कोल्हापुरातल्या पहिल्या महिला पोलिस

कोल्हापुरातल्या पहिल्या महिला पोलिस

कोल्हापूर -  वर्ष १९४८, त्या वेळची पोलिस भरतीची एक जाहिरात आली. पोलिस भरती आणि तेही सीआयडी पोलिस म्हणून. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला. सीआयडीमध्ये कशाला नोकरी, खूप रिस्क, खूप काम म्हणून उलटसुलट चर्चाही झाली; पण त्या ठाम राहिल्या. भरती झाली आणि त्यांची नियुक्ती मुंबईत सीआयडी पोलिस म्हणून झाली.

एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी मुंबईत सीआयडी म्हणून तब्बल १९४८ ते १९६० पर्यंत काम करत राहिली. कोणाला वाटणारही नाही की ही सीआयडी असेल; पण त्यामुळेच तर ही सीआयडीत टिकून राहिली.

१९६० मध्ये लग्न झालं. नवरा कोल्हापुरात, त्यामुळे बदली कोल्हापुरात; पण सीआयडी म्हणून नव्हे तर खाकी वर्दीतील पोलिस म्हणून झाली. त्या वेळी म्हणजे ५६ वर्षांपूर्वी कोल्हापुरात (जिल्ह्यात) पहिल्या फक्त चारच महिला पोलिस त्यातली ही एक पोलिस ठरली. कोल्हापुरात लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा तालुक्‍यातली वेगवेगळी पोलिस ठाणी, विमानतळ, व्हीआयपी महिलांच्या गार्ड, अशी १९८६ पर्यंत नोकरी करत ही निवृत्त झाली; पण पोलिस दलातील ताणतणावाचे, सुख-दुःखाचे क्षण आजही सोबतीला ठेवून आयुष्याचा उत्तरार्थ समाधानात जगत राहिली.

त्यांचे पूर्ण नाव वैजयंती बाळकृष्ण फडणीस. आज वय ९१; पण किरकोळ दुखणं वगळता खडखडीत. पूर्वी राहायच्या भारत डेअरीजवळच्या गल्लीतील एका चाळीत. आता राहातात आर. के. नगरमध्ये. अगदी साध्यासुध्या नीटनेटक्‍या. बघताना कोणालाही वाटणार नाही, की यांनी ३६ वर्षे पोलिस म्हणून काम केले असेल; पण यांची पोलिसातली कारकीर्द आठवणीत राहाण्यासारखी. मुंबईत सीआयडी म्हणून काम करताना छाप्याच्या कारवाईतले क्षण त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. मुंबईत काही कुटुंबावर घातलेल्या छाप्यात घरातील नोटांच्या थप्प्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई पेटलेली असताना सीआयडी म्हणून करावी लागलेली कसरत आजही अंगावर काटा आणणारी आहे.

कोल्हापुरात १९६० मध्ये खाकी वर्दीत महिला पोलिस म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची नेमणूक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. त्या वेळी मांडवकर, पत्री जोशी, तारदाळकर व त्या, अशा जिल्ह्यात चारच महिला पोलिस. तुलनेने काम कमी; पण जिल्ह्यात कोठेही महिला आरोपी किंवा महिलांवर कारवाई असेल तर या चार महिला पोलिसांची ड्यूटी तिकडे ठरलेली. त्यामुळे आज या तालुक्‍यात तर उद्या त्या तालुक्‍यात, अशी भ्रमंती त्यांनी केली. घरात लहान मुलांना ठेवून ड्यूटी ॲडजस्ट केली; पण  त्यांची सुजाता, भूषण, अंजली व मिलिंद ही मुलं आईची धावपळ पाहून स्वतःलाच ॲडजस्ट करत गेली. जणू लहान वयातच त्यांना समज आली. एस. पी. मर्डुर, एम. वाय. पाटील, माणिकराव दमामे, हिंदूराव पाटील, जे. के. कुलकर्णी, अशा दिग्गज अधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. आज एक मुलगा परदेशात, एक मुलगी शिक्षिका, एक स्टेट बॅंकेत व एक मुलगा मार्केटिंगमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com