गुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा

गुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा

कोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी अल्ताफ अजिज शेख (रा. उजळाईवाडी) याला अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ हाजी शेख, अजिज हाजी शेख (उजळाईवाडी) आणि रणजित मारुती पोवाळकर (वय ३४, रा. दोनवडे, ता. करवीर) यांनी ए. एस. रिर्सोसेस ही कंपनी 
स्थापन केली. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या एडलवाईज कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून ते ही कंपनी चालवत होते.
पोवाळकर यांनी स्वतःचे तसेच मित्रपरिवाराचे पैसे या कंपनीत गुंतवले. सुमारे ३३ जणांनी ३ कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपये या कंपनीत गुंतवले होते. त्यानंतर अल्ताफ, आजीज यांनी रणजित यांना अंधारात ठेवून हे पैसे ‘आयआयएफएलएसएच’ या कंपनीत गुंतवले. यावेळी सुनील गोंधळी हा या दोघांच्या संपर्कात होता.

मार्च २०१७ पर्यंत गुंतवणूकदारांना लाभांश मिळत होता. तोपर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. त्यानंतर लाभांश मिळणे बंद झाले. 
अल्ताफ आणि अजीज यांच्या हेतूबद्दल शंका आल्यावर पोवाळकर यांनी मुंबईला स्टॉक एक्‍सेंजमध्ये चौकशी केली असता, ‘आयआयएफएलएसएच’ नावाची कोणतीही कंपनी नसल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर रणजित यांनी अल्ताफ, आजीज आणि सुनील गोंधळी यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, यातील अल्ताफ हाजी शेख याला अटक केली आहे. आतापर्यंत ३३ गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे.

उडवाउडवीची उत्तरे
रणजित यांनी अल्ताफ आणि अजिज यांच्याकडे याबाबत विचारणा केली. आपण ज्या कंपनीबरोबर करार केला होता, तो करार रद्द झाला आहे. त्यामुळे पैसे मार्केटमध्ये ब्लॉक झाले आहेत; पण मे महिन्यामध्ये नवीन करार होऊन पुन्हा लाभांश सुरळीतपणे मिळेल, असे दोघांनी सांगितले. जून महिना संपला तरी लाभांश मिळाला नसल्याने रणजित आणि इतर गुंतवणूकदारांनी शेख बंधूंच्या घरी जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. या वेळी दोघांनी चालढकल करत उडवाउडवीची उत्तरे दिली. २२ जुलै २०१७ ला या दोघांनी कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानक ऑफिस बंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com