१८ गावांचे सांडपाणी त्वरित बंद करा - डॉ. सैनी

१८ गावांचे सांडपाणी त्वरित बंद करा - डॉ. सैनी

कोल्हापूर - पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या १८ गावांचे सांडपाणी त्वरित बंद करा, तसेच हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या पंधरा गावांना पर्यायी मार्गाने किंवा निर्जंतुकीकरण करून पाणी देण्याचे आदेश देत जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज दिला. 

जिल्ह्यातील १०५ उद्योगांतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण होते का, याची चौकशी करण्याच्या सूचना संबंधित तालुक्‍यातील प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, पंचगंगा नदी व रंकाळ्यावर वाहने व कपडे धुणाऱ्यांवर पोलिस व वाहतूक नियंत्रण कक्षाने कारवाई करावी, अशाही सूचना डॉ. सैनी यांनी दिल्या. 

पंचगंगा प्रदूषणाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद, महापालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, पर्यावरणप्रेमी, तसेच पालिकांची बैठक झाली. यानंतर डॉ. सैनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. सैनी म्हणाले, ‘‘उन्हाळाचा तडाखा वाढत आहे. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नदीत पाणी कमी आहे. अशा परिस्थितीत सांडपाणी मात्र कमी झालेले नाही, तर तेवढ्याच प्रमाणात नदीत मिसळत आहे. या पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १८ गावांमधून नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी त्वरित बंद केले पाहिजे. हे पाणी शुद्ध करून शेतीसाठी कसे वापरता येईल, याचा विचार केला पाहिजे. या गावांनी पर्यायी मार्गाचा वापर केला पाहिजे किंवा हे पाणी निर्जंतुकीकरण करूनच पुरवठा केला पाहिजे, अशा सूचनाही दिल्या. यावेळी विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आतापासूनच काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे. सांडपाणी, जैविक कचरा निर्गतिकरण किंवा उद्योगामधून सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी थोपवले पाहिजे. यासाठी सर्वच पातळ्यांवर विशेष काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, एम.पी.सी.बी.च्या इंदिरा गायकवाड, गृहविभागाचे सतीश माने, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर खोराटे उपस्थित होते.
 

सर्वेक्षणाची उलटतपासणी करा
पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये, यासाठी २०१४ मध्ये १०५ उद्योगांचे सर्वेक्षण झाले. यामध्ये जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्याबाबत अद्यापही कारवाई झालेली नाही. अजूनही काही त्रुटी आहेत. याची आता उलटतपासणी करण्याचे आदेशही डॉ. सैनी यांनी प्रांत कार्यालयाला दिले. 

सायझिंगमधून बाहेर पडणारे पाणी दूषित 
इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतीत सायझिंगचे ६५ उद्योग आहेत. सायझिंगमधून बाहेर पडणारे पाणी खूपच दूषित आहे. हे पाणी शेतीसाठी अपायकरक ठरू शकते. त्यामुळे असे प्रदूषित पाणी स्वच्छ करून कोणत्या पिकाला चालू शकते, याचा विचार केला पाहिजे. या पाण्यावर बांबूची लागवड करण्याचा प्रयोग केला जाणार आहे.
 

१७२ वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदच नाही 
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १२७, महापालिका क्षेत्रात २५ व इचलकरंजीतील २० अशा १७२ वैद्यकीय व्यावसायिकांची नोंद नाही. तसेच, ते आपल्याकडील जैविक कचरा महापालिकेकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे देत नाहीत, त्यांची माहिती घेण्याचे आदेशही डॉ. सैनी यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com