हवाई दलाच्या भरतीसाठी तासगावात 2500 युवक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

तासगाव - भारतीय हवाई दलाने तासगाव येथे सोमवारी आयोजित केलेल्या भरतीसाठी अडीच हजार 2500 युवकांनी हजेरी लावली. यापैकी पंधराशे युवकांनी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. आज पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेली ही भरती प्रक्रिया आणखी दोन दिवस चालणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलाच्या वतीने ही पहिलीच भरती आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेच्या क्रीडांगणावर जय्यत तयारी केली होती. काल रात्रीपासूनच राज्याच्या विविध भागांतून युवक तासगावात दाखल झाले होते. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी राहाण्याची सोय करण्यात आली होती. एअर कमोडोर मेहंदी रत्ता, विंग कमांडर महेश्‍वर भोग यांच्यासह 6 अधिकारी आणि नौदलाचे 100 जवान या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. भरती प्रक्रिया 10 मे पर्यंत पूर्ण होईल. भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांसाठी पिण्याच्या पाण्यासह खाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, जिल्ह्यातील युवकांचा मोठा सहभाग होता.

भारतीय हवाई दलाची ही पहिलीच भरती असल्याने राज्यभरातून युवकांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती, प्रशासनाने सहा हजार युवक उपस्थित राहतील, या अपेक्षेने निवास व्यवस्था केली होती. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर होता. मात्र, प्रत्यक्षात अडीच हजार युवकांनीच भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली.