शास्त्रीय नृत्याची ऊर्जा... हेमसुवर्णा

शास्त्रीय नृत्याची ऊर्जा... हेमसुवर्णा

शब्द, सूर, ताल, लय यांच्याशी गट्टी जमली, त्याच नादब्रह्मात गुंग होऊन स्वतःबरोबर इतरांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या दिग्गज कलावंतांच्या अदा रसिकांच्या मनात प्रसन्नतेची ऊर्जा देतात. अनेक कलावंत स्वतः शिकले, इतरांना शिकवत राहिले, घडणारा कलाविष्कार रसिकांचे जगणे समृद्ध करत गेला. अशा कलावंतांच्या यादीत कोल्हापूरच्या नृत्यांगना हेमसुवर्णा मिरजकर यांचा लक्षवेधी सहभाग आहे. गेली ५० वर्षे मनोरंजन क्षेत्रातील शास्त्रीय नृत्य अदाकारीने कलावंतांना घडवत, रसिकांना तादात्म्याची प्रचिती देत आहेत.

तबला विभूषण पंडित बाबासाहेब मिरजकर यांचे नाव आदराने घेतले जाते, त्यांच्या हेमसुवर्णा या कन्या. वडिलांकडून त्यांना संगीत व शास्त्रीय नृत्याची ओळख झाली आणि हेमसुवर्णा औचित्यानुसार लहान-मोठी नृत्ये सादर करू लागल्या. वयाच्या ११ वर्षांची चिमुरडी कथ्थकचा पदन्यास लीलया सादर करते.

विलक्षण चपळाई, पदन्यासातील अद्‌भुत कौशल्य आणि आत्मविश्‍वास अशा गुण वैशिष्ट्यांना हेरून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मनोहर नायडू यांनी हेमसुवर्णा यांना मुंबईत नृत्य प्रशिक्षण दिले व असिस्टंट म्हणून संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता तब्बल ३७ हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले. दादा कोंडके यांच्या सात चित्रपटातील गीते, त्यातील त्यांची नृत्ये लक्षवेधी ठरली.

१९९० मध्ये त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील संचलनात महाराष्ट्र लोककलांच्या सादरीकरण पथकात मुख्य नृत्यांगना म्हणून संधी मिळाली. त्यांनी इंडिया गेट ते लाल किल्ल्यापर्यंत १३ किलोमीटर महाराष्ट्राच्या लावणी नृत्यांचे सलग सादरीकरण केले आणि रसिकांना अक्षरश: थक्क केले, तोच अनुभव माझ्या कलाजीवनाची ऊर्जा देऊन गेल्याचे हेमसुवर्णा सांगतात.

महिला कलावंतांचा वाद्यवृंद, प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या गावरान मेव्याचे २०० प्रयोगांतून महाराष्ट्र लोककला सादरीकरण केले; तर देश-विदेशात लोककला सादरीकरणाचे २५ हून अधिक प्रयोग केले. या साऱ्यात कुर्बानी, सुगंधी कट्टा, बोट लावीन तिथं गुदगुल्या, क्रांती या चित्रपटातील त्यांनी नृत्यदिग्दर्शन, केलेली गीते, त्यातील नृत्ये आजही टीव्हीवर झळकतात. ५० वर्षांतील नृत्य प्रवासातील वडील पंडित बाबासाहेब यांनी घडविलेल्या नृत्य कलासंस्कारांचे बीजारोपण किती प्रगल्भ होते, याची साक्ष लाभते, असेही त्या सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com