हृदय शस्त्रक्रियेतून १०७ बालकांना जीवदान

हृदय शस्त्रक्रियेतून १०७ बालकांना जीवदान

कऱ्हाडला आरोग्य विभागाचे महत्त्वाकांक्षी पाऊल; खेळण्या-बागडण्याच्या वयातच आघात
कऱ्हाड - खेळण्या- बागडण्याच्या वयातच ज्यांच्या नशिबी शरीरातील बिघाडामुळे दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ आली अशा बालकांना जीवदान देण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना पोटच्या पोरांची शस्त्रक्रियाही करणे शक्‍य नव्हते अशा तालुक्‍यातील ११५ पैकी १०७ बालकांच्या दोन कोटींहून अधिक खर्चाच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आल्याने त्यांना नवजीवनच मिळाले आहे. 

राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. त्यामध्ये ज्यांना श्‍वसनाचा त्रास होतो, ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी असते अशांचे तपासणीनंतर उपजिल्हा रुग्णालयात स्क्रीनिंग केले जाते. त्यामध्ये संबंधित बालकांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळे, हृदयाला असलेले होल यासह अन्य प्रकारचा दोष आहे हे स्पष्ट होते. तालुक्‍यामध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ११५ बालकांच्या हृदयामध्ये दोष असल्याचे दिसून आले. त्यातील सर्वच बालकांच्या पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठीची खर्च झेपणार नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांच्यासह अंगणवाडीच्या प्रकल्पाधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार संबंधित बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च होणार होता. त्यासाठी राजीव गांधी जीवनदायी अभियानातून ८२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर १४ शस्त्रक्रिया लोकसहभाग आणि पालकांच्या सहकार्यातून करण्यात आल्या. त्याद्वारे तालुक्‍यातील १०७ बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. हॉस्पिटलमधूनही संबंधित बालकांच्या शस्त्रक्रियेसाठीचे पैसे कमी करून हातभार लावण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिंदे, गटविकास अधिकारी श्री. फडतरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेसाठी बालस्वास्थ कार्यक्रम पथक, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व परिचारिकांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या प्रयत्नातून संबंधित १०७ बालकांना नवजीवन मिळाले आहे. 

आमच्या मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. आम्हाला त्याचा खर्च परवडणारा नव्हता आणि आम्ही ती शस्त्रक्रिया करूच शकलो नसतो. आरोग्य विभागाने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे आमच्या बाळाला जीवदान मिळाले.
- राजेंद्र शिंदे, पालक

शाळा व अंगणवाड्यांतील बालकांच्या तपासणीमध्ये हृदय शस्त्रक्रिया कराव्या लागण्याचे स्पष्ट झाले. संबंधित कुटुंबांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ते शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. मात्र, राजीव गांधी जीवनदायी योजना आणि लोकसभागातून १०७ बालकांच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे बालकांना नवजीवनच मिळाले आहे.
- अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी, कऱ्हाड

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा आणि अंगणवाड्यांतील बालकांची तपासणी करून ११५ पैकी १०७ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे संबंधित बालकांचे नवीन आयुष्य सुरू झाले आहे. अजूनही ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी अंगणवाडी सेविका, शाळांचे मुख्याध्यापक, उपजिल्हा रुग्णालयातील बालस्वास्थ विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रकाश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com