भारतातील अपघात आणि अमेरिकन व्यवस्था

Nilesh Mate Article about traffic
Nilesh Mate Article about traffic

नुकतीच पुण्यामध्ये बाणेर येथे घडलेल्या अपघाताची बातमी वाचण्यात आली. रोज कुठल्या ना कुठल्या अपघाताचीची बातमी असतेच आणि त्यामध्ये बळी गेल्यांची संख्या.. पण हे अपघात का होतात ह्याची कारणे बातमीत येत असली तरी त्याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. मी भारतामध्ये जवळपास ५ वर्षं गाडी चालवलीय आणि नंतर अमेरिकेमध्ये मागील दीड वर्ष चालवत आहे. मला आता दोन्ही ठिकाणचे फरक स्पष्टपणे समजत आहेत. 

एक जाणवते की आपल्याकडे रस्ते चांगले आहेत, पण सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून जी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी ती घेतलेली दिसत नाही. अमेरिकेमध्ये काही नियम आहेत ज्यामुळे इथले रस्ते सुरक्षित आहेत. गाडी चालवण्यासाठी ते भारतातही लागू होऊ शकतात असे वाटते. आपण काही उदाहरणे बघू : 

  1. पहिलं आहे स्पीड लिमिट जे अमेरिकेमध्ये प्रत्येक रस्त्यांवर पाळावं लागतं. त्यामुळे सगळ्या गाड्या एकाच वेगाने धावत असतात. 
     
  2. गाड्यामध्ये समान आंतर ठेवता येते. समोरची गाडी आपल्याजवळ किती सेकंदांमध्ये येईल याचा अंदाज करता येतो. आणि आपल्याला पोचायला किती वेळ लागेल ह्याची चिंता कमी होते. भारतामध्ये सुद्धा जर स्पीड लिमिट सिस्टम (वेग मर्यादा प्रणाली) लागू केली तर वरील फायदे मिळू शकतात. 
     
  3. आणखी एक उदाहरण आहे ते स्टॉप साइन (थांबा चिन्ह) - अमेरिकेमध्ये जरी बाकीच्या रस्त्यांवर कोणी नसलं तरी प्रत्येक चौकात स्टॉप साइन जवळ कमीत कमी ३ सेकंद थांबावं लागतं. त्यामुळे चौकामध्ये होणारे अपघात वाचतात आणि वाहतूक सुरळीत चालू राहते. तसेच सिग्नलची संख्या कमी होते. आपल्याकडे खूप अपघात होतात ते ह्या एका कारणामुळे, मग ते शहरातले चौक असू द्या, नाहीतर हायवेवरचे. 
     
  4. हायवेवरील क्रॉसिंग : आपल्याकडे हायवेला खूप क्रॉसिंग दिलेले असतात, काही मान्यताप्राप्त काही परवानगीशिवाय. त्यामुळे गाड्या थेट मुख्य रस्त्यावर येतात. आणि त्यामुळे मागून येणार्‍या गाडीला अपघात होण्याची शक्यता वाढते. अशी क्रॉसिंग्स काढून टाकली पाहिजेत. 
     
  5. पुढचं उदाहरण आहे पिवळ्या सिग्नलची वेळ. अमेरिकेमध्ये गाडी चौकाच्या मध्ये असताना सिग्नल लाल होणे म्हणजे गुन्हा नाही, आणि पिवळ्या सिग्नलची वेळ जास्त असते, त्यामुळे लोक आरामात पूर्ण सिग्नल क्रॉस करतात, याउलट आपल्याकडे पिवळा सिग्नल खूप कमी वेळ असतो, त्यामुळे वाहनचालक सिग्नल क्रॉस करायला घाई करतात, आणि अपघात होतात. 
     
  6. अजून एक मोठा फरक आहे तो हिरव्या सिग्नलचा, अमेरिकेत दोन प्रकारचे हिरवे सिग्नल आहेत एक हिरवा बाण असलेला आणि दुसरा पूर्ण हिरवा असलेला. फरक हा आहे की जेंव्हा हिरवा बाण चालू असेल तिकडे बिनधास्त जायचे आणि पूर्ण हिरवा दिवा लागला की समोरच्या रस्त्याचावरून येणार्‍या गाड्यांनाही हिरवा सिग्नल असतो आणि जे लोक सरळ जाणार आहेत त्याना प्राथमिकता असते. जे वळणार आहेत त्यांना जोपर्यंत समोरून येणार्‍या गाड्या संपत नाहीत तोपर्यंत थांबावं लागतं. लोक बिनधास्त चौकामध्ये गाड्या नेऊन थांबतात, याउलट आपल्याकडे फक्त एकाच बाजूचा सिग्नल चालू असतो आणि कधीतरी सगळेच थांबलेले असतात.. आणि त्यामुळे लोक कधी सिग्नल हिरवा होतोय ह्याची वाट पाहतात, आणि काही सिग्नल पाळत नाहीत. जर आपल्याकडे वर दिलेल्या सिग्नल प्रणाली सारखा बदल झाला तर रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असे वाटते, त्यासाठी उड्डाण पूल असायला पाहिजे असे काही नाही. 

अशी भरपूर उदाहरणे देता येतील की ज्यामुळे रस्ते सुरक्षित होऊ शकतील, एका माहिती नुसार भारतात दर चार मिनिटं मध्ये एक बळी जातो. बर्‍याच वेळा अपघात हे मानवी चुकी मुळे होतात असे दिसते कारण आपल्याकडे लाइसेन्स मिळणे खूप सोपे आहे, त्यामुळे तुम्हाला वाहन चालवायला परवाना मिळालाय ह्याची किंमत काय आहे हे जाणवत नाही, समजा नियम मोडला तर थोडेसे पैसे दिले के काम झाले हा समज पुढे अपघात होण्यास कारणीभूत ठरतो.

आमच्या पुण्यातील सोसायटीमध्ये छोटी मुलेसुधा ५०-७० च्या वेगाने गाडी चालवतात, आणि त्यांच्या पालकांना त्याचा अभिमान वाटतो. अमेरिकेमध्ये छोट्या गल्ल्या आणि सोसायटीत २५ किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची परवानगी नाही. आणि १६ वर्षांखालील मुलांना गाडी चालवायला परवानगी नाही. १८ वर्षांपर्यंत पालक बरोबर असणे गरजचे आहे. ड्राइविंगची लेखी परीक्षा एवढी अवघड आहे की कमीत कमी आठ दिवस अभ्यास करावा लागतो. जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत राहत नाही म्हणूनच असे अपघात घडतात आणि नाहक बळी जातात. लहान मुलंही मोठ्यांना बघून त्यांचा अनुकरण करतात, त्यामुळे प्रत्येक पालकाची ही जबादारी आहे की आपण स्वतः नियमांचे पालन करावे म्हणजे आपली मुलेसुधा करतील. जेवढी जबबदारी सरकारची आहे तेवढीच आपली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com