खंडाळ्यात १७०५ कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सातारा - ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात जपान आणि जर्मनीच्या कंपन्या उद्योग उभारणी करत आहेत. खंडाळा टप्पा क्रमांक एकमध्ये चार उद्योग उभे राहात असून, त्यातून १७०५ कोटींची गुंतवणूक होऊन १६१५ युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 

सातारा - ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात जपान आणि जर्मनीच्या कंपन्या उद्योग उभारणी करत आहेत. खंडाळा टप्पा क्रमांक एकमध्ये चार उद्योग उभे राहात असून, त्यातून १७०५ कोटींची गुंतवणूक होऊन १६१५ युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात २५१ उद्योजकांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली होती. नरेंद्र मोदींनी हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यातून अनेक परदेशी उद्योजक सातारा जिल्ह्यात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात जागा लागते. ही जागा औद्योगिक विकास महामंडळाने खंडाळा तालुक्‍यात उपलब्ध करून दिली आहे. त्यातील खंडाळा टप्पा क्रमांक एकमध्ये जपान आणि जर्मनीच्या कंपन्या उद्योग उभारत आहेत. जपानी उद्योगात ओरिएंटल ईस्ट इंडिया कंपनी ६०० कोटींची गुंतवणूक करत आहे. या उद्योगात इस्टची निर्मिती केली जाणार आहे. तेथे ५७० तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मन कंपनीमध्ये केएसडी पम्पस्‌चा समावेश आहे. ही कंपनी विविध प्रकारचे निर्यातक्षम पम्पस्‌ची निर्मिती करणार आहे. त्यासाठी २९० कोटींची गुंतवूणक करत असून, त्यातून ४०० तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कोरियन कंपनीमध्ये एल्जिन ग्लोबल इंडिया प्रा. लि. कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी बेअरिंगची निर्मिती करणार असून त्यासाठी ६६५ कोटींची गुंतवणूक करत आहे. त्यातून ३४५ तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. सिस्का एलईडी लाइट प्रा. लि. ही एलईडी बल्ब बनविण्याची कंपनी उभारली जात आहे. यातून १५० कोटींची गुंतवणूक होत असून, साधारण ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या चारही उद्योगांना औद्योगिक विकास महामंडळाने जागा उपलब्ध केली असून, उद्योग उभारणीची कामे सुरू आहेत.

लहान उद्योगांचे लक्ष खटाव, कोरेगावकडे
आणखी काही परदेशी उद्योग जिल्ह्यात येण्यास तयार आहेत; पण जागेचा प्रश्‍न आहे. या परदेशी उद्योगांना मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे; पण त्या प्रमाणात जागा उपलब्ध नाहीत, असे औद्योगिक विकास महामंडळाचे संदीप मोहिते यांनी सांगितले. जागा उपलब्ध नसल्याने बाहेरील मोठे उद्योग येण्याची शक्‍यता कमी झाली आहे. त्यामुळे लहान उद्योगांकडून आता माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यातील मोकळ्या जागांकडे लक्ष वेधले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 1705 crore investment in the Khandala