‘एक गाव, एक गणपती’चा यंदाही डंकाच

हेमंत पवार
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

अनेक वर्षांपासूनचा उपक्रम कायम राबवण्यात कऱ्हाड पोलिसांना ६६ गावांत यश

कऱ्हाड - गणेशोत्सवातही गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पोलिसांकडून ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्यात येते. त्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही कऱ्हाड तालुक्‍यात प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील ६६ गावांमध्ये यंदा ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबविली आहे.

गणेशोत्सव ग्रामीण भागातील गावोगावी अनेक मंडळांच्या माध्यमातून साजरा होतो. गावोगावच्या मंडळांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केल्यास अनावश्‍यक खर्चाला आळा बसून त्यातून विधायक उपक्रम राबवता येऊ शकतात, या हेतूने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात त्याला यश मिळाले नाही.

केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर त्याबाबत जनजागृती झाल्याने आणि पोलिस दलाने कंबर कसल्याने त्याची संख्या दोन आकडी करण्यात यश आले. कऱ्हाड तालुक्‍यात अनेक वर्षांपासून ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते. यंदाही ती योजना कायम राखण्यात कऱ्हाड तालुका, उंब्रज व तळबीड पोलिसांना यश आले आहे.

कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यांतर्गत ३७, उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गत २५ आणि तळबीड पोलिस ठाण्यांतर्गत चार अशा तालुक्‍यातील ६६ गावांत यंदा एक गाव, एक गणपती ही योजना राबविण्यात आली आहे. संबंधित गावांत त्या माध्यमातून अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन विविध विधायक उपक्रम मंडळांच्या माध्यमातून राबविल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘एक गाव, एक गणपती’ योजनेंतर्गत कऱ्हाड उपविभागातील कऱ्हाड तालुका, उंब्रज व तळबीड पोलिस ठाण्यांतर्गत यंदा ६६ गावांत ही योजना राबविली आहे. तेथील मंडळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असल्याने अनावश्‍यक खर्चाला आळा बसून विधायक उपक्रम राबविण्यासाठी वाव मिळत आहे. 
- नवनाथ ढवळे, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड