नेत्यांना पुन्हा-पुन्हा लोकसेवेचे उमाळे 

नेत्यांना पुन्हा-पुन्हा लोकसेवेचे उमाळे 

मिरज - जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी मिरज तालुक्‍यात नात्यागोत्यांच्या राजकारणाने जोर धरला आहे. अनेक मतदारसंघात नेतेमंडळींनी घरातील सदस्यालाच उमेदवार म्हणून पुढे केले आहे. निवडून येण्याची क्षमता म्हणून पक्षांनीही त्यांनाच संधी दिली आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला मात्र यामुळे पक्षांचे दरवाजे अजूनही बंदच आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत पदांचा गोडवा चाखलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा-पुन्हा लोकसेवेचे उमाळे फुटले आहेत. 

म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून अर्ज भरलेल्या प्राजक्ता नंदकुमार कोरे या सरपंच राजकुमार कोरे यांच्या भावजय आहेत. वड्डीच्या शोभा खोबरे या माजी सरपंचांच्या पत्नी आहेत. सोनाली धामणे यांचे पती बाळासाहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याशिवाय म्हैसाळमधील कब्बुरेंच्या राजकीय घराण्यातील अश्‍विनी भरतेश कब्बुरे आणि पंचायत समितीच्या उपसभापती जयश्री अनिल कब्बुरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. म्हैसाळ पंचायत समितीसाठी अर्ज भरलेले दौलतराव शिंदे, दिलीपकुमार पाटील हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. माजी सरपंच आबासाहेब शिंदे हेदेखील रिंगणात उतरले आहेत. टाकळी पंचायत समितीसाठी 2007 मध्ये निवडणूक लढवलेले सुभाष हाक्के पुन्हा एकदा नशिब आजमावत आहेत. 

आरग जिल्हा परिषदेसाठी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत माळी यांच्या पत्नी प्रमिला यांनी अर्ज भरला आहे. पंचायत समितीसाठी उपसरपंच अनिल कोरबू यांच्या पत्नी रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. लिंगनुरातून ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील स्वतः रिंगणात आहेत. बेडगमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब कांबळे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी ग्रामपंचायत नेते बाळासाहेब ओमासे यांच्या पत्नी उतरण्याची चर्चा आहे. एरंडोलीमधून पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री तानाजी पाटील रिंगणात आहेत. सलगरे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोळेकर यांच्या पत्नी वंदना, शिपूरचे नेते रणजित देसाई यांच्या पत्नी पूनम यादेखील राजकारणात उतरल्या आहेत. भोसे जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनिता कदम, नेते जयसिंग चव्हाण यांच्या पत्नी प्रमिला, राहुल पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला, सुरेश मुळीक यांच्या पत्नी आसावरी रिंगणात आहेत. मालगावमधून पंचायत समिती सदस्य अरुण राजमाने यांनी पुन्हा एकदा कमळाच्या साथीने मैदानात आव्हान निर्माण केले आहे. याशिवाय कपिल सदानंद कबाडगे, संगाप्पा अप्पासाहेब पाटोळे, सरपंच प्रशांत जयवंत माळी ही राजकीय मंडळी निवडणूक लढवत आहेत. पश्‍चिम भागात माजी सभापती अशोक मोहिते, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी यांच्या पत्नी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव नलवडे, स्वप्नी आनंदराव नलवडे, शीतल राजोबा, शिवाजी डोंगरे व त्यांच्या पत्नी विद्या, पंचायतीचे माजी सभापती अनिल आमटवणे, सदस्य सतीश वसंतराव नीळकंठ, निवास पाटील, भानुदास पाटील, सावळाराम सिंदकर, अनिल शेगुणशे ही "ब्रॅंडेड' मंडळी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. 

महिला आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड 
मिरज पूर्व भागात महिला आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला. दुधाची तहान ताकावर भागवताना सौभाग्यवतींना किंवा कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरवले. सर्रास ठिकाणी असेच चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com