळ उपचार पद्धती नसून स्वास्थ्यासाठीची ती सर्वांगीण जीवन पद्धती आहे. त्या दृष्टिकोनातून आयुर्वेद आणि योग प्रकृतीचा विचार करण्याचा एक अभिनव दृष्टिकोन आहे जो निसर्गाशी तादात्म्य पावलेला आहे हे सत्य सांगण्यात राष्ट्रवादाचा दर्प कोठून येतो हे लेखावरून स्पष्ट होत नाही. 

'वैदिक पुनरुत्थान' अशी संकल्पना लेखाच्या सारांशात मांडली आहे पण तिचा संपूर्ण लेखात कोठेच उल्लेख का नाही? आयुर्वेदीय राष्ट्रवाद आणि वैदिक पुनरुत्थान असा संबंध लेखात जोडला असून आयुर्वेदीय उपचार पद्धती मुळे परस्पर विरोधाभास निर्माण झाला आहे असे विधान लेखात आहे त्यामुळे तरी ही संकल्पना विशद करणे गरजेचे होते.

आयुर्वेदामुळे सांस्कृतिक वारशाचे जे राजकारण भारतात चालते त्याला प्रोत्साहन मिळते व त्यामुळे नव पौर्वात्यवाद आणि मूलतत्त्ववाद बळावतो असे विधान कोणत्या आधारावर केले याचा संपूर्ण लेखात काहीच बोध होत नाही.

आयुर्वेदाचे व्यापारी करणं झाल्याचे विधान  करताना महाऋषी आयुर्वेद, डाबर आणि बाबा रामदेव यांचा उल्लेख आहे पण एका अमेरिकन कुटुंबाने अवेदा या नावाने जो आयुर्वेदिक औषधीचा अब्जावधींचा व्यवसाय जगभर वाढवला आहे त्याचा उल्लेख मात्र नाही. निसर्गोपचाराचे काहीच व्यापारीकरण झाले नाही का?

आयुर्वेदावरील संशोधन लेखात सुश्रुत, चरक यांचा साधा उल्लेखही नसावा याचेही आश्चर्य वाटते.

भारतातील आयुर्वेदिक संशोधकांना, प्राध्यापकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या लेखांचा मागोवा घेऊन योग्य प्रकारे खंडन करणे जरूरीचे आहे. त्यामुळे आयुर्वेदाबाबत आणि एकंदरीतच भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीचे अधिक योग्य मूल्यमापन होण्यास मदत होईल.

(मिलिंद साठ्ये हे ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विश्वविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com