भविष्याचा वेध घेणारी समृद्ध परंपरा!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

कलापूरच्या नाट्यपरंपरेला मोठा इतिहास आहे. येथील प्रायोगिक रंगभूमीवरही आता नेटके प्रयोग पाहायला मिळतात. मात्र, इथंपर्यंतच्या साऱ्या प्रवासात संगीत मेळा, सोंगी भजन, संगीत नाटकं आणि शाहिरीच्या माध्यमातूनही ही समृद्ध परंपरा जपली गेली. या साऱ्या विविध टप्प्यांवर मात्र हौशी राज्य नाट्य स्पर्धा सर्वांचेच हक्काचे व्यासपीठ बनली. अनेक अडचणींचा सामना करतानाही भविष्याचा वेध घेत कलापूरचा नाट्यजल्लोष सुरूच राहिला. रंगभूमी दिन आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं याच प्रवासाबद्दल...

कलापूरच्या नाट्यपरंपरेला मोठा इतिहास आहे. येथील प्रायोगिक रंगभूमीवरही आता नेटके प्रयोग पाहायला मिळतात. मात्र, इथंपर्यंतच्या साऱ्या प्रवासात संगीत मेळा, सोंगी भजन, संगीत नाटकं आणि शाहिरीच्या माध्यमातूनही ही समृद्ध परंपरा जपली गेली. या साऱ्या विविध टप्प्यांवर मात्र हौशी राज्य नाट्य स्पर्धा सर्वांचेच हक्काचे व्यासपीठ बनली. अनेक अडचणींचा सामना करतानाही भविष्याचा वेध घेत कलापूरचा नाट्यजल्लोष सुरूच राहिला. रंगभूमी दिन आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं याच प्रवासाबद्दल...

स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूरचा गणेशोत्सव आणि संगीत मेळा हे एक अतूट समीकरणच. उन्हाळ्याच्या सुटीतच मेळ्यांच्या कलाकारांची बैठक होऊन पटकथा आणि गाणी निश्‍चित व्हायची. त्या काळी शहरात दहा ते बारा संगीत मेळे. सिद्धार्थनगरातील (कै.) हरी आबा सरनाईकांचा ‘अलंकार’, वसंतराव लिगाडेंचा ‘रत्नदीप’, (कै.) गुलाब मानेंचा ‘तुषार’, बिंदू चौकातील चौधरी-कपडेकरांचा ‘किरण’, शिवाजीराव भोसलेंचा ‘विश्वभारती’, शाहूपुरीतील मुजावरांचा ‘ताज’, पापाची तिकटी परिसरातील जाधव बंधूंचा ‘विकास’ आणि शुक्रवार पेठेतील ‘सम्राट’, ‘बालवीर’ या मेळ्यांनी त्या काळात मनोरंजनाबरोबरच लोकजागृतीही केली. त्यातूनच प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर, सिनेतारका उमा, माया जाधव, पुष्पा भोसले आदींच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. 

‘अगाड्याचं बगाडं’, ‘दे दान- सुटे गिराण’, ‘बघा, जमलं तर’, ‘अफाटनगरीचं सपाट राज्य’ अशा मथळ्यांची ही नाटकं केवळ हसवायचीच नाहीत; तर त्यातून प्रबोधनपर भाष्यही करायची. १९५८ मध्ये देवासकर महाराजांनी न्यू पॅलेस विकास सोसायटीच्या माध्यमातून संगीत मेळ्यांची पहिली स्पर्धाही घेतली होती. या साऱ्या स्मृतींना उजाळा देण्याचे कारण इतकेच, की जे काही सादर करायचं आहे, ती पटकथा आणि गाणी मेळ्यातील कलाकारांनीच लिहिली पाहिजेत. चित्रपटातील गाणी अजिबात चालणार नाहीत आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून ती प्रमाणित करून घेतलीच पाहिजेत, या इथल्या प्रमुख अटी आणि नियम होते. संगीत मेळ्यांची जागा पुढे ऑकेस्ट्रा-कलापथकांनी घेतली. सोंगी भजनांचीही मोठी परंपरा कलापूरनं जपली. 

ही भजने आणि त्यातली सोंगं इतकी प्रसिद्ध, की पुढे त्याला पुढे चित्रपटांतही आदराचे स्थान मिळाले. संगीत नाटकांचा सुवर्णकाळही कलापूरनं अनुभवला. अगदी ऐंशीच्या दशकांपर्यंतच नव्हे तर अलीकडेच मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून रंगभूमीवर आलेल्या ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत स्वयंवर’पर्यंत संगीत नाटकांची भुरळ कायम राहिली. या नाटकांनी तर राष्ट्रीय पातळीवर बक्षिसांची लयलूट केली. इथले शाहीर केवळ कला म्हणूनच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतही अग्रेसर राहिले. वैविध्यपूर्ण प्रयोगांनी ती बहरली आणि नुकतीच ‘पोवाडानाट्य’ ही नवी संकल्पना येथील शाहिरी पोवाडा कलामंचने यशस्वीही केली. हीच टीम आता यंदाच्या राज्य नाट्यस्पर्धेतही उतरली आहे. कलापूरच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा सांगणारी ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. 

आमची तिसरी पिढी...
कलापूरच्या समृद्ध नाट्यपरंपरेची मी एक साक्षीदार आहे. कारण सासरे हारून फरास नाटकात काम करायचे. त्यांची ‘वेड्याचं घर उन्हांत’, ‘बेबंदशाही’ ही नाटकं प्रचंड गाजली होती. ‘बेबंदशाही’ या नाटकात पती आणि माजी महापौर बाबू फरास यांनी बाल शिवाजीची भूमिका साकारली होती आणि त्यांचीच परंपरा मुलगा वासिम पुढे नेतो आहे. तो सध्या मुंबईतच आहे आणि लवकरच काही चित्रपटांचा नायक म्हणून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आजवर अनेक जाहिराती, म्युझिक अल्बममधून तो रसिकांना भेटला आणि आता बॉलीवूडचा अभिनेता हृतिक रोशन याच्याबरोबरच्या एका जाहिरातीतून तो टीव्हीवर झळकणार आहे. अर्थात त्यामागे त्याचे कष्ट मोठे आहेत. या क्षेत्रातला कुठलाही गॉडफादर नसताना, तो यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे.
- महापौर हसीना फरास

सुवर्णकाळ अनुभवलाय
तीस वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ जरी आठवला, तरी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ डोळ्यासमोर तरळतो. जयराम शिलेदार, प्रभाकर पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदा’ संस्थेचा प्रयोग संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सलग आठवडाभर आम्ही लावायचो आणि त्याला हाऊसफुल्ल गर्दी असायची. हल्ली बाहेरची नाटकं थिएटरला लावणं म्हणजे वितरकांवर आर्थिक संकट ओढवून घेण्याचाच प्रकार, असे चित्र असले तरी इथल्या तरुणाईने हौशी राज्य नाट्यस्पर्धेतून नाट्यपरंपरा नक्कीच जपली आहे. मोठ्या बॅनरची नाटके आपल्याकडे फारशी येत नसली, तरी प्रायोजकांच्या मदतीने काही नाटकं कोल्हापूरकरांना हमखास पाहायला मिळतात. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की सर्वसामान्य रसिकांनाही त्याच्या आवडीचं नाटक पाहता आलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं व्यावसायिक नाटकांनाही अजून बळ दिलं पाहिजे. 
- सुभाष वोरा, 
   ज्येष्ठ नाट्यवितरक