कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नवरात्रोत्सवात बुधवारी श्री अंबाबाईची माता भुवनेश्‍वरी रूपात सालंकृत पूजा बांधली. भाविकांची गर्दी आजही भर पावसात कायम राहिली. रात्री साडेनऊला पालखी सोहळा झाला. आज (ता. २८) उत्सवातील मुख्य दिवस असून अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवात बुधवारी श्री अंबाबाईची माता भुवनेश्‍वरी रूपात सालंकृत पूजा बांधली. भाविकांची गर्दी आजही भर पावसात कायम राहिली. रात्री साडेनऊला पालखी सोहळा झाला. आज (ता. २८) उत्सवातील मुख्य दिवस असून अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे.

रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीस बाहेर पडेल. रात्री बारानंतर जागर महापूजेला प्रारंभ होईल. दरम्यान, फलटण परिसरातून आलेल्या ५ हजारांवर महिलांनी मंदिरात दर्शन घेतले. नगरप्रदक्षिणेसाठी गुजरी मार्ग विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. 

खंडेनवमीच्या खरेदीसाठी गर्दी 
अष्टमीच्या जागरासाठी मांडल्या जाणाऱ्या तुळजाभवानीच्या चौकासाठी ऊस, जोंधळ्याची धाटे, झेंडूच्या फुलांना मागणी असते. त्याशिवाय खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजनही होणार असून त्यासाठीही ऊस, लव्हाळा, फुलांना मागणी असते. त्याच्या खरेदीसाठी गर्दी राहिली.

चमके शिवबाची तलवार...
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित भवानी मंडपातील सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता झाली. विलास चौगलेनिर्मित ‘गजर सोंगांचा जागर लोककलांचा’ हा कार्यक्रम सादर झाला. ‘चमके शिवबाची तलवार..’ या अभंगाने सुरू झालेल्या कार्यक्रमातून लोककलांचा जागर मांडला. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले.

नवऊर्जा उत्सवाला गर्दी
निर्माण चौकात सुरू असलेल्या नवऊर्जा उत्सवाला  मोठा प्रतिसाद मिळाला. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखिका सुप्रिया वकील, पाककलातज्ज्ञ मंजिरी कपडेकर आदींचे सत्कार झाले.

नाल्याहैदर पंजा आज भेटीस 
बाबूजमाल दर्ग्यातील मानाचा नाल्याहैदर पंजा आज (ता. २८) रात्री भेटीसाठी पारंपरिक मशालींच्या उजेडात बाहेर पडणार आहे. नगरप्रदक्षिणा आणि नाल्याहैदर पंजेभेटीसाठी महाद्वार रोड हा प्रमुख मार्ग आहे. हे दोन्ही सोहळे रात्री साडेनऊला सुरू होतात; मात्र एकाच दिवशी दोन्ही सोहळे आल्यास श्री अंबाबाईचे वाहन महाद्वार रोडवरून पुढे गेल्यानंतर मग नाल्याहैदर पंजा भेटीसाठी बाहेर पडतो.  

जोतिबा डोंगर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथ, रवळनाथ, सौदागर, महादेव, नंदी, चोपडाईदेवी, यमाईदेवी, काळभैरवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात येथील श्री क्षेत्र जोतिर्लिंग मंदिरात बुधवारी जागर सोहळा मंगलमय वातावरणात साजरा झाला. दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

दरम्यान, दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली.  नवरात्र उत्सवातील सातवा दिवस डोंगरावर प्रतिवर्षी सप्तमी तिथीला जोतिबा देवाचा जागर असतो. चारीमुक्‍तीचे प्रतीक म्हणून जोतिबा देवाची  दख्खनचा राजा रूपातील सोहनकमळ रूपातील बैठी अलंकारिक महापूजा दहा गावकर यांनी बांधली. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने फलाहाराची चार ताटे सवाद्य मिरवणुकीने मूळमाया यमाई मंदिराकडे गेली. सकाळी धुपारती सोहळा झाला. या वेळी देवस्थान समितीचे अधीक्षक लक्ष्मण डबाणे, महादेव दिंडे, सिंदिया ट्रस्टचे अधीक्षक आर. टी. कदम, श्रींचे मुख्य पुजारी, ग्रामस्थ, सर्व देवसेवक, पुजारी मंडळी, भाविक उपस्थित होते.