ऑनलाईन इज द फ्युचर...! - सुभाष घई

कोल्हापूर ः सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गुरूवारी प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक सुभाष घई यांनी मास्टर क्‍लास घेतला. यावेळी टिपलेल्या त्यांच्या भावमुद्रा.  (बी.डी.चेचरःसकाळ छायाचित्रसेवा)
कोल्हापूर ः सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गुरूवारी प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक सुभाष घई यांनी मास्टर क्‍लास घेतला. यावेळी टिपलेल्या त्यांच्या भावमुद्रा. (बी.डी.चेचरःसकाळ छायाचित्रसेवा)

कोल्हापूर -  समाज काल जसा होता, तसे सिनेमे तयार झाले. तो आज जसा आहे, तसेच ते बनताहेत आणि भविष्यातही समाजाचेच प्रतिबिंब त्यात उमटेल. मात्र, भविष्यात ऑनलाईन फिल्मला महत्व येणार आहे आणि नव्या पिढीने त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असा प्रेरणा मंत्र आज बॉलीवूडचे प्रसिध्द निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिला.

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी त्यांनी राजर्षी शाहू स्मारक भवनात मास्टर क्‍लास घेतला.यावेळी ते बोलत होते. क्‍लासमध्ये डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-"यिन'चे सभासदही सहभागी झाले. क्‍लासनंतर माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. 

सुभाष घई म्हणाले, ""कोल्हापूरसारख्या शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट होतो,याचा अभिमान वाटतो. मात्र, हा महोत्सव अधिक ग्लोबल करण्याची जबाबदारी कोल्हापुरातील प्रत्येक घटकाची आहे. मुंबईतील व्हिसलिंग वूडस्‌ इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.'' 

आजवर हिंदी अठरा सिनेमे केले आणि तीन मराठी सिनेमेही. "संहिता' हा मराठी सिनेमा यंदाच्या "किफ'मध्ये पहायला मिळणार आहे. दहा वर्षे नव्या पिढीला सिनेमा शिकवण्यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये खर्ची घातली. आता लवकरच नवीन सिनेमा घेवून प्रेक्षकांसमोर येईन. कुठलाही सिनेमा हा आपण त्याची कथा कशी बांधतो आणि ती अधिक मनोरंजक कशी करतो, यावरच यशस्वी होतो. अर्थात संगीतासह इतर तांत्रिक बाजूही महत्वाच्या असतात. माझ्या सिनेमातील संगीत अनेकांना भावतो. कारण ते आपल्या मातीतीलच असते.

"चोली के पीछे' या गाण्यावर वारेमाप चर्चा झाली. मात्र, ते बिहारमधील एका लोकगीतावर आधारित गाणं होतं, असेही श्री. घई यांनी सांगितले. 

एखादा वाद निर्माण करून सिनेमे का तयार केले जातात, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""वाद हा मुळात भारतीय समाजाचा मूळ स्वभावच आहे. कारण भारत हा बहुविविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे पूर्वीही वाद होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील. फक्त आपण कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात करतो, हे महत्वाचे.'' 

ते म्हणाले, ""सिनेमा काही गंमत नसते. ते समाजाला सजग करण्याचे माध्यम आहे आणि त्याला नाट्यशास्त्राचा आधार आहे. एक हजार वर्षापूर्वी भारतीय जगातील सर्वांत विद्वान म्हणून ओळखले जात. पण, त्यानंतर एक हजार वर्षात आपण काय चुका केल्या, याच्या मुळाशी जायला हवे. त्यासाठीच तर जागतिक सिनेमे पाहायला हवेत. जगभरात काय चालंलं आहे आणि आपण कुठे आहोत, असा तौलनिक अभ्यास त्यातून आपल्याला करता येतो. फिल्म फेस्टीव्हल तर त्यासाठीच महत्वाचे असतात.'' 

दरम्यान, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट यावेळी उपस्थित होते. स्मितील पाटील यांनी काढलेले चित्र यावेळी श्री. घई यांना भेट देण्यात आले. 

मानसिकता कधी बदलणार ? 
यिन मंत्रीमंडळातील महसूलमंत्री प्रेरणा शहा हिने "यिन' परिवारातर्फे श्री. घई यांच्याशी संवाद साधला. लोकांना सिनेमे पहायला आवडतात. पण, या क्षेत्रात आपली मुलं करियर करायची म्हंटलं की ते नाक मुरडतात. ही मानसिकता केंव्हा बदलणार, असा प्रश्‍न तिने विचारला. त्यावर श्री. घई म्हणाले, ""परिवर्तन हा जगाचा नियम आहे. हळूहळू ही मानसिकता नक्कीच बदलेल. भारतीय समाज हा पूर्वी केवळ विश्‍वासावर जगायचा. ते गायत्री मंत्र म्हणायचे. पण, त्याचा अर्थ काय होतो, हे त्यांनी कधीच तपासले नाही. फक्त त्यांच्यासाठी देवावरचा विश्‍वास म्हणजे सर्व काही, असे चित्र होते. शिक्षणामुळे भारतीय समाज आता बदलतो आहे आणि सकारात्मक गोष्टींकडे आपण तितक्‍याच सकारात्मकतेने पहायला हवे.'' 

मुलांशी मैत्री करा... 
देशाची एकूणच संस्कृती सिनेमातून समजते. नव्या पिढीला सिनेमाचा त्यादृष्टीने अर्थ समजणे आवश्‍यक आहे. मुलांशी मैत्रीचं नातं अधिक दृढ करून त्यांना रसिक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही घई यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com