अडीच लाख सदस्यांची शिवसेनेकडून नोंदणी

Shivsena
Shivsena

सातारा - आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने जिल्ह्यात दमदार तयारी सुरू केली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांत चार लाख सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’ जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आले असून, त्यापैकी अडीच लाख सदस्य नोंदणी पूर्ण झाल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. बूथनिहाय शिवसेना कार्यकर्ता नेमणुकीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील तीन जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेची पक्षबांधणी सुरू आहे. पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत त्यापैकी अडीच लाख सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच ‘बीएलओ’ नेमणुकीचे कामही ८० टक्के पूर्ण झाले आहे. प्रत्येक बूथनिहाय एक बूथ एजंट नेमण्यात आला आहे. आणखी महिनाभरात उर्वरित सदस्य नोंदणी आणि पक्षबांधणीही पूर्ण होणार आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी 

शिवसेना उदयनराजेंच्या विरोधात सक्षम उमेदवार देणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे वारे वाहू लागले आहेत. पण, भाजप-शिवसेनेची युती होणार नाही, हे शिवसेनेच्या तयारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेते मंडळींचेही सातारा जिल्ह्यात लवकरच दौरे होऊन मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेनेनेही सातारा जिल्ह्यात निवडणुकीसाठी तयारी करण्यास सुरवात केली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांत भारतीय जनता पक्षाचे नेते आगामी निवडणुकीत युती होण्याचे भविष्य वर्तवू लागले आहेत. याचा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इन्कार करत भाजपचे नेतेमंडळी खोटे बोलत असल्याचे सांगत आहेत. 

युतीबाबतची भाजप नेत्यांची घोषणा फसवी  
सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. भाजप व शिवसेनेची आगामी निवडणुकीसाठी युती होणार, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे नेते म्हणत असतील तर ते साफ खोटे व फसवे आहे. भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com