Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

दोन लाख क्विंटल शेतीमाल तारण

कऱ्हाड - पणन विभागाकडून राबवण्यात आलेल्या शेतमाल तारण योजनेस यंदा राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील १३८ बाजार समित्यांमार्फत ही योजना राबवण्यात आली. आतापर्यंत पाच हजार ९२ शेतकऱ्यांचा सुमारे दोन लाख क्विंटलहून अधिक माल ‘शेतमाल तारण योजने’अंतर्गत आला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना ४१ कोटी १३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. 

अनेकदा पिकांचे उत्पादन निघाल्यावर बाजारात त्याची आवक वाढते आणि दर ढासळतात. अशा वेळी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशी अनेक उदाहरणे दरवर्षी घडतात. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. काही वेळेला तो कर्जबाजारीही होतो. त्याचा विचार करून कृषी व पणन विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबवण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांनी शेतमाल ठेवून त्यावर तारण म्हणून कर्ज उचलून आर्थिक गरज भागावी आणि दर वाढेल त्यावेळी शेतमाल घालावा, हा हेतू ठेवण्यात आला होता. बाजार समिती किंवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम सहा महिन्यांसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र, सुरवातीच्या टप्प्यात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मध्यंतरी शेतमालाचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्याची दखल घेऊन शेतकरी शहाणे झाले आहेत. त्याचदरम्यान कृषी विभाग, बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोचवण्याची कार्यवाही करण्यात आली.

त्यामुळे चांगलीच जनजागृती झाल्याने त्याचा परिणाम म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. यंदा सुमारे पाच हजार ९२ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन, हरभरा, भात, तूर, उडीद, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, बेदाणा, हळद आदी दोन लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना ४१ कोटी १३ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.

गूळ व राजम्यासाठी २५ कोटी 
शेतमाल तारण योजनेत पहिल्यांदाच शासनाकडून गूळ आणि वाघ्या घेवड्याचा (राजमा) समावेश केला आहे. त्या शेतमालाच्या तारण योजनेसाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित माल ठेवल्यानंतर कर्ज स्वरूपात त्यांना ती रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आकडे बोलतात...
 शेतीमाल तारण ठेवलेल्या शेतकऱ्यांची संख्या - पाच हजार ९२
 एकूण कर्जवाटप  -४१ कोटी १३ लाख
 सहभागी बाजार समित्या - १३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com