गणरायापाठोपाठ माहेरवाशिणीचेही थाटात आगमन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

बेळगाव : लाडक्‍या गणरायापाठोपाठ माहेरवाशिणीचे म्हणजेच गौराईचे आगमन मंगळवारी (ता. 29) झाले. यावेळी घराघरांतील महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. तत्पूर्वी सोमवारी गौरी आवाहनासाठी बाजारात पानाच्या गौरीचे डहाळे, शंकरोबा, चाफ्याची पाने आणि वसा पूजनाच्या साहित्याने गर्दी केली होती. शहरातील गणपत गल्लीत आवाहनाचे साहित्य उपलब्ध होते. काही जणांनी मंगळवारी सकाळीही गौरी पूजनाच्या साहित्याची खरेदी केली. 

गौरीचा सण म्हणजे महिलांचा सण. विशेषत: सासुरवाशिणींचा आवडता सण. गौरी-गणपतीच्या सणात माहेरी येऊन आपल्या मैत्रिणींसोबत झिम्म्याचा फेर धरण्यासाठी त्यांचे मन आसुसलेले असते. त्यामुळे घरच्या गौरीसाठी शिदोरी पाठविली जाते. सोमवारी कुटुंबातील मुलींना सासरहून आणण्यासाठी व शिदोरी देण्यासाठीही घाई सुरु होती.

मंगळवारी घरोघरी गौरीचे आगमन झाले. त्यानंतर गौरीची स्थापना करुन गणरायासोबत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यासाठी बाजारातून गौरीचे मुखवटे, गौरीची झाडे, गौरीची पावले, रांगोळीचे छाप आदी साहित्य खरेदी करण्यात आले होते. 

बुधवारी (ता. 30) गौरीच्या जेवणाचा बेत होणार आहे. यादिवशी सुहासिनी महिला गौरीचा वसा पूजन करत असल्यामुळे बाजारात वसा पूजनासाठीचे साहित्यही विक्रीस ठेवले आहे. वसा पूजनासाठी मातीचे कुंभ, खाऊची पाने, सुपारी, काकडी, वाळूक, बदाम, खारीक, खोबरे, झाडनाडापुडी अशा वस्तूंसह सुती दोऱ्याचे कुकडे विक्रीसाठी ठेवले होते. दोन रात्रीसाठी घरी आलेल्या गौराईसाठी बाजारात अनेक वस्तू दाखल झाल्या आहेत.