ग्राहक चळवळीतील रणरागिणी...!

संभाजी गंडमाळे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

जागर स्त्री शक्तिचा...

ग्राहकांची फसवणूक केली म्हणून बांधकाम व्यावसायिकाविरोधातील देशातील पहिली न्यायालयीन लढाई जिंकणाऱ्या, कोल्हापुरात पहिल्यांदा महिला मंडळांचा संयुक्त नवरात्रोत्सव सुरू करणाऱ्या, २६५ विद्यार्थ्यांच्या डोनेशनची लाखोंची रक्कम एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला परत द्यायला भाग पाडणाऱ्या संजीवनी तोरो यांच्याविषयी...
 

घरच्या परिस्थितीमुळे अकरावीपर्यंतच शिक्षण झालेले. मात्र, विवाहानंतर पती प्रा. पांडुरंग तोरो यांनी शिक्षणाची संधी दिली आणि पदवीच नव्हे, पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ३० वर्षांपूर्वी ग्राहक पंचायतीचं काम सुरू केलं आणि आजवर शेकडो ग्राहकांना न्याय मिळवून दिला. एक गोष्ट मात्र नक्की आहे, कुठलीही लढाई करताना ती एकाकी करण्यापेक्षा संघटितपणे केल्यास नक्कीच यश मिळते... संजीवनी तोरो ‘सकाळ’शी संवाद साधत होत्या आणि एकूणच ग्राहक चळवळीपासून ते सोंगी भजनापर्यंत साऱ्या गोष्टी उलगडत होत्या.

‘टीएफटी’ युनिटच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाची अनेक पारितोषिकं पटकावली. त्यामुळं कला-सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध. त्यातूनच १९८५ मध्ये मंगलताई सावंत, स्मिता कोरगावकर यांच्याबरोबरीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कोल्हापुरात पहिल्यांदाच महिला मंडळांसाठी संयुक्त नवरात्रोत्सव सुरू केला. पहिल्या वर्षी ३५ मंडळे सहभागी होती आणि कैक वर्षे हा उपक्रम सुरू होता. मात्र, दरम्यानच्या काळात ग्राहक पंचायतीची कामं वाढली आणि हा उपक्रम थांबला. एका बांधकाम व्यावसायिकाने कोल्हापुरातील पंच्याहत्तरहून अधिक ग्राहकांना फसविले. १९८६ ते १९९२ या काळात ग्राहक पंचायतीत लढाई करून या सर्वांना त्यांनी न्याय मिळवून दिला. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दहा वर्षांची शिक्षा झाली. देशातील ही पहिलीच घटना होती.

एका वैद्यकीय महाविद्यालयाने २६५ विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर डोनेशन गोळा केले. या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एकत्र घेऊन लढाई केली आणि लाखो रुपयांची ही रक्कम संबंधित व्यवस्थापनाकडून परत मिळवली. ग्राहक चळवळीतील त्यांच्या या कामांसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले. बाळ जमेनीस यांच्यानंतर शिवाजी चौक तरुण मंडळाच्या सोंगी भजन स्पर्धेच्या परीक्षक म्हणून त्या गेली १२ वर्षे काम करतात. कधी पुण्यात, कधी मुंबईत; तर कधी अमेरिकेत मुलांकडे तोरो दांपत्य असते. माजी महापौर नंदकुमार वळंजू आणि मंडळाच्या आग्रहाखातर अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करून खास नवरात्रोत्सवासाठी हे दांपत्य हमखास कोल्हापुरात येते.    

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या सोंगी भजन स्पर्धेतील मंडळांना काही सोंगांसाठी एका विशिष्ट विषयावर प्रबोधनासाठी नियमच केला आहे. यंदा डॉल्बी आणि ध्वनिप्रदूषण या विषयावर भजनातून प्रबोधन केले जात आहे.
- संजीवनी तोरो