हिंदू, बौद्ध संस्कृतीचा इतिहास सांगणारा मुस्लिमबहुल इंडोनेशिया

Pailteer Marathi community in Australia Milind Sathye writes about Indonesia
Pailteer Marathi community in Australia Milind Sathye writes about Indonesia

इंडोनेशियातील मालांग येथील मर्डेका विद्यापीठाने शाश्वत विकास २०३० या विषयावर ११ आणि १२ ऑगस्ट २०१७ ला एक परिषद आयोजित केली होती. प्रमुख वक्ता म्हणून मला आमंत्रित केले होते. इंडोनेशियाला मी प्रथमच जात होतो. त्यामुळे बरेच कुतूहल होते. जगातला मुस्लिमबहुल देश म्हणून इंडोनेशियाची ओळख आहे. आयोजकांनी माझे विमान तिकीट कॅनबेरा-सिंगापुर-सुराबाया असे राखीव केले होते. 

विमानतळावर माझे स्वागत तेथील एका प्राध्यापकाने केले व आम्ही गाडीने मालांगला जाण्यास निघालो. अंतर सुमारे २ तास. प्राध्यापक चांगलेच गप्पीष्ट होते. मी प्रथमच  इंडोनेशियाला आलो आहे हे समजल्यावर त्यांना अधिकच चेव आला. ते व्यवस्थापनाचे प्राध्यापक असले तरी त्यांना माझ्यासारखीच इतिहासाची गोडी आहे. त्यामुळे आमचे चांगलेच जमले. 

इंडोनेशिया मुस्लिमबहुल असलातरी आमची संस्कृती हिंदू आणि बुद्ध धर्मावरच आधारित आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. त्यामुळेच बऱ्याच इंडोनेशियन लोकांची अजूनही हिंदू नावे आहेत. जसे अर्जुन, विद्या, अन्नदेवी, सुशील, सूप्राप्ती, कृष्णा इत्यादी. त्या प्राध्यापकांचे नावही अगुंग असे होते. ते म्हणाले की हा अर्जुन शब्दाचाच अपभ्रंश आहे. ते स्वतः मुस्लिमच आहेत.

अजून एक विद्यापीठ या परिषदेचे प्रायोजक होते. त्याचे नाव कृष्णा द्वैपायन विद्यापीठ. नाव आपण बरोबर ऐकले ना म्हणून मी परत एकदा विचारले. ते म्हणाले हे विद्यापीठ जकार्ता शहरात आहे.

आम्ही मुस्लिम असलो तरी जगातील इतर मुसलमानांपेक्षा वेगळे आहोत असे मला अगदी पहिल्या भेटीतच त्यांनी आवर्जून सांगितले. जगभर मुस्लिमांबाबत जो समज आहे कदाचित त्याचा हा परिणाम असावा.

सुराबाया ते मालांग वाटेवर सुमेरू नावाचा पर्वत लागतो. तो इंडोनेशियातला सर्वात ऊंच पर्वत आहे, असे प्राध्यापक म्हणाले. याचे वैशिट्य म्हणजे तो जागृत ज्वालामुखी आहे आणि मधून मधून जागृत होत असतो. ज्वालामुखी कसा असतो हे दुरून का होईना मी प्रथमच पाहत होतो. मालांग जवळच अजून एक पर्वत आहे त्याचे नाव अर्जुन पर्वत. सुराबायाला खूप उन्हाळा होता. त्या मानाने मालांग थंड होते. घरे दुकानेही कौलारू. इंडोनेशियन भाषेतील पाट्या सोडल्या तर पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर फिरतोय असे वाटावे. गर्दी मात्र कमी. लोकसंख्याच जेमतेम 9 लाख. तेथील बाहासा (म्हणजे भाषा) इंडोनेशियनमध्ये संस्कृतमधील बरेच शब्द आहेत. लगतच्या ब्रुनेई देशाच्या राजधानीचे नाव बंदर सेरी बगवान (बंदर श्री भगवान थोडक्यात हनुमान) आहे असे समजले.

इंडोनेशियन अतिथ्यशील आहेत. त्यांच्या आतिथ्यशीलतेने मी भारावून गेलो.

दुसऱ्या दिवशी माझे 'वित्त, तंत्रज्ञान आणि गरिबी निर्मूलन' या विषयावर प्रमुख भाषण होते. भाषणात भारतात मोदी सरकारने अलीकडील काळात घेतलेल्या काही निर्णयांचा आधार घेत मी या तीन विषयांची कशी सांगड घालता येईल ते निवेदन केले. गरिबी आणि श्रीमंती यात मोठी दरी इंडोनेशियात आणि आफ्रिकेतील देशात आढळून येते ती कशी कमी करता येईल असा एक प्रश्न मला विचारण्यात आला. हा कमी जास्त प्रमाणात जगभरातलाच प्रश्न आहे; परंतु मोदी सरकारने घेतलेले काही निर्णय ही दरी कमी करण्यात उपयोगी ठरू शकतील. त्यामुळे भारताचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवता येईल असे मी सांगितले. 

श्रीमंत असणे हा काही गुन्हा नाही. संपत्ती वैध मार्गानी मिळवली असली म्हणजे झाले. यावर मोदी सरकारने चार उपाय केले.

  1. बेनामी संपत्ती कायदा बदलून अशी संपत्ती आढळल्यास ती सरकार जमा होईल.
  2. ठराविक मर्यादेपलीकडे सोने खरेदी रोकडीने करता येणार नाही.
  3. भारतीयांनी परदेशात उघडलेल्या बँक खात्याची तसेच इतर संपत्तीची माहिती भारत सरकारला ती सरकारे देतील. यासाठीच मोदी सुरवातीची दोन वर्षे अशा देशांचा दौरा करत होते जिथे भारतीयांनी संपत्ती दडवली होती.
  4. रोकडीत जमा केलेला काळा पैसा, चलन बाद करून बँकेत जमा करायला लावणे. यासाठी बँक अकाउंट असणे भाग होते त्यामुळे सर्वप्रथम मोदींनी बँक खाती उघडण्यावर भर दिला.

जवळपास ९९ टक्के कुटुंबे आता अधिकृत बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली असल्याने पैसे खात्यावर सरळ जमा होऊ शकतात व गरीबाच्या खात्यावर जातात. रोकडीने मजुरी देताना (उदा. मनरेगा योजने खाली) होणाऱ्या भ्रष्ट्राचाराला त्यामुळे साहजिकच आळा बसतो व गरीब कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारते. शिवाय खात्यात जमा झालेल्या पैसा अवैध असल्याचे आढळल्यास कर खात्याचा बडगा आहेच. भीम अॅपने पैसे मोबाईलद्वारेही कसे पाठवता येतात व वित्तीय कारभार जसजसा तंत्रज्ञान वापरून होईल तसतसा भ्रष्टाचाराला आळा बसेल हे सांगितले. श्रोत्यांनी भारत सरकारच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

या लेखाशी सुसंगत YouTube व्हिडिओ:

दुसरा दिवस रविवार असल्याने मोकळा होता. तुम्हाला काय बघण्याची इच्छा आहे अशी विचारणा केल्यावर मी ऐतिहासिक ठिकाणे बघणे आवडेल, असे सांगितले. मला ते प्राध्यापक आणि परिषदेचे आयोजक जवळच असलेल्या पांजी संग्रहालयात घेऊन गेले. या संग्रहालयाचा मार्गदर्शक अकबर अली याने मोठ्या हौसेने महाभारत आणि रामायणामधील विविध प्रसंगावर आधारित अनेक कलाकृती दाखविल्या. पांडव आणि कृष्णा, रावण आणि हनुमान, ८०० वर्षापूर्वीचा गणेश, आणि विष्णू आणि बरेच काही (सोबत फोटो जोडले आहेत). पर्यटन विषयाची एक प्राध्यापिकाही आमच्यासोबत होती. या संग्रहालयाची माहिती जगभर गेल्यास बरेच पर्यटक येथे येतील आणि संग्रहालयाला चांगली प्राप्ती होऊ शकेल असे असताना याची माहिती का उपलब्ध नाही असा प्रश्न मी विचारला. आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे हे संग्रहालय खाजगीच आहे. आमचे विद्यापीठ याला सहाय्य देते, असे त्या म्हणाल्या. मालांगला जाणाऱ्या पर्यटकांनी येथे जरूर भेट द्यावी. परिसरही उत्तम आहे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास चांगली जागा आहे. बाजूलाच नदी आणि जंगल परिसर आहे.

त्यानंतर अजून एका पुरातत्व परिसराला मला घेऊन गेले. या ठिकाणाबाबतची माहिती पर्यटन विषयीच्या जपानी पुस्तकात असल्याचे सोबतच्या जपानी प्राध्यापकांनी मला दाखवले. तेथे देवीची एक भग्न सुमारे सात फुटी मूर्ती होती. शीर उडवलेले होते. हे कोणी बरे केले? असा प्रश्न मी विचारला. त्यावर कदाचित ते विकून पैसे मिळवण्यासाठी कोणीतरी ते चोरले असावे असे उत्तर मिळाले. पण कोणी फक्त शीर चोरले यावर विश्वास ठेवणे अवघड वाटते. जुन्या मूर्ती चोरून विकण्याचा जगभर धंदा चालतो हे सर्वश्रुत आहेच. हा अलीकडीलचा पराक्रम का शेकडो वर्षपूर्वीचा या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळू शकले नाही. आणखीही बरीच ठिकाणे जवळपास आहेत पण वेळेअभावी आम्ही जाऊ शकलो नाही.

परिषदेच्या निमित्ताने झालेली इंडोनेशियाची भेट बरेच कुतूहल जागृत करून गेली. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर सहल करण्यासाठी इंडोनेशिया हे एक चांगले ठिकाण आहे असे म्हणायला हरकत नाही. सुमारे तेराव्या शतकानंतर तेथे इस्लाम धर्माने प्रवेश केला. त्याआधी तेथे हिंदू आणि बुद्ध धर्म प्रचलित होता. आता फुटाफूटांवर मशिदी आहेत. चुकून बाटु शहराच्या वाटेवर एक गणेश मंदिर दिसले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत येथे मुस्लिम स्रियाही बुरखे घालत नव्हत्या, असे समजले. पण आता सर्वत्र हिजाब/बुरखाधारी महिला दिसतात. अजूनही आपले मूळ हिंदू संस्कृतीत आहे, असे येथील मुस्लिमही मानतात. भारतात आज कोणी कृष्णा द्वैपायन नावाने विद्यापीठ काढायचे म्हटले तर काही लोकांचा पोटशूळ उठेल. परंतु विद्या, अन्नदेवी, अर्जुन, कृष्णा नावाचे मुस्लिम स्त्री पुरुष अजूनही इंडोनेशियात आहेत हे विशेष. बोरोबुदूर, आणि योग्याकर्ता येथे प्रसिद्ध हिंदू आणि बुद्ध धर्मीय अवशेष आहेतच. पण मालांग मधेही त्याची छाप एका छोट्याश्या भेटीत दिसली याचे समाधान वाटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com