β चीनचा 'ड्रॅगन' चौखूर का उधळला?

β चीनचा 'ड्रॅगन' चौखूर का उधळला?

एखाद्याविषयी फार स्तुती ऐकण्यात यावी आणि खरंच तो तितका असेल का, अशी असूयामिश्रित शंका यावी आणि जसजसं तुम्ही भेटत जाल, तसतसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडत जावे आणि स्तुतीच्या खरेपणाची खात्रीच नव्हे, तर त्यावर लोभ जडावा, असा चीन आहे. चीन आपला फार लाडका शेजारी नाही; पण आज भारताचे किती शेजारी खरे मित्र आहेत? आणि एक पश्‍चिम युरोपचा अपवाद वगळता जगाचा असा कोणता भाग आहे, जिथे देशादेशांत तंटे नाहीत? 

कुठलाही गाजावाजा न करता पडद्यामागे तयारी करून एकदम डोळे विस्फारतील, असे प्रयोग करणे हे चीनचे वैशिष्ट्य आहे, हे मला त्या देशाच्या तिसऱ्या-चौथ्या भेटीनंतर कळू लागले. हे बघत असताना त्यासाठी लागणारी तयारी, मनुष्यबळ, आर्थिक तयारी, आंतरराष्ट्रीय मान्यता, गुणवत्तेची आवड, स्पर्धा तयारी आणि मुख्य म्हणजे देशासाठी करावा लागणारा त्याग या गोष्टी दिसत गेल्या आणि हे प्रकरण साधे नोहे हे कळले. 

सिंगापूरने भव्य दृष्य उभे करणे, शिस्तबद्ध आणि तरीही लोकप्रिय असा देश उभा करणे अवघड असले तरीही चीनचा विचार केला तर हे तुलनात्मक सोपे आहे. त्यात अफाट लोकसंख्याच नाही, तर 6000 वर्षांची संस्कृती आणि बांधीव समाजाला आधुनिक वळण लावणे, यासारखे अवघड धनुष्य उचलणे हे आहे. सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मानले गेले होते, की 1985 पासून सुसाट सुटलेला चीन 2005 पर्यंत स्वत:च्या अजस्त्र वजनाखाली कोलमडेल आणि तोपर्यंत भारत त्याला गाठून तिथून पुढची वाटचाल करेल आणि एक फार मोठा उत्पादक देश होईल. दुर्दैवाने झाले असे, की अंतर्गत राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक या सर्व आघाड्यांवर भारताने हाती आलेल्या संधीचे सोने केले नाही. उलट ‘महाकाय शरीर झाल्यानंतर काय करून ते तसेच वाढवावे,‘ याचा योग्य विचार करून चीनने तो अंमलात आणला आणि आज भारत अजूनही चीनच्या ‘जीडीपी‘च्या फक्त 20% एवढा आहे. भारताने संधी गमावली; पण ती पूर्ण निसटलेली नाही. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी आमूलाग्र बदल मात्र आवश्‍यक आहेत. 

सामाजिक आणि आर्थिक गुंतागुंत 
पहिल्या चीन भेटीमध्ये शांघायने डोळे दमवले. इतके, की दुसरे काही बघण्याची इच्छाच उरली नाही. मग नंतरच्या भेटीत शांघायला पूर्ण बाजूला ठेवून अंतरंग बघायचे ठरवले आणि हा अमेरिकेला का धडकी भरवतो आहे, हे कळले. तिबेट, शिंझियांग आणि इनर मंगोलिया हे प्रदेश सोडले, तर चीनने स्वत:ला अंतर्बाह्य बदलले आहे, हेही कळले. हे सर्व अकस्मात झालेले नाही. त्यासाठी 1980 पासून तयारी केली गेली होती; पण एक जाऊन दुसरा अध्यक्ष आला तरीही दिशा एकच ठेवली गेली. आज बीजिंग, शांघाय, निन्ग्बो, हुआंगझाऊ, गुआंगझाऊ, चेंगडू, लोन्गायू, वूहान, चोनग्किंग, तियानजिनसारखी अजस्त्र शहरेच नव्हे, तर पूर्वीची खेडीही दिमाखात वैभव दाखवितात. चीनी माणसाला कामाचे आणि खाण्याचे वेड आहे. हा शासनाच्या पथ्यावर पडणारा गुण आहे. धार्मिक बाबी समूळ काढून टाकल्याने आज तो समाज फक्त काही सांस्कृतिक बाबीवर समाधान मानतो. त्यामुळे तेथील कामगार असो की पांढरपेशा वर्ग असो, कामात असताना चीनी माणूस फक्त कामच करतो. युरोपीय, अमेरिकी, जपानी कंपन्यांना चीनमध्ये कंपन्या स्थापन करताना फारशी अडचण झाली नाही. ‘आर्थिक बाजू सांभाळली, की कौटुंबिक बाजू उभी राहते‘ हे सूत्र समोर ठेवून चीनमधील नवी पिढी फक्त काम एके काम करते. भारतातील गुंतागुंतीची सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अडसर मानली जाते. 

सर्व छोट्या आणि न मिळणाऱ्या वस्तूंचे उत्पादन 
वानगीदाखल सांगतो.. छोट्या मोटर्स घ्या, रिफ्लेक्‍टर बाउल्स घ्या, ऍल्युमिनियम प्रोफाईल, प्लॅस्टिक पार्टस, मोबाईल पार्टस, शेतीवर्गातील लागणाऱ्या गोष्टी, टेस्क्‍टाईल पार्टस, फार्मा रॉ मटेरियल, प्रिंटिंग, विविध मशिन्सचे पार्टस.. तेही वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या वैशिष्ट्‌यांच्या बॅटरी आणि इतर अनंत ग्राहकोपयोगी वस्तू.. यावर ‘आम्हाला हे अगदी असंच हवं होतं‘ अशी ग्राहकाची प्रतिक्रिया उमटते. हे एका वर्षात झालेले नाही. 1980 च्या दशकात इंग्रजीचा गंधही नसताना जागतिक पातळीवर काय लागते हे शोधले गेले, योग्य व्यक्तींना त्यांच्या आयुष्याची खात्री देऊन कामाला लावले गेले. आज चीन इतके पुढे गेले आहे, की युरोप, अमेरिका, जपान, ब्राझील सगळे हतबल आहेत. आधी छोट्या छोट्या वस्तूंचे उत्पादन करत करत चीनने आज खूप अवघड इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनेही करत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर भारताची सर्वांत मोठी आयात म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादने आहेत. 

आपल्याकडे दिवाळीत लागणाऱ्या आकाशकंदिलांच्या मागणीचा आढावा चीनने कधी घेतला आणि त्यांनी तयार केलेले आकाशकंदिल इथे येऊन कधी धडकले, याचा पत्ताही लागला नाही. याउलट आपण स्वत:ची उणी-दुणी काढण्यामध्ये इतके मग्न आहोत, की दुसऱ्या देशात सोडा, आपल्याच देशाच्या पूर्वोत्तर भागात काय लागते याचा पत्ताच नाही. 

देशव्यापी विचार 
चीनमध्ये विविध प्रांत असले आणि ते स्वायत्त असले, तरीही गुंतवणूक, धरणे, उद्योग उभारणी, जमीन हस्तांतरण, वीज, कर इत्यादी गोष्टींत एकदा केंद्राने निर्णय घेतला, की त्यात अडथळा आणण्याचा प्रश्‍नच नसतो. कारण धाकच पुरेसा असतो. या पार्श्‍वभूमीवर भारतातील अनागोंदी विकसित देशांना नकोशी वाटते. 1930 ते 1950 च्या क-ालावधीमध्ये चीनने मॅंडरिन या भाषेला राष्ट्रीय दर्जा देऊन तिला देशभर पसरविले. त्यामुळे प्रादेशिक वाद खूपच कमी आहेत. 

या बाबतीतही भारत डावा ठरतो. इंग्रजीमुळे भारतामध्ये खूप मदत होत असली, तरीही प्रादेशिक वाद तीव्र आहेत. हे वाद बघून परदेशी माणूस अवाक होतो. कुठल्याही चीनी माणसाने दुसऱ्या प्रांताला नावे ठेवल्याचे माझ्याही पाहण्यात नाही. त्यामुळे औद्योगिक स्थलांतर हा अजिबातच प्रश्‍न असतो. आपली कथा बघा.. ‘पॉस्को‘सारख्या अवाढव्य कंपनीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सोडून भारतातील काम गुंडाळून आता दुसरीकडे नेला. 

राजकीय, प्रादेशिक आणि धार्मिक कंगोरे 
या बाबतीत चीनने आधीपासून कडक धोरण स्वीकारले आणि अंमलात आणले. काम करा आणि मजा करा.. समाजप्रबोधन, समाजकारण करायचे असेल, तर कम्युनिस्ट पक्षात या आणि योग्यता असेल, तर वर चढा असे येथील सूत्र आहे. त्यासाठी बहुतेक सार्वजनिक ठिकाणी गुप्तहेर लक्ष ठेऊन असतात. हे योग्य आहे की नाही, हा भाग निराळा. पण 150 राजकीय पक्ष, त्याहून अधिक ‘एनजीओ‘, प्रत्येक पक्षाची एक कामगार संघटना आणि प्रशासकीय स्तरावरचा भ्रष्टाचार हे भारतातील दृष्य कितपत योग्य आहे, हे विचार करण्याची वेळ आहे. 

बंगालमध्ये दिसणारे भीषण दारिद्य्र आणि अरब देशातून आलेल्या पैशांतून आलेली केरळमधील सुबत्ता ही उत्तम उदारणे आहेत. केरळमध्ये कम्युनिस्टांच्या अरेरावीमुळे आता एकही उद्योजक नाही आणि ‘झाड वाढले, तरच फळ मिळेल‘ ही समज बंगालमध्ये नाही. चीनचा कम्युनिस्ट अवतार पाहिला, की ‘हा एक पक्षीय भांडवलवाद आहे की काय‘ असा प्रश्‍न पडतो. तिथे कधीच टाळेबंदी नसते. तोच प्रकार स्त्री-पुरुष समानता आणि फॅशन असल्या विषयात.. तिथे स्त्री स्वतंत्र आहेच; पण त्यासाठी टीव्हीवर आरडाओरडा करावा लागत नाही. आर्थिक स्तर उंचावल्याने आणि प्रत्येक जण कामात मग्न असल्याने कोण फॅशन करत आहे आणि ते आपल्या संस्कृतीला कसे घातक आहे, वगैरे चर्चाच नसते. 

किंमत नियंत्रण 
युरोप, जपान आणि अमेरिका यांचा नेहमीचा ठोकताळा होता की एकदा समाज विकसित झाला, की आपोआप आर्थिक स्तर उंचावून किंमती वाढतात आणि उत्पादन दुसऱ्या देशात न्यावे लागते. याही बाबतीत चीनने अक्षरश: सर्वांना चक्रावून टाकले. बाकी सोडा.. भारतामध्ये ‘3 स्टार‘ हॉटेलमधील एका खोलीचे भाडे हे चीनमधील ‘7 स्टार‘ हॉटेलपेक्षा जास्त आहे. तोच प्रकार इंटरनेट आणि इतर सुविधांबाबत. याचे मूळ आहे ते दोन-तीन गोष्टींत. एकतर कुठलीच गोष्ट संख्येने लाखोंच्या खाली बनवायचीच नाही; त्याचा उपयोग किंमत नियंत्रणासाठी होतो. यासाठी लागणारी सर्व यंत्रणा तयार असते. एवढेच नव्हे, तर कित्येक उत्पादक हे बाह्य भाग बनवून अंतर्गत भाग हे एकसारखे ठेवून एकाच कडून घेतात. दुसरे म्हणजे लोकांचा सहभाग. आपल्याला आपला देश पुढे न्यायचा असेल, तर मान मोडून काम करावे लागेल, हे त्यांना सांगावे लागत नाही. त्यामुळे कित्येक लोकांनी 2008 आणि 2015 च्या मंदीत आपले बोनस सोडून दिले. याचा फायदा सर्वांना झाला, हे समजण्याइतके हा समाज प्रगल्भ आहे. याचा परिणाम म्हणजे आज जर्मनीच्या 80% सोलर पॅनेल कंपन्यांची मालकी आज चीनी उद्योजकांच्या ताब्यात आहे. कारण जर्मन उद्योजकांना तिथला खर्च आणि उत्पादनांची किंमत यावर ‘कंपनी दिवाळखोर होईल‘ अशी स्थिती होती. याचा अर्थ जर्मनीने आपले स्थान सोडले, असा नाही; तर काही विशिष्ट उत्पादनात ते टिकू शकले नाहीत. तिसरे म्हणजे, निर्यात करणाऱ्यांना दिले जाणारे सहकार्य. प्रशासकीय स्तरावर आज चीन कुठल्याकुठे पोचला आहे; तर आपण अजूनही 200 वर्षे जुन्या जोखडात आहे. 

युआनचे रहस्य 
चीनचे चलन हे एक कोडेच आहे. ते कृत्रिमरित्या त्या स्तरावर ठेवलेले आहे. निर्यात कमी झाली, की ते युआनला डॉलरच्या तुलनेत खाली आणतात. ग्राहकांना त्याचा थेट फायदा होतो. त्यामुळे होणारे नुकसान सरकार हस्तक्षेप करून भरून काढते. भारत हे करू शकत नाही; कारण आता भारतीय बाजारपेठ पूर्णत: ‘मार्केट बेस्ड‘ आहे आणि कमी करावे, तर आपली आयात ही निर्यातीपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे तेही शक्‍य नाही. 

दोन होतकरू, हुशार विद्यार्थी असतात. एकजण जुलैपासून थोडी थोडी तयारी करून मार्चमध्ये परीक्षेसाठी दिमाखात उभा राहतो आणि दुसरा आपल्याच नादात भरकटून, स्वत:चे नको तेवढे लाड करून फेब्रुवारीमध्ये रात्र रात्र जागण्याचे काम करतो.. कोण सक्षम असणार आणि कोण पुढे जाणार, हे उघड आहे..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com