अनधिकृत 376 धार्मिकस्थळांना देणार अंतिम नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

सोलापूर - महापालिकेच्या हद्दीतील 2009 पूर्वीच्या 376 अनधिकृत धार्मिकस्थळांनी बांधकाम नियमित करण्याबाबत अद्याप अर्ज दिलेले नाहीत. त्यांना याबाबत अंतिम नोटीस देण्यात येणार असून यावर उत्तर न आल्यास संबंधित धार्मिकस्थळे निष्कासीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपअभियंता शांताराम आवताडे यांनी दिली.

अनधिकृत धार्मिकस्थळे निष्कासित करण्याच्या मोहिमेतील पहिल्या टप्प्यात 2009 नंतरची अनधिकृत धार्मिकस्थळे पाडण्यासाठी 73 धार्मिकस्थळांची यादी करण्यात आली होती. यातील 56 पाडण्यात आली. उर्वरित 17 पैकी 14 धार्मिकस्थळांचा समावेश 2009 पूर्वीच्या यादीत करण्यात आला. दोन स्थळांबाबतचे निर्णय प्रलंबित असून एक धार्मिकस्थळ एका व्यक्तीच्या घरातच असल्यामुळे पाडण्यात आले नाही. 2009 पूर्वीची एक हजार 130 धार्मिकस्थळे नियमित करण्याच्या यादीत घेण्यात आली होती. यातील नियमितीकरणासाठी 754 अर्ज प्राप्त झाल्याने त्यांचे नियमितीकरण करण्यात आले आहे. उर्वरित 229 धार्मिकस्थळांची तपासणी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर जी धार्मिकस्थळे नियमित करता येण्यासारखी आहेत त्यांचा समावेश नियमितीकरणाच्या यादीत करण्यात येणार आहे.

एक हजार 130 पैकी 376 जणांनी अद्याप अद्याप नियमितीकरणासाठी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांना यापूर्वी नोटीस देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा एक नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. यावर उत्तर न आल्यास त्यांचा समावेश निष्कासीत करण्याच्या यादीत करून संबंधित धार्मिकस्थळे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. आवताडे म्हणाले.

Web Title: 376 final notice giving unauthorized religious place