Water
Water

शहरी निकषाने १६ गावांना पाणी

कोल्हापूर - शहराजवळ नवे शहर वाढत आहे. ग्रामपंचायतीवर या गावांचा विकास करताना मर्यादा येत होत्या. आता प्राधिकरण नव्या योजना आखत आहे. शहरालगतच्या १६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने सुमारे ४०० कोटींच्या तीन योजना केल्या आहेत. या तीन योजनांच्या माध्यमातून शहरालगतच्या प्राधिकरणातील १६ गावांना शहरी निकषाप्रमाणे पाणी मिळणार आहे. 

ऐतिहासिक कोल्हापूर शहरालगत हे नवे कोल्हापूर उभे करताना या पायाभूत सुविधा मैलाचा दगड ठरणार आहेत. सध्या या गावांची पाण्याची मागणी दररोज २७ द.ल.घ.मीटर इतकी आहे; पण पुरवठा केवळ १० द.ल.घ.मीटर इतका होतो. पाणीपुरवठ्यात मोठा तुटवडा असल्याने या १६ गावांसाठी सुमारे ४०० कोटींची योजना करण्यात येणार आहे. सर्वेक्षण, इस्टिमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने याला मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

सध्या गांधीनगर, उचगावसह १३ गावांची नळपाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. ही योजना वीस वर्षांपूर्वीची आहे. तसेच या योजनेची पाईपलाईनही पीव्हीसी, पीएसस्सीची आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती असल्याने पहिल्या टप्प्यात ही पाईपलाईन बदलण्यासाठी अकरा कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून डीआय पाईप टाकण्याचे काम सुरू होणार आहे. ही योजना १९९७ ला करण्यात आली. २०३० पर्यंत एक लाख ४० हजार लोकसंख्येला पाणी देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात या परिसरात लोकसंख्या वाढत गेली. २०१८ मध्येच या योजनेतून एक लाख ६८ हजार लोकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी येथे चार दिवसांतून, दोन दिवसांतून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही योजना सक्षम करून शहरी निकषाप्रमाणे माणसी १३५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण दुरुस्ती आणि नवे पंपही येथे बसविण्यात येणार आहेत.

स्‍वतंत्र योजनांची गावे; उचगावसह सात गावे  
उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, मुडशिंगी या सात गावांसाठी एक स्वतंत्र योजना होणार आहे. 

गोकुळ शिरगावसह पाच गावे
नेर्ली, तामगाव, कणेरी, कणेरीवाडी आणि गोकुळ शिरगाव या गावांसाठी एक स्वतंत्र योजना होणार आहे. या योजनेद्वारे गावातील पाण्याचा प्रश्‍न सोडविला जाणार आहे. त्यामुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे.

पाचगावसह चार गावे  
पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबा तर्फ ठाणे या गावांसाठीही स्वतंत्र योजना केली जाणार आहे. येत्या तीन ते चार वर्षांत ही योजना आकारात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com