"सौभाग्य'साठी 25 हजार लाभार्थी 

"सौभाग्य'साठी 25 हजार लाभार्थी 

सोलापूर : महावितरणकडून गावपातळीवर सर्वेक्षण करून वीजजोडणी नसलेल्या घरांची यादी तयार केली आहे. या सर्वेक्षणानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार 684 लाभार्थ्यांची सौभाग्य योजनेसाठी निवड केली आहे. त्यांना वीजजोडणी देण्याचे काम महावितरणच्यावतीने सुरू आहे. 

शहरी व ग्रामीण भागातील अद्याप विद्युतीकरण न झालेल्या घरांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेतून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) व दारिद्य्र रेषेवरील गरीब व आर्थिक मागास (एपीएल) कुटुंबांना वीजजोडणी देण्यात येत आहे. परंतु, ज्यांना या योजनेतून वीजजोडणी मिळालेली नाही, त्यांनी नजीकच्या कार्यालयात 31 जुलैपर्यंत संपर्क साधून वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेमधून लाभार्थ्यांच्या वीजजोडण्यांसाठी आवश्‍यक असलेली वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च शासनाकडून करण्यात येतो. या योजनेमधून मुख्यत्वे ग्रामीण व शहरी भागातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना वीजपुरवठा करण्यासाठी जोडण्या देण्यात येत आहेत. मात्र, या योजनेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेली घरे, तात्पुरत्या निवासासाठी उभारलेल्या राहुट्या किंवा घरे तसेच शेतामधील घरे पात्र राहणार नाहीत. 

या योजनेतून ग्रामीण भागात दुर्गम व दूरस्थ भागातील रहिवासी असणाऱ्या अनुसूचित जाती, जमातींसह अतिशय गरीब व दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या घरांना विनाशुल्क वीजजोडणी देण्यात येईल. बीपीएल लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येत आहे. तसेच दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) परंतु गरीब व आर्थिक मागास कुटुंबांच्या घरांना वीजजोडणीसाठी नाममात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यांनी या शुल्काचा वीजबिलातून 10 हप्त्यांद्वारे भरणा करायचा आहे. वीजजोडणी मिळाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना मासिक वीजबिल भरणे बंधनकारक आहे. 

सौभाग्य योजनेसाठी शासनाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करताना काहींची नावे अनवधानाने सुटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अद्याप ज्या घरांना सौभाग्य योजनेतून वीजजोडणी मिळालेली नाही, त्यांनी येत्या 31 जुलैपर्यंत महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com