महाराष्ट्राच्या जयघोषाने दुमदुमला टाइम्स स्क्वेअर

पल्लवी महाजन
शुक्रवार, 5 मे 2017

''यंदाच्या महाराष्ट्र दिवसाचे विशेष महत्त्व होते. यंदा मराठी आणि गुजराती बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करत होते. या दिवशी दोन्ही राज्यातील बांधव आपल्या संस्कृतीचं, भाषेचं कौतुक सगळ्या जगाला दाखवू पाहत होते. दांडियाचा नृत्य अविष्कार आणि ढोल ताशाच्या गजराने न्यूयॉर्क परिसर सैराट झाला होता. परदेशी नागरीकही लेझीम आणि ढोलाच्या ताशावर थिरकत होते. नऊवारी साडीमध्ये मुलींची लेझीमशी साथ अतिशय देखणी होती. फुगडीचा अनुभव घेण्याचा मोह कुणालाही आवारात येत नव्हता. फेटे आणि नऊवारी साजातल्या सर्वांबरोबर छायाचित्र घेण्यासाठी परदेशी लोक गर्दी करत होते...''

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर साजऱया झालेल्या महाराष्ट्र दिनाबद्दल अमेरिकेहून पल्लवी महाजन यांचा स्पेशल रिपोर्ट

निमित्त होतं महाराष्ट्र आणि गुजरात दिनाचं. न्यूयॉर्कच्या उंच इमारतींच्यामध्ये भगवा डोलाने फडकत होता. 'जय महाराष्ट्र'च्या घोषणेने सारा टाइम्स स्क्वेअर परिसर दुमदुमत होता. सारे उपस्थित असलेले भारतीय आणि परदेशी बांधव लेझीम आणि ढोल ताशाच्या ठोक्यावर ताल धरत होते. लेझीम, ताशा, ढोल, झांन्झ यांचा सलग दोन तास गजर चालू होता तेही न्यूयॉर्कमध्ये.

न्यूयॉर्क आणि टाइम्स स्क्वेअर हे सगळ्यांचं आकर्षण. जगातले सर्वच लोक अमेरिकेत आले की न्यूयॉर्कला भेट देतात. अशा ठिकाणी भारताच्या संस्कृतीचं प्रदर्शन करण्याची संधी मिळाली ती 'जय भारत ढोल ताशा पथक अमेरिका' यांच्यामुळे. अमेरिकेत वास्तव्य असलेले पुण्यातील श्री वसंत माधवी यांनी मे 2013 मध्ये या पथकाची स्थापना केली आहे. पथकात अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी व इतर अनेक भागातील भारतीय बांधव आहेत. पथकात सगळीच वाद्य आणि यासंबंधीचे साहित्य भारतातून अमेरिकेत मागवण्याचा काम माधवी यांच्या प्रयत्नामुळे अतिशय सुकर झालं आहे. जय भारत ढोल ताशा पथक हे अमेरिकेतील सर्वांत पहिलं पथक आहे. पथकातील सर्वच मंडळींचा उत्साह दांडगा आहे.

भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम हे पथक गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या पथकाचा सर्व कारभार कोणत्याही नफ्याशिवाय केला जातो. पथकाला मिळालेली देणगी ही भारतातील व अमेरिकेतील सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. मोठ्या हिमतीने माधवी यांनी हे पथक सुरु केलं आहे. सर्व वाद्यं आणण्यापासून ते सगळे तालीम घेण्याचं कामही ते आणि त्यांचं कुटुंबीय बघतात. तसेच सगळ्यांना एकत्र आणून सतत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं कुटुंब झटत असते. त्यांचं घर म्हणजे या पथकाचे सर्वस्व झालं आहे. इथे स्थायिक असलेल्या बऱयाच ज्येष्ठ मंडळींनी त्यांना या कामात सुरवातीपासून साथ दिली आहे. महाराष्ट्र दिन तसेच अनेक भारतीय कार्यक्रमांमध्ये मराठी संस्कृतीची छाप उमटवण्याचं काम हे पथक करत आलेलं आहे. 

यंदाच्या महाराष्ट्र दिवसाचे विशेष महत्त्व होते. यंदा मराठी आणि गुजराती बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करत होते. जसा हा महाराष्ट्र राज्याचा दिवस आहे तसाच तो गुजरात राज्याचा पण स्थापना दिवस आहे. हा १९६० पासूनचा भारतीय संविधानाने घडवून दिलेले इतिहास सर्वांना ज्ञात आहे. या दिवशी दोन्ही राज्यातील बांधव आपल्या संस्कृतीचं, भाषेचं कौतुक सगळ्या जगाला दाखवू पाहत होते. दांडियाचा नृत्य अविष्कार आणि ढोल ताशाच्या गजराने न्यूयॉर्क परिसर सैराट झाला होता. परदेशी नागरीकही लेझीम आणि ढोलाच्या ताशावर थिरकत होते. नऊवारी साडीमध्ये मुलींची लेझीमशी साथ अतिशय देखणी होती. फुगडीचा अनुभव घेण्याचा मोह कुणालाही आवारात येत नव्हता. फेटे आणि नऊवारी साजातल्या सर्वांबरोबर छायाचित्र घेण्यासाठी परदेशी लोक गर्दी करत होते.

भारतीय दूतावासाचा या सगळ्याला उत्तम पाठिंबा होता. न्यूयॉर्क पोलिसांना आम्हा सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तम पार पडली होती. या सगळ्या कार्यक्रमात सर्व भारतीय बांधवाची शिस्त आणि एकजूटही पाहायला मिळाली. अमेरिकेतील स्थानिक भारतीय टीव्ही वाहिन्यांनीही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी पार पडली होती.

सगळ्या महाराष्ट्राची मान उंचववेल असा हा देखणा महाराष्ट्र दिन देशापासून दूर राहूनही दिमाखात साजरा केल्याचं समाधान सुखावून टाकणार होतं.

जय महाराष्ट्र ,जय हिंद!!