कवठे एकंदला लखलखती आतषबाजी

कवठे एकंदला लखलखती आतषबाजी

सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद (ता. तासगाव) येथे श्री बिऱ्हाड सिद्धनगरी म्हटले जाते. विजयादशमीला पालखी सोहळ्यासमोर होणारी आतषबाजी लक्षवेधी असते. त्यासाठी शोभेची दारू बनवण्याची तयारी काही महिने अगोदरच केली जाते. श्रद्धेचा उत्सव आणि त्यानिमित्त रोषणाईचा झगमगाट याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यासाठीच राज्यात कवठे एकंद प्रसिद्ध आहे. 

पालखीसमोर होणाऱ्या रोषणाईसाठी लाकडी शिंगट बनवण्यासाठी बुंध्यांचा वापर केला जातो. सुतारमेट्यावर त्यासाठी काही दिवस मोठी लगबग असते. पालखीसमोर दरवर्षी चालू घडामोडींवर आधारित आतषबाजीचे वेगवेगळे प्रकार सादर केले जातात. यासाठी विविध मंडळांचे कार्यकर्ते रात्री जागवतात. 

अनंतचतुर्दशीला बिऱ्हाडसिद्ध देवस्थानच्या पालखी सोहळ्यासाठी दारूकामाच्या तयारीला सुरुवात होते. वीस-पंचवीस फूट उंच उडणारे लाकडी शिंगट सर्वांत महत्त्वाचे. मंडळे आणि व्यक्‍तिगत पातळीवर अनेकजण शिंगट बनवतात. ते पालखीसमोर उडवले जाते.

दसऱ्याला एका रात्रीत दोनशे-तीनशे शिंगट उडवली जातात. त्यांची तयारीही तीन आठवडे ते महिनाभर आधी सुरू असते. शिंगट तयार करण्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे लाकूड. ते चिवट असावे लागते. त्यासाठी चिंच निवडली जाते. आतषबाजीसाठी दारूसाहित्य भरण्यासाठी लाकडाला छिद्र पाडले जाते. लाकूड जितके मजबूत आणि चिवट, शिंगट तितकेच  उंचच उंच उडते. लाकडाच्या छिद्राची रचना, पोकळी आणि दारूचे प्रमाण बिघडल्यास शिंगट फुटते. अपघात होतो. आतापर्यंत असे अनेक अपघात झाले आहेत. शिंगटासाठी वापरण्यात येणारा लाकडी बुंधा टिकावू, मजबूत बनण्यासाठी वर्षभर पाण्यात, विहिरीत टाकला जातो. त्यानंतर वाळवून तो दारूकामासाठी वापरला जातो.

असे असते शिंगट
चिंचेच्या झाडाचा तीन-साडेतीन फूट लांबीचा मजबूत बुंधा वापरतात. मधोमध तीन-साडेतीन इंचाची तीन फूट खोलीची पोकळी तयार केली जाते. अशी पोकळी तयार करणारे गावात कसबी कारागीर आहेत. त्यांच्याकडे महिनाभर आधी लाकूड दिले जाते. गिरमिटने तीन इंचाचे (छिद्र) भोक पाडले जाते. तीन साडेतीन फूट खोलीचे छिद्र पाडण्यास अख्खा दिवस जातो. दोन कारागिरांनी गिरमिट फिरवावे लागते. लाकडाचा बुंधा जमिनीच्या सपाट पृष्ठभागावर ठेवून ओळंबा लावून हे छिद्र पाडले जाते. दोन ते तीन हजारपर्यंत लाकूड, छिद्र पाडण्यासाठी पाच-सहाशे रुपये मजुरी असा खर्च एका शिंगटसाठी येतो.  दसऱ्याआधी एक दिवस त्यात दारू भरली जाते. दसऱ्याला पालखीसमोर त्याची आतषबाजी केली जाते.

ही काळजी घ्या 
 मद्यपान करून उत्सवाला येऊ नका.
 रस्ते अरुंद असल्याने मोकळ्या जागेत थांबा.
 मुले सोबत असतील 
तर आतषबाजीच्या प्रत्यक्ष ठिकाणापासून दूरच राहा.
 दारूकाम शोभेचे 
असले तरी जवळून पाहणे धोक्‍याचेच हे पक्‍के ध्यानात ठेवा.
 मंदिर परिसरातून आकाशात पाहिले तरी आतषबाजीचा आनंद घेता येतो.
 भाजून जखमा होण्याची शक्‍यता. प्रथमोपचार तातडीने करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com