गोष्ट पहिल्या ध्रुवीय मोहिमेची...

शंतनू देसाई
गुरुवार, 27 जुलै 2017

नॉर्वेची राजधानी ओस्लो इथल्या फ्राम म्युझियममध्ये शंतनू देसाई यांना काही अफलातून अवलियांना भेटता आलं. त्यातून उलगडला धाडसाचा, साहसाचा इतिहास. देसाई कोपनहेगन (डेन्मार्क) इथं वास्तव्यास आहेत. पैलतीरच्या वाचकांसोबत त्यांनी आपला अनुभव शेअर केला.

आपणही आपले अनुभव पाठवू शकता.  आमचा ई मेल: webeditor@esakal.com

शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो आणि डोंगर दऱ्यांमध्ये येते तशी एकदम अंधारी रात्र झाली. आकाशात एवढे तारे असतात हे माझ्या सारख्या शहरातच राहिलेल्याला पहिल्यांदाच कळलं. काही प्रमाणात 'फाटली' होती पण त्या घाबरलेल्या अवस्थेतही, त्या चांदण्या, चंद्रप्रकाश, मधूनच निखळणारा तारा आणि दिसणारे काजवे, यांसारखे अनुभव ती भीती काही काळ विसरायला लावत होते. अशा अंधाऱ्या रात्री, पण चंद्रप्रकाशात, जंगलझाडं आणि आकृत्या खरंतर जेवढ्या भीतीदायक वाटू शकतात तेवढ्याच मजेशीर किंवा भव्य पण वाटू शकतात. पण चायला सलग दोन स्ट्रीट लाईट सुद्धा बंद असले तरी 'अंधार' आहे अशी समजूत होऊन पुढच्या स्ट्रीट लाइट च्या प्रकाशात लगबगीने जाणारे, शहराळलेले आपण, अश्या अंधाराची किंवा अकल्पिताची मजा तर सोडाच, भीतीच वाटून घेतो! चांगले २-३ तास असे अंधारात भटकल्यावर एक दिवा दिसला आणि तिथे एका भल्या परिवाराने आम्हाला त्यांचा मोकळ्या गोठ्यात झोपायला परवानगी दिली. असा माझा अंधार, अनिश्चितता आणि अकल्पित असा एकमेव अनुभव संपुष्टात आला. 

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, ओस्लो या नॉर्वेच्या राजधानीमधील 'फ्राम' हे म्युझियम. आणि या म्युझियम च्या निमित्तानी ओळख झालेली काही अफाट आणि अवलिया नॉर्वेजिअन व्यक्तिमत्व!

Polar Expeditions अर्थात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना गाठण्यासाठी काढलेल्या मोहिमा. या मोहिमा काढण्या मागे शास्त्रीय संशोधन हे एक कारण आहे तसेच औद्योगिक कारणं हि आहेत. जसे कि "Northwest Passage"(वायव्य रस्ता) हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा समुद्री रस्ता शोधणे हा युरोपातील व्यापारासाठी खूप महत्वाचा ठरला असता. कारण, आशिया आणि अमेरिकेतील बाजारपेठ जलमार्गाने आवाक्यात येणे ही अतिशय मोठी बाब आहे. १६व्या शतकापासूनच काही ब्रिटिश मोहीमवीरांनी या नॉर्थवेस्ट पॅसेजची अटलांटिक महासागराकडीलकडील बाजू शोधण्याचा प्रयत्न केल्याचा नोंदी आहेत. पण ही मोहीम यशस्वी होण्यासाठी म्हणजेच नॉर्थवेस्ट पॅसेज पूर्ण ओलांडून जाण्यासाठी विसावं शतक उजाडावं लागलं.

या किंवा इतर नोंद न झालेल्या ध्रुवीय मोहिमा अयशस्वी होण्यामागे सर्वात स्वाभाविक आणि महत्वाचं कारण म्हणजे - बर्फ! आर्क्टिक आणि अंटार्टिक हे पूर्णपणे बर्फाळलेले प्रदेश आहेत. कल्पना करा की एक महासागर पृथ्वीच्या उत्तर टोकाला आहे तो पूर्णपणे बर्फाच्या थराखाली अस्तित्वात आहे! आर्क्टिक ओशन... आणि हे बर्फाचे प्रचंड मोठे थर कायम सरकत असतात. हिवाळ्यामध्ये अगदी संथ वेगाने आणि हिवाळा नसताना काही प्रमाणात जास्त वेगाने. आणि त्या काळी तर ग्लोबल वॉर्मिंग नसल्यामुळे ध्रुवीय बर्फ वितळणे असले प्रकार होत नव्हते. त्यामुळे या मोहिमांवर असलेली जहाजं, वाहत असलेले पाणी गोठले, की बर्फामध्ये अडकून जायची. असे एखाद-दोन हिवाळे तग धरलाही असेल काही जहाजांनी, पण अशा मोहीमवीरांना या थंड निसर्गासमोर शरणागती पत्करण्यापलीकडे गत्यंतर नसायचं. अशा किती मोहिमा काळामध्ये गोठून गेल्या असतील काही हिशोब नाही पण अमेरिकेचे 'जेनेट' नावाच्या जहाजाच्या अयशस्वी मोहिमे बद्दल नॉर्वेतील 'फ्रीडजोफ नॅन्सन' यांना कळलं आणि त्यांच्या साहसी डोक्यामध्ये उत्तर ध्रुवापर्यंत पोचण्याची अचाट योजना आकाराला येऊ लागली.

अमेरिकेचे जेनेट हे ध्रुवीय संशोधनासाठी निघालेले जहाज सायबेरियाच्या उत्तरी किनाऱ्यावर बर्फामध्ये अडकून बुडाले होते. हे झाले १८८१ मध्ये आणि तब्बल ३ वर्षांनी या जहाजाचे अवशेष जून १८८४ मध्ये ग्रीनलँडच्या नैऋत्येला मिळाले. ही बातमी नॉर्वेमध्ये नॅन्सन यांना कळल्यावर त्यांना कल्पना सुचली की एखादं खास डिझाईन केलेलं जहाज जे बर्फाच्या प्रचंड दबावाखाली टिकू शकेल ते जेनेट प्रमाणेच आर्क्टिकच्या बर्फामधून नैसर्गिकरित्या 'ड्रिफ्ट' होईल. अर्थात बर्फात अडकले तरी बर्फाच्याच नैसर्गिक प्रवाहासोबत सरकत हा प्रवास उत्तर ध्रुवावरून पुढे ग्रीनलँडपर्यंत पोचेल. 

नॅन्सन यांनी हे मजबूत आणि खास डिझाईनचे जहाज बांधण्याचं काम नॉर्वेतीलच जहाज आर्किटेक्ट कॉलिन आर्चर यांना दिलं. जून १८९३ मध्ये हे जहाज या साहसी मोहिमेवर निघालं. हे जहाज सुरवातीला पाण्यातून आणि नंतर बर्फातून प्रवास करणार होतं. पहिले काही महिने पाण्यातून प्रवास केल्यावर अपेक्षेप्रमाणे हे जहाज बर्फामध्ये अडकलं. आता एका न सिद्ध झालेल्या सिद्धांतावर नॅन्सन आणि त्यांच्या १२ साथीदारांचे भवितव्य अवलंबून होते. नॅन्सन यांचा विश्वास होता की जेनेट प्रमाणेच आपलं जहाजसुद्धा उत्तर ध्रुवावरून सरकत पुढे ग्रीनलँडपर्यंतचा प्रवास करेल. बर्फात जहाज अडकल्यावर काही महिने उलटून गेले आणि नॅन्सन यांना त्यांचे अंदाज चुकीचे ठरू शकतील असं वाटू लागलं. 

ही बर्फ प्रदक्षिणा आता ५ वर्षेतरी चालेल अशी नोंद त्यांनी या वेळेस केलेली मिळते. या होणाऱ्या उशिरामुळे आणि उत्तर ध्रुव पादाक्रांत करण्याच्या इच्छेमुळे त्यांनी ठरवलं की ते स्वतः आणि त्यांच्या क्रूमधील स्लेज, म्हणजे कुत्र्यांचा साहाय्याने बर्फावरून ओढली जाणारी गाडी चालवणाऱ्यातले अनुभवी 'योहान्सन' यांना घेऊन ध्रुवाकडे वाटचाल चालू करायची. जवळपास एक वर्ष (जानेवारी १८९४ ते मार्च १८९५) जहाजावर या साहसी मोहोमेची तयारी चालू होती. १४ मार्च १८९५ ला नॅन्सन आणि योहान्सन यांनी जहाज सोडले आणि उत्तर ध्रुवाकडे कूच केली. जहाजापासून धृवापर्यंतच अंतर होतं ६६० किलोमीटर. आणि हे अंतर पार करायला साधारण ५० दिवस लागतील असा नॅन्सन यांचा अंदाज होता. एका आठवड्यामध्ये ८७ किलोमीटर अंतर पार झाल्यावर नॅन्सन यांचा लक्षात आला की ते ज्या बर्फावरून प्रवास करत होते त्याचा प्रवाह पश्मिकडे होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि बरोबर घेतलेली खाद्य आणि इतर सामग्रीची गोळाबेरीज फार काही सकारात्मक वाटत नव्हती. ७ एप्रिल १८९५ ला समोर दिसणारे बर्फाचे उभे आडवे डोंगर बघून नॅन्सन यांनी मागे फिरायचा निर्णय घेतला. तरीही, तोवर कोणीही पोचलं नव्हतं इतक्या उत्तर ध्रुवाजवळ ते पोचले होते.

७ एप्रिल १८८५ ला परत जायचं ठरलं आणि जहाज साधारण जिथंवर बर्फामधून पुढे गेलं असेल तिकडे वाटचाल चालू झाली. सुरवातीला जरा सोपा वाटणारा परतीचा प्रवास लवकरच अनेकानेक संकटांमुळे अवघड बनत गेला. परतीच्या प्रवासाच्या एका आठवड्याभरात नॅन्सन आणि योहान्सन, दोघांची घड्याळं बंद पडली. घड्याळ बंद पडल्यामुळे बरोबर मार्गाची गणना करून आगेकूच करणे अशक्य झाले. त्यातच बर्फाचा प्रवाह जो आधी पश्मिकडे होता ती पूर्वेकडे व्हायला लागला. हळू हळू करून बरोबर घेतलेल्या २८ कुत्र्यांनीही मारावं लागलं. पहिले बाकीच्या कुत्र्यांना खायला म्हणून त्यांच्यातलाच दुबळ्या झालेल्यांना आणि नंतर काहीच खायला नाही म्हणून सगळ्यांना. बर्फावरून चाललेल्या या प्रवासामध्ये मधूनच जमीन लागली आणि तिथे यांनी तळ ठोकला. कोणीच मनुष्य अथवा सुटकेची चिन्ह दिसत नसल्यामुळे जमीन सोडून परत अनिश्चिततेच्या धैर्यशील प्रवासाला सुरवात होत होती. अस्वल आणि वॉलरस यांचे हल्लेपण झाल्याची नोंद आहे.  

अशाच एका जमिनीवरील थांब्यावरून पुढे वाटचाल करत असताना १७ जून १८९६ ला नॅन्सन यांना कुत्र्यांचा आवाज आल्याचा भास झाला. त्या आवाजाच्या मागावर गेले असता त्यांना भेटले फ्रेडरिक जॅक्सन. जॅक्सन यांनी, नॅन्सनच्या क्रूमध्ये निवड न झाल्यामुळे स्वतःची ध्रुवीय मोहीम चालू केली होती आणि नशिबाने त्यांनीच नॅन्सन यांची सुटका केली. या घटनेचा एक फोटो या भेटी नंतर काही तासांनी काढला होता. अशाप्रकारे नॅन्सन आणि योहान्सन यांची ही ध्रुवयात्रा १४ महिन्यांनंतर जॅक्सन भेटल्यामुळे संपली. आर्क्टिकच्या बर्फामधील एक बेट जिथे नॅन्सन आणि योहान्सन यांनी वात्सव्य केलं होतं, त्या बेटाला आपल्याला वाचवणाऱ्याच्या सन्मानार्थ 'फ्रेडरिक जॅक्सन' बेट असे नामकरण नॅन्सन यांनी केले! 

पुढे नॅन्सन, त्यांनी सोडलेल्या जहाजाला आणि त्यांचा साथीदारांना भेटले आणि ९ सप्टेंबर १८९६ ला सर्व क्रू आणि जहाज परत ओस्लो, नॉर्वेला पोचले. त्यांचे स्वागत ओस्लोच्या बंदरावर मोठ्या थाटामाटात झाले. जून १८९३ ते सप्टेंबर १८९६ या तीन वर्ष चाललेल्या या अयशस्वी मोहिमेने ध्रुवीय मोहिमांची संकल्पना बदलली. बर्फाच्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर सरकत जात या जहाजांनी जरी ध्रुव गाठला नाही तरी बरंच अंतर पार केलं आणि पुढील मोहिमेसाठी मौल्यवान अशी माहिती मिळवली. 

हेच जहाज म्हणजे फ्राम. ओस्लोमध्ये फ्राम मुझियममध्ये हे जहाज अजूनही परिपूर्ण अवस्थेमध्ये जतन केलंय. तुम्ही हे जहाज आतून बाहेरून बघू शकता. हेच जहाज घेऊन पुढे 'रोअल्ड अमुंडसन' या अवलिया मोहीमवीरानी केलेला प्रवास पण खूपच रोमांचक आहे. 

अमुंडसन हे नॅन्सनना तसे जुनिअर, पण त्यांच्या एवढेच किंवा काकणभर जास्तच प्रतापी. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पोचलेला पृथ्वीतलावरील पहिला मनुष्य अशी निर्विवाद ख्याती लाभलेले अमुंडसन यांनीसुद्धा नॅन्सन यांच्याबरोबर मोहिमेवर जाण्यासाठी अर्ज भरला होता, अशी माहिती मिळते. त्याच जहाजाला, म्हणजे 'फ्राम' ला घेऊन हा माणूस दक्षिण ध्रुवापर्यंत पोचला. खरंतर जेव्हा मोहिमेची आखणी चालू होती तेव्हा अमुंडसन फ्रामला घेऊन उत्तर ध्रुवाकडे निघाले होते. पण अमेरिकन मोहीमवीर फ्रेडरिक कूक आणि रॉबर्ट पियरी यांनी उत्तर ध्रुव पादाक्रांत केल्याचा दावा केला आणि ध्रुवावर दुसरे किंवा तिसरे जाण्यात रस नसलेले अमुंडसन यांनी उत्तर ऐवजी दक्षिण ध्रुवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या योजनेबद्दल त्यांनी मोहिमेच्या प्रयोजकांना तसंच क्रू मेंबर्सना सुद्धा अंधारात ठेवलं होतं. जून १९१० मध्ये जेव्हा फ्राम ओस्लोहून निघालं तेव्हासुद्धा अमुंडसन यांनी साथीदारांना काही कळू दिलं नाही पण जेव्हा जहाजाने शेवटचं 'मदेरा' नावाच्या बेटाचं बंदर सोडलं तेव्हा त्यांनी आपला दक्षिण ध्रुवाकडे जायचा मनसुबा जाहीर केला.

अमुंडसन यांनी अंटार्टिकामध्ये जिथे त्यांचा बेस बनवला त्याला 'फ्रामहेइम' असं नाव दिलंय. फ्रामहेइमचा अर्थ फ्रामचे घर. जानेवारी १९११ मध्ये फ्रामहेइम तयार झालं. फेब्रुवारीपासूनच अमुंडसन यांनी ध्रुवावरील प्रवासासाठी अत्यावश्यक असे, वाटेतील 'सप्लाय डेपो' बनवण्यासाठीच्या मोहिमांना सुरवात केली. याचा अर्थ ध्रुवावरील अंतिम मोहिमेसाठी वाटेमध्ये लागणाऱ्या सामग्रीचा, अन्नाचा साठा तयार करायचा आणि बेसला, म्हणजेच फ्रामहेइमला परत यायचं. या डेपो बनवण्यासाठीच्या मोहिमांमध्ये त्यांच्याकडील प्रवास साधनांची, स्लेजेसची, स्लेज ओढणाऱ्या कुत्र्यांची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिमीवीरांची खरी चाचणी होणार होती. 

ध्रुवावरील वाटेवर या मोहिमांमार्फत तीन सप्लाय डेपो बनवण्यात आले. या डेपोंमध्ये मुख्यतः अन्न आणि तेलाचे साठे बनवण्यात आले. डेपो बांधण्याच्या मोहिमा संपल्या आणि फ्रामहेईमवर २१ एप्रिल १९११ ला सूर्यास्त झाला. हा सूर्यास्त तब्बल ४ महिन्यांसाठी होता. आपल्या कल्पनेपलीकडील अशी ही अंटार्टिक मधील निसर्गाची अनिवार्य अशी रात्र! चार महिने सूर्याशिवाय आणि कडाक्याच्या थंडीत घालवण्यासाठी अमुंडसन आणि मंडळी तयार झाली. अमुंडसन यांचे कमालीचे नेतृत्व गुण आणि नियोजनामुळे या काळरात्रीच्या महिन्यांमध्ये सर्वच क्रूने नंतरच्या खऱ्या कसोटीसाठी उपयुक्त असे काही ना काही काम चालू ठेवले. कुत्र्यांनी ओढायच्या स्लेजेसना अधिक हलकं आणि बळकट बनवणे, मोहिमेस घेऊन जायचे राशन म्हणजेच खाद्य, तेल, बिस्किट्स, चॉकलेट इत्यादींची शिदोऱ्या बनवणे, बूट, गॉगल, तंबू, बर्फावर घसरत जाण्यासाठीच्या स्कीज वगैरंची डागडुजी करणे अशी कामं चालू ठेवण्यात आली.

अखेर चार महिन्याची काळरात्र संपली आणि एका अपयशी सुरवातीनंतर, अमुंडसन आणि त्यांचे ४ साथीदार - असे ५ जण १९ ऑक्टोबर १९११ ला, ४ स्लेजेस आणि त्यांना ओढण्यासाठी ५२ कुत्र्यांना घेऊन दक्षिण ध्रुवाकडे निघाले. प्रचंड धुक्यामुळे नजरेस दिसणे फारच मर्यादित होते. त्यातच अनेक क्रिव्हिसेस म्हणजे हिमनदी किंवा पूर्ण बर्फाच्या पृष्ठभागावर मधूनच असणाऱ्या खोल भेगांमुळे प्रवास जिकिरीचा होता. अमुंडसन याची स्वतःचीच स्लेज अशा क्रिविसमधले पडतापडता वाचल्याची नोंद आहे

१०६०० फूट अर्थात ३२०० मी. उंचीवर, एक ५६ किलोमीटरची हिमनदी पार केल्यावर, अमुंडसन यांनी ध्रुवावरील मोहिमेच्या अखेरच्या टप्प्याची तयारी इथे बेस बनवून चालू केली. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर १६४६ मी. आहे. यावरून आपण अमुंडसन यांचा हा तळ किती उंचीवर होता याचा अंदाज बांधु शकतो. इथंवर वाचलेल्या ४५ कुत्र्यांपैकी फक्त १८ पुढे घेऊन जाणे शक्य होते. बाकीच्या कुत्र्यांना तिथेच मारण्यात आले. त्यांचे मास राहिलेल्या कुत्र्यांना आणि मोहीमवीरांनी खाण्यासाठी वापरले. २७ कुत्र्यांना मारले म्हणून नंतर अमुंडसन याच्यावर जगभरातून टीकाही झाली आहे.

२५ नोव्हेंबर १९११ ला अमुंडसन आणि सहकारी, या शेवटच्या बेसवरून ध्रुवाकडे निघाले. ही अंतिम चाल होती. पूर्णपणे बर्फाचा पृष्ठभाग आणि त्यात असलेले क्रिव्हिसेस ओलांडताना प्रवासाचा वेग अतिशय धीमा झाला होता. या प्रदेशाला अमुंडसन यांनी 'सैतानी हिमनदी' असे संबोधले आहे. दक्षिण ध्रुवापासून २८ किलोमीटर वर शेवटचा मुक्काम झाला १३ डिसेंबर १९११ ला. अखेरचे काही अंतर, अमुंडसन यांनी सर्वात पुढच्या स्लेजवर प्रवास करावा असा साथीदारांचा आग्रह होता आणि दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर १९११ ला दुपारी ३ वाजता अमुंडसन आणि त्यांचे ४ साथीदार दक्षिण ध्रुवावर पोचले.

पुढील तीन दिवस अमुंडसन आणि त्यांचे सहकारी ध्रुवाच्या परिसरात राहिले. जवळ असलेल्या उपकरणांनी मोजमाप करून ध्रुवाची अचूक जागा शोधून काढली गेली. त्या जागी एक तंबू ठोकला गेला आणि त्यावर नॉर्वेचा ध्वज आणि त्या खाली "फ्राम" असा लिहिलेला एक ध्वज उभारला. या जागेला नाव दिलं गेलं 'पोलहैम' अर्थात पोल चे घर! या तंबूमध्ये अमुंडसन यांनी मोजमाप करण्याकरता वापरलेली काही उपकरणं आणि नॉर्वेचा राजा, राजा हाकोनसाठी एक पत्र ठेवलं. ही उपकरणं आणि पत्र कॅप्टन स्कॉट - जे त्याच सुमारास दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेवर होते त्यांचासाठी होतं कारण जर अमुंडसन आणि सहकारी परतीच्या प्रवासात तग धरू शकले नाहीत तर त्यांनी केलेला हा पराक्रम काळाच्या पडद्याआड जाऊ नये म्हणून ही तरतूद! १८ डिसेंबर १९११ ला परतीचा प्रवास चालू झाला आणि २५ जानेवारी १९१२ ला ते मुख्य तळावर म्हणजे फ्रामहेईमला सुखरूप पोचले. ५२ पैकी ११ कुत्री बचावली होती. ९९ दिवसांत, अमुंडसन आणि त्यांच्या साथीदारांनी फ्रामहेईम ते दक्षिण ध्रुव आणि परत असा, ३४४० किलोमीटरचा प्रवास केला.

फ्राम मुझियममध्ये हे दोन्ही ध्रुवीय क्षेत्र जाऊन आलेलं एकमेव असं जहाज अतिशय सुरेखरित्या जतन केलेला आहे. त्याच्यामध्ये असलेल्या क्रू राहायच्या खोल्या, स्वयंपाकघर, कॉमन जागा, कुत्र्यांना ठेवायची जागा - जिथे एके काळी ११६ कुत्री होती - हे सर्व तुम्ही पाहू शकता. नॅन्सन आणि अमुंडसन यांचा कौशल्याला आणि नियोजनाला जितकं श्रेय जात तितकंच या ऐतिहासिक जहाजाला!

ओळखीच्याच रस्त्यांनी जावे ही शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिली जाते. उगाच कशाला नवा रस्ता पकडायचा हा विचार स्वाभाविक आहे असेच आपण मानतो. कोपनहेगनला परतलो तेव्हा फ्राम, अमुंडसन, नॅन्सन यांनी साध्य केलेलं काल्पनिक वाटणारं यश म्हणावं की पराक्रम काही कळत नव्हतं पण मनातून जातही नव्हतं. फक्त स्वतःवर असलेला दुर्दम्य विश्वास आणि व्यवस्थित केलेली तयारी याचा जोरावर ही मंडळी असाध्य गोष्टी साध्य करून गेली. पाऊस नसेल तर मी ऑफिसला सायकलने जातो. पाऊस नसेल तरच. जाऊदे. तर बरेच दिवस एक गल्लीच्या समोरून जायचो जिथून मला वाटायचं की हा गल्लीतून जाणारा रस्ता ऑफिसच्या जवळ कुठे तरी उघडत असेल. फ्राम बघून आलो तेव्हा एक दिवस घुसलो त्या गल्ली मध्ये. २-३ अनोळखी वळणं लागली आणि त्यातला एक चुकलं. ३ किलोमीटर चुकीच्या दिशेने गेल्यावर जाणवलं की चुकतंय म्हणून मग फिरलो आणि कळलं की एक वळण चुकलं होतं. पहिल्या दिवशी शोधण्यात उशीर झाला पण आता त्याच गल्लीमुळे माझा ऑफिसचा रस्ता दीड किलोमीटरने कमी झालाय!

'मला माहित नाही' हे बऱ्याच वेळेस आपलं एखादं आव्हानात्मक कामं न करण्याचं कारण असतं. नवीन रस्ता शोधणे हे प्रतिमात्मक झालं पण याचा संबंध आयुष्यातील बऱ्याच गोष्टींशी आहे. एखादं कामं न येणे किंवा अपयश येणे हे फक्त आणि फक्त आपण न केलेल्या प्रयत्नांचा आणि न केलेल्या नियोजनाचं फलित आहे हे मान्य केलं पाहिजे. माहित नसलेल्या रस्त्याने जाण्यात किंवा माहित नसलेली गोष्ट करण्यात वाटणाऱ्या, भीतीची जागा, जर का धैर्याने घेतली किंवा मजेने घेतली तर खरंच बऱ्याच गोष्टी साध्य होतील. आता तंत्रज्ञानाच्या व्याप्तीमुळे आणि सहज मिळणाऱ्या माहितीमुळे स्वतःहून काही शोधून काढणे खरं तर दुर्मिळच आहे पण आहे त्या उपलब्ध माहितीचा वापर करून स्वतःसाठीच नवीन मार्ग बनवणे आणि नवीन यश मिळवणे हीच फ्राम आणि या सारख्या मोहिमांना, मोहीमवीरांना दिलेली मानवंदना आहे. 

प्रत्येक गोष्टीमधून आपण काही न काही बोध घेत असतो. आपल्या आयुष्याचे दोन भाग म्हणजेच वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर या बोधाचा आणि अनुभवाचा परिणाम होत असतो. कोपनहेगनमधली माझ्या ऑफिसला जाणारी नवीन गल्ली शोधून काढणे आणि उत्तर दक्षिण ध्रुव शोधून काढणे यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असला तरी अमुंडसन यांना ध्रुवावर पोचणारी वाट शोधून काढल्यावर झालेल्या आनंदाचाच काही अंशी आनंद मला ही नवीन गल्ली आता देते आहे. आयुष्यातले अशेच नवीन मार्ग, धैर्याने आणि प्रयत्नपूर्वक शोधून काढण्यासाठी अविरत चालू असलेली मोहीम म्हणजेच जीवन!

असे अनोखे विचार मला करायला प्रेरणा देणाऱ्या फ्राम मुझियमला आणि त्या निमित्तानी ओळख झालेल्या या व्यक्तिमत्त्वांना, या जहाजाचे सुंदर जतन करण्याऱ्या ओस्लोकरांना माझे मनापासून सलाम!