विश्‍वव्यापी गणपती बाप्पा

संभाजी गंडमाळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोल्हापुरी तरुणाईचा जल्लोषात जगभरात गणेशोत्सव

कोल्हापुरी तरुणाईचा जल्लोषात जगभरात गणेशोत्सव

कोल्हापूर - ‘विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे विश्‍वव्यापीच. प्रत्येकाला तो भुरळ घालतो. आकारापासून ते विविध रंगसंगतीतील रूपांपर्यंत तो साऱ्यांनाच मोहवून टाकतो. कोल्हापुरातील काही तरुण परदेशांतून खास गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येतात; मात्र काही तरुणांनी त्या त्या देशात गणेशोत्सवाची मराठमोळी संस्कृती जपली आहे. अस्सल कोल्हापुरी जल्लोषातच ती तेथे गणेशोत्सव साजरा करतात. नोकरीच्या निमित्ताने आम्ही जगात कुठेही जाऊ. तेथील कायद्यांच्या चौकटीत राहून नक्कीच मराठमोळ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन आम्ही नक्कीच करणार असल्याच्या प्रतिक्रिया आणि तेथील गणेशोत्सवाच्या आठवणी त्यांनी ‘सकाळ’शी शेअर केल्या.

टोरांटोमध्ये हिंदू मंदिर आहे आणि तेथे हिंदूधर्मीयांचे सर्व सण-समारंभ साजरे होत असतात. मराठी कुटुंबांना मंदिरात गणेशमूर्ती उपलब्ध असतात. त्याशिवाय मंदिरातही मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. आम्ही यंदापासून घरीच इको-फ्रेंडली मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिरातील मूर्तीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने दहाव्या दिवशी होते. त्यानिमित्त भव्य मिरवणूक काढली जाते. विसर्जनाबाबतचे सर्व कायदे-नियम पाळूनच विसर्जनाचा विधी केला जातो. या निमित्ताने तमाम मराठी कुटुंबं एकवटतात. दहा दिवस आमच्यासाठी हा आनंदोत्सवच असतो.
- अपूर्वा पाटील, टोरांटो (कॅनडा)

फिजीतील लौटोका शहरात गणेश मंदिर आहे आणि तेथेच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. काही कुटुंबं स्वतः घरी मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करतात. मात्र, बहुतांश लोकांचा मुख्य उत्सव हा मंदिरातीलच असतो. दररोज सकाळी व रात्री येथे आरती आणि भजनाचे कार्यक्रमही होतात. काल मुलांसाठी चित्रकला स्पर्धा झाली. दोन सप्टेंबरला आरती थाली स्पर्धा होणार असून, तीन सप्टेंबरला पुष्परचना स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाच सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीने विसर्जनाचा सोहळा होईल आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. 
- काशिनाथ पोवार, टेक्‍नॉलॉजी मॅनेजर, एशियन पेंटस्‌, लौटोका (फिजी)

लंडनमध्ये विविध परंपरा, संस्कृतींना प्रोत्साहन दिले जाते आणि साहजिकच आम्ही आमच्या परीने मराठमोळी संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करीत असतो. लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना शेकडो मराठी कुटुंबं हमखास येतात. अनेकांनी आपापल्या घरीही गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. मी ज्या परिसरात राहते, तेथील कैलास कुलकर्णी हे लंडनमध्येच स्थायिक असले, तरी ते प्रत्येक वर्षी घरात गणेश प्रतिष्ठापना करतात. ते मूळचे कोल्हापूरचेच आहेत. दयानंद काठापूरकर यांच्याही घरी गणेश प्रतिष्ठापना होते.
- रिचा वोरा, चित्रकार (लंडन)