राजकीय नेत्यांना कुठे आहे सेन्सॉरशिप? - अमोल पालेकर

राजकीय नेत्यांना कुठे आहे सेन्सॉरशिप? - अमोल पालेकर

कोल्हापूर - इतिहासातील संदर्भांना तडे जातात, अशी ओरड करणाऱ्या विरोधकांची दखल घेत सेन्सॉर बोर्डही कलाकारांच्या निर्मितीलाच तडे देते. मग राजकीय नेत्यांना सामाजिक शांतता भंग करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केला. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ‘सध्या सिनेमांना होणारा विरोध’ या विषयावर पालेकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

‘पद्मावती’ या सिनेमाला सुरू असलेल्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले,  ‘असे  सिनेमे लोकांचे डोके भडकवण्याचे काम करत विरोध करणाऱ्यांपैकी बहुतांशजणांनी तो सिनेमाच पाहिलेला नसतो. आपण कोणत्या मुद्द्याच्या आधारे सिनेमाला विरोध करत आहोत, हे स्पष्ट करण्याचा सूज्ञपणाही अनेक विरोधकांत दिसून येत नाही. सिनेमातील अभिव्यक्तीमुळे काही वाद होऊ नयेत यावर अंकुश ठेवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाप्रमाणे राजकीय नेत्यांसाठीही एक सेन्सॉर बोर्ड असायला हवे, असेही ते म्हणाले.

लघुपट स्पर्धा निकाल
महोत्सवांतर्गत झालेल्या लघुपट स्पर्धेत कथात्मक गटात ‘चाफा’ या लघुपटाने, तर अकथात्मक गटात ‘ठिय्या’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. कथात्मक गटात ‘डेरू’ या लघुपटाने द्वितीय, तर ‘सफर’ या लघुपटाने तृतीय क्रमांक पटकावला.

माझा सिनेमा विचार करायला लावणाराच
एक हिरो आणि एक हिरॉईन...त्यांचं प्रेम आणि मग सर्व काही.. मला नाही आवडत हे...विचार करायला लावणाराच सिनेमा असावा, असे स्पष्ट मत आज अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मुक्त संवादात आज ते बोलत होते. या वेळी दिग्दर्शिका संध्या गोखले यांनीही ‘थांग’ या सिनेमाच्या निमित्ताने मानवी नातेबंध आणि भावना याविषयी मनोगत व्यक्त केले. शाहू स्मारक भवन येथे हा संवाद रंगला. जोडप्यातील पतीला पुरुषांविषयी वाटणारे आकर्षण, त्याचा पत्नीच्या मनावर होणारा परिणाम आणि त्यानंतर या नात्याविषयी तिची भूमिका, या विषयावर हा सिनेमा बेतला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com