ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वाय. जी. भोसले यांचे निधन

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वाय. जी. भोसले यांचे निधन

कोल्हापूर - ज्येष्ठ मराठी चित्रपट व नाट्य दिग्दर्शक यशवंतराव गणपतराव तथा वाय. जी. भोसले (वय 90) यांचे आज निधन झाले. सायंकाळी सात वाजता येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

भोसले यांच्या दिग्दर्शनाखाली ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, विलास रकटे, बी. माजनाळकर, गुलाब मोकाशी, हारून फरास, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामिनी भाटिया, संध्या रायकर, लीला गांधी, शांता तांबे, पद्मिनी बिडकर आदी कलावंतांनी नाट्य कलेचे धडे घेतले. पुढे या कलाकारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

मास्टर विनायक आणि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे असिस्टंट म्हणून त्यांनी सुरवातीला काम केले; परंतु नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या सूचनेनुसार ते जाणीवपूर्वक चित्रपटसृष्टी सोडून रंगभूमीकडे वळले. या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केली. व्ही. शांताराम यांच्या "चानी‘ चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून, तर जयसिंगराव कुसाळे यांच्या "सुळावरची पोळी‘ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची भूमिका बजावली. सातशेहून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

स्वप्नगंधा थिएटर संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कादंबरीवर "भल्या घरची कामिनी‘ हे नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून ते स्वीकारत असतं. "पानिपत‘कार विश्वास पाटील, विलास पाटील यांनीही भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कलेचे धडे घेतले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मराठी चित्रपट निर्मिती अमृतमहोत्सवी सोहळ्यात 1994 मध्ये ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. 1990 मध्ये गायन समाज देवल क्‍लब तर्फे केशवराव भोसले जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 2001 मध्ये चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आणि 2006 मध्ये कलांजली संस्थेतर्फे "नाट्य कलायोगी‘ पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. 2009 मध्ये "संस्कार भारती‘ तर्फे "करवीर भूषण‘, 2011 मध्ये लोकशाहीर विठ्ठल उमाप अभिवादन समितीतर्फे "विठ्ठल उमाप स्मृती गौरव‘ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com