कऱ्हाडकरांनी राखले कृष्णामाईचे पावित्र्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

तीन हजारांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; २४ टन निर्माल्य जमा
कऱ्हाड - गणेशमूर्तींचे कृष्णा-कोयना नदीपात्रात विसर्जन न करता तब्बल तीन हजारांवर नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन केले. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरणपूरक विसर्जन होणाऱ्या मूर्तींची संख्या यंदा तीन हजारांवर पोचली. त्याचबरोबर तब्बल २४ टन निर्माल्य जमा झाले. संवेदनशील कऱ्हाडकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत केलेले पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन कृष्णामाईचे प्रदूषण रोखण्यासही हातभार लावणारे ठरले.  

सांडपाणी, निर्माल्य, गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे ठिकाण म्हणजे नदी असे समीकरणच झाले होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे नदीपात्रातच विसर्जन केले जात होते. मात्र, कऱ्हाडमध्ये टेंभू योजनेचे पाणी अडवण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबला. त्यामुळे पाण्यामध्ये जलचर, शेवाळ तयार होवून पाण्याला दुर्गंधी येवू लागल्यावर कऱ्हाडकर जागे झाले. पाण्याच्या प्रदूषणाला नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, निर्माल्यासह अन्य बाबी समोर आल्या. नदीपात्रातच गणेशमूर्तीही विसर्जित केल्या जातात. त्यामुळे त्याला वापरण्यात येणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रंगांमुळेही नदीच्या प्रदूषणात वाढ होवू लागली. त्यावर उपाय म्हणून पर्यावरणपूरक मूर्ती, निर्माल्य विसर्जित करण्याचा उपाय पुढे आला. त्याला कऱ्हाड पालिका, एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर 

क्‍लब, अन्य संस्थांनी उचलून धरले. त्यामुळे २००६ साली सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पहिल्यांदा रुचला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत गेली. मागील वर्षी ती संख्या एक हजार ४६० वर पोचली. त्यानंतरही अथकपणे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचे फळ म्हणून यंदा कृष्णा-कोयना नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता तब्बल तीन हजारांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले. त्याचबरोबर तब्बल २४ टन निर्माल्य जमा झाले.

संवेदनशील कऱ्हाडकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत केलेले पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन कृष्णामाईचे प्रदूषण रोखण्यासही हातभार लावणारे ठरले. 

मंडळांच्या मूर्तींचेही पर्यावरणपूरक विसर्जन  
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. त्यामुळे गणेश मंडळांनीही पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद दिला. सोमवार पेठेतील त्रिवेणी गणेश मंडळ, मंगळवार पेठेतील न्यू अजंठा, कलामंच, एकता, जिजामाता, शनिवार पेठेतील नंदकुमार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पालिका कर्मचारी मंडळाच्या मूर्तींसह अन्य मंडळांच्या मूर्तींचा त्यात समावेश आहे.