विक्रमनगरात ऐक्‍याचा आदर्श जपणारा गणेशोत्सव

सुधाकर काशीद
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

तीन कॉलन्यांची एकच मूर्ती - कलानंद, त्र्यंबोली, प्रगती कॉलनीतील नागरिकांचा अनुकरणीय पायंडा
कोल्हापूर - कलानंद, त्र्यंबोली आणि प्रगती या विक्रमनगरात तीन कॉलन्या. यातील प्रगती कॉलनीत ९० टक्के रहिवासी मुस्लिम; पण या तिन्ही कॉलन्यांची एकजूट अशी की, गणेशोत्सवात तिन्ही कॉलन्यांची मिळून एकच सार्वजनिक गणेशमूर्ती.

तीन कॉलन्यांची एकच मूर्ती - कलानंद, त्र्यंबोली, प्रगती कॉलनीतील नागरिकांचा अनुकरणीय पायंडा
कोल्हापूर - कलानंद, त्र्यंबोली आणि प्रगती या विक्रमनगरात तीन कॉलन्या. यातील प्रगती कॉलनीत ९० टक्के रहिवासी मुस्लिम; पण या तिन्ही कॉलन्यांची एकजूट अशी की, गणेशोत्सवात तिन्ही कॉलन्यांची मिळून एकच सार्वजनिक गणेशमूर्ती.

मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत सगळे हातात हात घालून राबतात. आरती, रोजची पूजा, प्रसाद वाटप, गणेश मंडपाची सुरक्षा यात मुस्लिम युवकांचाही सर्वांच्या बरोबरीने सहभाग आणि वर्गणी गोळा करायची पद्धत तर अनोखीच. या तीन कॉलनीत बाहेरच्या कोणी वर्गणी मागायला यायचे नाही आणि या कॉलनीतल्याही कोणी बाहेर वर्गणी मागायला जायचे नाही.

याही वर्षी याच पद्धतीने गणेशोत्सवाची तयारी झाली आहे आणि गणेशोत्सव केवळ एका धर्माचा, वर्गणी म्हणजे जणू खंडणी, सोहळा म्हणजे डॉल्बी असे मानणाऱ्यांनी एकदा हा गणेश उत्सव पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल ३२ वर्षे याच पद्धतीने या सोहळ्याची परंपरा चालू आहे.

या तीन कॉलनीत मिळून गेट टुगेदर फ्रेंडस्‌ सर्कल आहे. नावाला साजेसे असेच हे मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. 

तिन्ही कॉलनीतील रहिवाशांना सोयीचे होईल, अशा जागी गणेश उत्सव केला जातो. प्रत्येक घरातील व्यक्तींचा प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीत सहभाग असतो. कॉलनीत मुस्लिम रहिवासी असल्याने नमाजच्या वेळी उत्सवातील गाणी, जल्लोष थांबवला जातो. विसर्जन मिरवणूक जल्लोषात फक्त तीन कॉलनीपुरतीच मर्यादित असते. कॉलनीची हद्द संपली की जल्लोष थांबवला जातो व गणपती स्वतंत्र वाहनाने नेऊन कोटीतीर्थात दान केला जातो.

वर्गणी गोळा करण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. तिन्ही कॉलनीतील रहिवाशांकडूनच स्वेच्छेने वर्गणी घेतली जाते. बाहेर कोठेही वर्गणी मागायला कोणी जात नाही व इतर मंडळांचे कोणी वर्गणी मागायला आले तर त्यालाही या कॉलनीत वर्गणी दिली जात नाही. गणेशाच्या आरतीला मान्यवरांना न बोलावता कॉलनीतील रहिवाशांनाच तो मान दिला जातो. दोन-तीन वर्षांतून एकदा तिन्ही कॉलनीत ‘चूल बंद’ कार्यक्रम म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

सोहळ्याची ओढ 
या सोहळ्याची ओढ या तिन्ही कॉलनीतील रहिवाशांना एवढी आहे की, नोकरीसाठी अमेरिकेत असलेला विनित मांजरेकर, रशियात असलेला धीरज पाटील, बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये असलेला अमर माने गणेशोत्सवासाठी हमखास कॉलनीत येतात.