भर पावसात ‘अंबा माता की जय’चा गजर!

भर पावसात ‘अंबा माता की जय’चा गजर!

कोल्हापूर -  भर पावसातही हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा झाला. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, ब्रास बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने यंदा पहिल्यांदाच हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांचा इतिहास पाहता यंदा पहिल्यांदाच नगर प्रदक्षिणेला पावसाने हजेरी लावली; मात्र भाविक रेनकोट, छत्र्यांसह या सोहळ्यात तितक्‍याच उत्साहात सहभागी झाले. दरवर्षीच्या तुलनेत ही गर्दी मात्र कमी होती. 

दरम्यान, नवरात्र सोहळ्यातील जागराच्या रात्रीला मोहरमच्या पंजाची साथ मिळाली आणि सर्वधर्मसमभावाच्या वातावरणात अख्खी गुजरी उजळून निघाली. 
जागरनिमित्त श्री अंबाबाईचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी थाटामाटात बाहेर पडले; पण आज पंजेभेटीलाही प्रारंभ होणार असल्याने बाबूजमाल दर्ग्यातील मानाच्या नाल्या हैदर पंजासह काही पंजे याच मार्गाने जाणार होते. मात्र या सर्व पंजांनी श्री अंबाबाईला प्रथम मान दिला आणि गुजरी या पारंपरिक मार्गावरून जाण्याऐवजी लगतच्या भेंडे गल्लीतून काही पंजे बाबूजमाल दर्ग्याकडे गेले. रात्री साडेनऊला अंबाबाईचे वाहन मंदिरातून भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडले आणि त्यानंतर तब्बल एक तासाने नाल्या हैदर पंजा भेटीसाठी बाहेर पडला.

उद्योजक राजू जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन झाले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त ब्रास बॅंडच्या ‘मी शरण तुला जय अंबे मा’ अशा भक्तिगीताच्या सुरांच्या साक्षीने नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि पुष्पवृष्टीही केली. तुळजाभवानी मंदिरात पान विडा देऊन स्वागत झाले. या वेळी याज्ञसेनीराजे छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर प्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद झाले आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला.  

नाल्या हैदर पंजा मशालीच्या उजेडात 
नाल्या हैदर हा बाबूजमाल तालमीचा व कोल्हापूरचा मानाचा पंजा रात्री परंपरागत वातावरणात भेटीसाठी बाहेर पडला. हा पंजा मशालीच्या उजेडात पळवत नेला जातो. त्यामुळे पावसातही मशाली विझणार नाहीत, याची खबरदारी भाविक घेत होते.

भक्तीला सलामच...!
श्री अंबाबाईच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे महाद्वार ते संपूर्ण गुजरी मार्ग आज सायंकाळी सहापासूनच फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी सजून गेला; मात्र पावणेनऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि या साऱ्या कलाविष्कारावर पाणी पडले. नाराजीला पावसातच विरून टाकत या कलाकारांनी सोहळ्यात सक्रिय सहभागी होत ‘अंबा माता की जय’ असा जयघोष केला. अनेक मंडळांनी प्रसादाचे नियोजन केले होते. अधिकाधिक भाविकांना प्रसाद कसा मिळेल, यासाठी धडपड सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com