राष्ट्रवादीचा दहा समित्यांवरही झेंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

आठ समित्यांवर स्पष्ट बहुमत; दोन ठिकाणी संधी, कऱ्हाडला उंडाळकर 'किंगमेकर'

आठ समित्यांवर स्पष्ट बहुमत; दोन ठिकाणी संधी, कऱ्हाडला उंडाळकर 'किंगमेकर'
सातारा - सातारा जिल्हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करणाऱ्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर एकहाती सत्ता राखली, तर दोन पंचायत समित्यांत सर्वाधिक निम्म्या जागा मिळवून तेथेही सत्तेचे दावेदार आपणच असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिले. कऱ्हाडला राष्ट्रवादीने सात जागा मिळविल्या असल्या, तरी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही सात जागा जिंकल्याने जिकडे ते तिकडे सत्ता, अशी त्रिशंकू स्थिती आहे.

जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांतील 128 जागांवर झालेल्या लढतीत राष्ट्रवादीने तब्बल 76 जागांवर विजयश्री मिळविली. कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे राष्ट्रवादीच्या जवळपासही पोचू शकले नाहीत. ते अनुक्रमे 15, 23, सहा जागांपुरते अल्पसंतुष्ट ठरले. गेल्या वेळी कोरेगाव, माण, पाटणमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सदस्य समान विजयी झाल्याने चिठ्ठीचा खेळ रंगला होता. यंदा मात्र राष्ट्रवादीने हा खेळ ठेवलाच नाही. सातारा, फलटण, कोरेगाव, महाबळेश्‍वर, जावळी, खटाव, वाई, पाटणमध्ये एकहाती सत्ता मिळविली. खंडाळा पंचायत समितीत सर्वाधिक तीन, तर माण समितीत सर्वाधिक पाच जागा मिळविल्याने तेथेही सत्तेचे दावेदार राष्ट्रवादीच ठरला आहे.

कऱ्हाड पंचायत समितीत मात्र उंडाळकर गटाच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीने बाजी मारल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. उंडाळकर गट व राष्ट्रवादीने प्रत्येकी सात जागा मिळविल्या. भाजपने सहा, तर कॉंग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी आमदार बाळासाहेब पाटील यांचे नऊ, उंडाळकरांचे सात, पृथ्वीराज चव्हाण गटाचे पाच, तर अतुल भोसले गटाचे दोन सदस्य होते. त्यामुळे बाळासाहेब व उंडाळकर एकत्रित येत राष्ट्रवादीने सभापतिपद राखले होते. यंदा मात्र, उंडाळकर हे अतुल भोसलेंबरोबर राहण्याची दाट शक्‍यता असल्याने तेच सत्तेचे सूत्रधार ठरणार आहेत. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी दोन जागा जास्त मिळवत पाटणची सत्ता राष्ट्रवादीला मिळवून दिली.