दुबईकर कुसुमाग्रजांच्या कवितांनी मंत्रमुग्ध

pailatir
pailatir

कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस, यानिमित्त महाराष्ट्रासह जगभरात दरवर्षी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा दुबईतील ग्रंथ तुमच्या दारी व मोरया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "कुसुमाग्रज तुमचे आमचे" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करून दुबईत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता, गाणी, आणि नाट्यप्रवेश वाचनाच्या रसग्रहणाने दुबईकर मंत्रमुग्ध झाले.

ग्रंथ तुमच्या दारीच्या समन्वयिका विशाखा पंडित यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाची संकल्पना देखील पंडीत यांचीच होती. मराठीतील दर्जेदार ग्रंथ 'युएई'तील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे हा ग्रंथ तुमच्या दारीचा हेतू आहे. या कार्यात अधिकाधिक प्रमाणात वाचकांनी सहभागी व्हावं असे आवाहन त्यांनी केले. दुबईत नवीन ग्रंथ पेट्या वाढत असून हे नवीन वाचक वर्ग वाढत असल्याचे सूचक लक्षण असल्याचे त्यांनी सांगून सर्व समन्वयकांचे व वाचकांचे आभार मानले. थोड्याच कालावधी इंटरनॅशनल सीटी दुबई येथे मोठा वाचक वर्ग तयार झाल्याने तेथील वाचकांच्याच वर्गणीतून नवीन २२वी ग्रंथ पेटी व एक बाल ग्रंथ पेटी समिश्का जावळे व स्वप्निल जावळे या समन्वयकांना सुपूर्द करण्यात याली. जावळे दाम्पत्यांनी त्यांच्या मुलगा स्वराज याच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून ही बाल ग्रंथपेटी प्रायोजित केली आहे.

शाल्वली बोरकर, सानिका गाडगीळ, रिया गायकवाड आणि अनुष्का देसाई या शाळकरी मुलींनी "सरस्वतीच्या नौका या युग यात्रेस निघाल्या" आणि "हसरा लाजरा... सुंदर साजिरा श्रावण आला" ही गीतं रसिकांसमोर सादर करून स्वरमंडपातील वातावरण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. परदेशात राहूनही या मुली संगीताचे व गायनाचे धडे गायिका चैत्राली जानेफळकर यांच्याकडून घेत असून त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच होते. तसेच गायिका श्रुतिका निमखेडकर यांनीही "तुझ्या तांबुस तेजाची ज्योतं" या गीताने मैफिलीत स्वरांचे रंग भरले. अर्चित अग्निहोत्री याने गायलेल्या "काही बोलायलाचे आहे पण बोलणार नाही" या गीताला प्रेक्षकांनी विषेश दाद दिली. हार्मोनियमवर मेघन श्रीखंडे आणि तबल्यावर प्रसाद सांगोडकर यांनी संगत दिली. 

यानंतर सुरू झाला कुसुमाग्रजांच्या कवितांचा नदीसम प्रवाह. डॉ. सुप्रिया सुधाळकर, वसुधा कुलकर्णी, मनोज पाटील, विशाखा पंडित आणि गणेश पोटफोडे यांनी कुसुमाग्रजांच्या काही प्रसिद्ध काव्यरचना सादर केल्या. दुरस्थ, निरभ्र, तत्वज्ञान, माझ्या मराठी मातीचा, चंद्र, प्रेम कुणावर करावं?, प्रेम कर भिल्ला सारखं, कणा, रद्दी, आगगाडी आणि जमीन, अखेर कमाई, जोगिया, जखमांचे देणे, गाभारा, करार, पाऊलचिन्हे, मौन आणि असाही एक सावता यासारख्या कवितांचा समावेश होता. आहान सुधाळकर या पहिलीत इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बाल कलाकाराने "टपालवाले टपालवाले" या कवितेचे वाचन करून विदेशात राहूनही आम्ही मातृभाषा शिकतो हा संदेश दिला.

प्रसिद्ध निवेदिका आणि गायिका चैत्राली जानेफळकर यांनी "माझे जगणे होते गाणे", "नवीन काही गा हो आता", "दूर निनादे स्वरसंमेलन", "युगामागुनी चालली रे युगे ही", आणि "वेडात मराठे वीर दौडले सात" या डॉ. गोपाळ मिरीकर यांनी दिलेल्या चालीत दर्जेदार व सुरेल गीतांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत नेली. नाट्य अभिनेते मनोज पाटील आणि लेखिका वसुधा कुलकर्णी या दोघांनी मिळून नटसम्राट नाटकातील आप्पा कावेरी यांच्यातील "बायको म्हणजे बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी" हा प्रसिद्ध संवाद सादर केला. मनोज पाटील यांनी आपल्या कणखर आवाजात नटसम्राट नाटकातील आप्पा बेलकलकर यांचे "आपला बाप चोर आहे", "टू बी ऑर नॉट टू बी", "दुर व्हा सगळं निरर्थक आहे" हे गाजलेले संवाद सादर करून प्रेक्षकांच्या काळजाच्या ठीकर्‍या केल्या. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षकांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेची आठवण झाली. वसुधा कुलकर्णी यांनीही कावेरीचा एक हृदय पिळवटून टाकणारा संवाद सादर करून रसिकांना काहीकाळ भावनिक केले.

चैत्राली जानेफळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन करून प्रेक्षकांना सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. कार्यक्रमाचा स्तर हा सर्वांच सहभागी कलाकारांनी फारच वरचा ठेवला व कुसुमाग्रज ह्या नावाला पुर्ण न्याय देवून नक्षत्रांचे देणे या गाजलेल्या कार्यक्रमाची आठवण सर्वांना करुन दिली. भविष्यात असेच साहित्य, कला, संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतील असे प्रतिपादन विशाखा पंडित यांनी केले. ग्रंथ तुमच्या दारी दर तीन महीन्यातून एकदा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. या सारख्या कार्यक्रमाला मोरया इव्हेंट सहकार्य करेल असे मनोज पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध कलाकार मेघन श्रीखंडे यांनी गायलेल्या "सर्वात्मका सर्वेश्वरा" या ययाती नाटकातील पदाने झाली. डॉ. सुप्रिया सुधाळकर यांनी मोरया इव्हेंटचे सर्वेसर्वा व कार्यक्रमाचे आयोजक मनोज पाटील, सहभागी कलाकार आणि प्रेक्षकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. सहभागी सर्व कलाकारांना विशाखा पंडित यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com