Maratha Kranti Morcha : गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद

Maratha Kranti Morcha : गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद

गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे. सकल मराठा समाजातर्फे विविध मार्गांनी मागण्यांकडे लक्ष वेधले जात आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सर्वसाधारणपणे एखाद्या पक्ष-संघटनेने बंद पुकारला तर सकाळी शहरातून बंदचे आवाहन केले जाते. काही व्यापारी व्यवहार सुरु ठेवत असतील तर त्यांना बंदमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाते. मात्र, आजच्या बंदमध्ये वेगळे चित्र दिसले. ना कोणी आवाहन केले, ना कोणाला सहभागी होण्यास भाग पाडले. इतका उत्स्फूर्तपणा आजच्या बंदमध्ये दिसून आला. परिणामी, दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. त्यामुळे सारे व्यवहार ठप्प होते.

दरम्यान, ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. अनेक गावातील व्यापाऱ्यांनी स्वत:हून आंदोलनात सहभागी होत व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे बंदसारख्या परिस्थितीत शहरापुरती दिसणारी आंदोलनाती तीव्रता मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातही दिसून आली. बंदची कल्पना असल्याने बहुतांश लोकांनी शहरात येणे टाळले. आपापली कामे पुढे ढकलण्याला प्राधान्य दिले. त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचाही आजचा शेवटचा दिवस असल्याने कार्यालयामध्येही शुकशुकाट होता. नेहमी बंद काळात बाजारपेठ शांत असली तरी शासकीय कार्यालये गजबजलेली असायची. आज मात्र कार्यालयामध्येही शुकशुकाट होता.

'एसटी'ची खबरदारी...
महाराष्ट्र बंदमधून 'एसटी'ला वगळण्यात आले होते. त्यामुळे बस सेवा सुरु राहिल असे सांगण्यात आले होते. मात्र, यापूर्वी आंदोलनात एसटीला लक्ष्य केल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने बससेवा बंद ठेवण्यालाच प्राधान्य दिले. बुधवारी (ता.8) गेलेल्या मुक्कामी गाड्याही रात्रीच डेपोमध्ये बोलावून घेतल्या होत्या. आज दिवसभरातील सुमारे 800 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, तालुक्‍यात आज एकही बस धावली नाही. 

इंटरनेटही बंद...
आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवा पसरु नयेत, यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. एखाद्या आंदोलनाच्या निमित्ताने हे प्रथमच घडत होते. बहुतांश जणांना सकाळी इंटरनेट सेवा बंद केल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे आपलेच इंटरनेट बंद असल्याचा समज करुन इतरांना संपर्क साधून चौकशी केली जात होती. 

नेसरीसह बटकणंगले, हेब्बाळमध्ये बंदला प्रतिसाद
नेसरी - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत नेसरीसह बटकणंगले, हेब्बाळ-जलद्याळ गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. 

नेसरीचा आठवडा बाजार गुरुवारी असतो. आज गुरुवार असूनही आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, सहकारी पतसंस्था, खासगी वाहतूक पूर्णपणे बंद होती. दरम्यान, येथील बसस्थानक परिसरात सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र जमले. नेसरीच्या प्रमुख गल्लीतून रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणांनी गल्ली-बोळ दणाणून गेला. बसस्थानक परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना सरपंच आशिष साखरे, प्रशांत नाईक, कार्तिक कोलेकर, डॉ. विनायक शिंदे, विलास हल्याळी आदींनी बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. 

उपसरंपच रौप मुजावर, जोतिबा भिकले, रणजित पाटील, शिवाजी पाटील, गोविंद नांदवडेकर, विनायक पाटील, सुर्यकांत देसाई, प्रकाश मुरकुटे, मज्जीद वाटंगी, काका मुजावर, अस्लम बागवान, संगाप्पा साखरे, राजेंद्र हल्याळे, जयसिंग नाईक, संजय नाईक, दयानंद गंगली, विठ्ठल नाईक, विशाल रेडेकर, प्रभाकर देसाई, मधुकर कदम, सतीश खराबे, सुरेश शिंदे, संजय पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, बटकणंगले, हेब्बाळ जलद्याळ गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com