ये जो पब्लिक है वो सब जानती है
ये जो पब्लिक है वो सब जानती है

ये जो पब्लिक है वो सब जानती है

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी 8 नोव्हेंबर, 2016 या दिवशी होऊ घातलेल्या निवडणुकीचे पडघम गेले कित्येक महिने वाजत आहेत. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्‍लिंटन या प्रमुख उमेदवारांकडून प्रचाराचा तारस्वर लागला आहे.

डोनाल्ड ट्रम्पच्या एकाही शब्दावर अमेरिकन मतदारांनी विश्वास ठेवावा असं वातावरण मात्र अजूनही आहे का? याची शंका वाटते. गेली कित्येक वर्षे महिलांविषयी आक्षेपार्ह शब्दच नाहीत, पण परस्रियांशी आक्षेपार्ह वर्तणुक करून त्याचा अभिमान बाळगणाऱ्या या विकृत मनोवृत्तीच्या इसमाला पाठिंबा देणाऱ्या कोणाही व्यक्तीला स्वत:चीच लाज वाटली पाहिजे. ज्या हिंदू धर्माची विचारधारा "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' ही आहे, त्या हिंदू धर्माची प्रशंसा डोनाल्ड ट्रम्पच्या तोंडात शोभत नाही. जरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की "दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र (रशिया) बरा' तरीही 1962 च्या भारतावरच्या चिनी आक्रमणाच्या वेळेस रशियाने घेतलेली भूमिका भारताने आणि भारतीयांनी कधीही विसरू नये. त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी रशियाकडे मदतीसाठी केलेल्या याचनेची रशियाचे तत्कालीन अध्यक्ष निकिता ख्रुश्‍चेव यांनी 'India is our friend, but China is our brother' या शब्दात बोळवण केली होती. अशा बेभरवशाच्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याच हुकुमावरून आज अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ढवळाढवळ करण्यापर्यंत रशियाची मजल गेली आहे. का? तर पुतिनच्या हातातलं बाहुलं असलेला डोनाल्ड ट्रम्प्‌ अमेरिकेच्या अध्यक्षपदी "निवडून' यावा. ज्या डोनाल्ड ट्रम्पनं 1995 मध्ये मोठा financial loss 'दाखवून' गेली 18-19 वर्षे income tax भरणंदेखील टाळलं आहे, अशा व्यक्तीवर मतदारांनी का विश्वास दाखवायचा?

हिलरी क्‍लिंटन यादेखील धुतल्या तांदळासारख्या व्यक्ती मुळीच नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवपदी बसल्यानंतर कामासंबंधीच्या ई-मेल्स्‌ आणि कामाबाहेरच्या ई-मेल्स्‌ या वेगळ्या ठेवून आवश्‍यक तिथे electronic security firewalls ठेवल्याच पाहिजेत हे न कळण्याइतक्‍या बालबुद्धीच्या त्या नक्कीच नसाव्यात. के.जी.बी. आणि रशियन हॅकर्स हे काय प्रकारचं हॅकिंग्‌ करू शकतात याची कल्पना CIA आणि FBI यांनी क्‍लिंटनबाईंना नक्कीच पदभार स्वीकारण्या अगोदरच दिली असणार. दिली नसली तरीही US Presidential Security नं प्रेसिडेण्ट ओबामा यांच्याकडून 20 जानेवारी, 2009 पूर्वीच, म्हणजे त्यांची पहिली अध्यक्षीय कारकीर्द सुरू होण्याआधीच, त्यांचा BlackBerry phone ज्या कारणांसाठी काढून घेतला होता, त्यावरून तरी हिलरी क्‍लिंटननी बोध घ्यायचा! हे ई-मेल्स आणि खासगी ई-मेल सर्व्हरचं प्रकरण आता परत एकदा अंगाशी आल्यावर, निवडणुकीला चार दिवस राहिले असताना प्रेसिडेण्ट ओबामांपासून डेमोक्रॅटिक्‌ पक्षाची नेतेमंडळी हिलरी क्‍लिंटन निवडून याव्यात म्हणून अमेरिका पिंजून काढत आहेत. ओबामा वर्तमान अध्यक्ष असल्यानं त्यांच्या प्रवास आणि सुरक्षेसाठीच्या खर्चासाठी सरकारी तिजोरी (करदात्यांचाच पैसा) वापरली जाते, हे काही वेगळं सांगायला नको. जगातल्या एकमेव महासत्तेची परराष्ट्रसचिव असूनही जी व्यक्ती electronic communications बद्दल इतकी गलथान राहते, अशा व्यक्तीवर मतदारांनी कसा आणि किती विश्वास दाखवायचा?

दु:ख एकाच गोष्टीचं आहे, की या निवडणुकीत अमेरिकन मतदारांसमोर better of the worst candidates निवडण्याचं मोठं आव्हान आहे. या निमित्ताने 1974 च्या "रोटी' चित्रपटातलं "ये जो पब्लिक है वो सब जानती है' हे गाणं नक्कीच खरं असल्याचं जाणवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com