ऊर भरून आणणारा ध्वज

ऊर भरून आणणारा ध्वज

कोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

सकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दुपारी अनावरणाचा कार्यक्रम झाला.

देशातील दुसऱ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच ध्वजाचे अनावरण आणि पोलिस उद्यान अर्थात ‘जनगान’ उद्यानाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्रदिनी त्यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. अभिनेता अक्षयकुमार याची हजेरी आणि त्याने केलेल्या मराठी भाषणाने कार्यक्रमांची उंची आणखी वाढली. 

या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित होते.

दुपारी तीन वाजता हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमार मेरी वेदर मैदानावर उतरले. तेथून ते थेट ध्वज अनावरणच्या ठिकाणी आले. पोलिस बॅंडच्या देशभक्तिपर गीतांच्या धूनने वातावरण मंगलमय झाले होते. दुपारच्या कडकडीत उन्हातही अभिनेता अक्षयकुमारला पाहण्यासाठी ‘जनगान’ उद्यानाच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमली होती. ध्वज अनावरणच्या ठिकाणी तिरंगा रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले. या वेळी दोन वेळा हेलिकॉप्टरमधून ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथे पोलिस बॅंडकडून राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली आणि अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत येथील कार्यक्रम संपविण्यात आला. 

‘मराठी तारका’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर असलेल्या मंडपातच मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. येथेही अक्षयकुमारच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अक्षयकुमार व्यासपीठावर येताच ‘भारत माता की जय...’, ‘जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा आणि शिट्यांनी मंडप दणाणून गेला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जीवनातील खरे हिरो आहेत. त्यांनी आज महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने देशाला एक उंच झेंडा दिला. हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. देश-विदेशातून अंबाबाईला येणारे पर्यटक आता ध्वज पाहण्यासाठी येतील. केवळ उद्यान म्हणून नव्हे, तर हे एक देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण आहे.’’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पोलिसांसाठी घर प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांनाही महात्मा जोतिबा फुले योजनेतून त्यांना उपचार दिले जातील. २४ तास काम करणाऱ्या पोलिसांच्या मागे आपण राहिले पाहिजे. त्यांनी मनात आणले तर ते काहीही करू शकतात. म्हणूनच आज आरोप सिद्धीचा दर ५८ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. त्यांच्यासाठी घर आणि आरोग्य सुविधा देणसाठी शासन कटिबद्ध आहे.’’

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापूर सुंदर बनविण्याचे काम आम्ही केएसबीपीच्या माध्यमातून करीत आहोत. लवकरच आठ हजार फुलपाखरांचे उद्यान कोल्हापुरात बनविण्याचा मानस असल्याचे सांगितले. अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापुरातून एका दिवसात परत जाणारे पर्यटक रेंगाळून ठेवण्यासाठी ३०३ फुटी ध्वज नक्कीच महत्त्वाचा ठरेल. 

महासंचालक सतीश माथूर यांनी कोल्हापूरकरांनी ३०३ फूट उंच ध्वज उभा करून अतुलनीय काम केले आहे, असे सांगितले.

प्रास्ताविक करताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ध्वज उभारणीची सुरवात आणि त्याची कल्पना याबाबत माहिती दिली. या वेळी पोलिस अधीक्षक महादेव तांबडे आणि नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते. पुणे जनता बॅंक, चाटे कोचिंग  क्‍लासेस, उद्योगपती संजय घोडावत यांनी पोलिस कल्याण निधीला मदत दिली. केएसबीपीचे अध्यक्ष सुजित पित्रे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. 

खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, संध्यादेवी कुपेकर, दत्तात्रय सावंत, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, माजी जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार आदी उपस्थित होते. चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

अक्षयकुमार...आणि ॲप...
अतिरेकी कसे घडविले जातात, याची माहिती बीबीसीवर दाखविली जात होती. एक अतिरेकी तयार करण्यासाठी त्यांच्या मागे मोठी ताकद उभा केली जाते. त्यांच्या कुटुंबीयांचा खर्च ते करतात. अनेक आमिषे दाखवतात. अतिरेक्‍यांसाठी एवढे केले जात असेल तर भारतीय जवानांसाठी कोण करणार? असा प्रश्‍न अक्षयकुमार यास पडला आणि त्यानंतर कोणीही भारतीय जवानांसाठी मदत करू शकेल, असे ‘भारत के वीर’ ॲप त्याने तयार केले आहे. म्हणूनच अक्षयकुमार हा संवेदनशील अभिनेता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

‘रिअल लाइफ’मध्येही हिरोच..
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना एक दिवस सर्वांत अधिक आयकर भरणाऱ्या अक्षयकुमारचा फोन आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्याने मला सांगितले. मी तातडीने कार्यक्रम घेऊन जाहीर करू, असे त्याला सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. मला फक्त मदत करायची आहे, असे त्याने सांगितले आणि माझ्या घरी येऊन त्याने ५० लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला, म्हणूनच तो ‘रिअल लाइफ’मध्येसुद्धा हिरो असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी शिट्या आणि भारत मातेचा जयघोष झाला.

उद्यानात तीन महिने मोफत प्रवेश
पोलिस उद्यान अर्थात ‘जनगान’ उद्यानाचा लोकार्पण सोहळा  झाला. सोहळ्यानंतर रात्री उशिरापर्यंत उद्यानात सेल्फी काढण्यासाठी गर्दी होती. पुढील तीन महिने उद्यानात मोफत प्रवेश असणार आहे. त्यानंतर प्रत्येकी दहा रुपये तिकीट असणार आहे. यातून जमणारा निधी पोलिस कल्याणासाठी वापरला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यासपीठावरूनच जाहीर केले.

शिल्पांबाबत सोशल मीडियावर चर्चा
पोलिस उद्यानातील नूतनीकरणात १८५७ ते १९४७ दरम्यानच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या महापुरुषांची शिल्पे आणि माहिती लावली आहे; मात्र त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिल्पे व माहिती का नाही, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com