सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 39 कोटींचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

बाजार समितीत 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत 14 समिती सदस्य, एक सचिव आणि 18 ऑक्‍टोबर 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत 20 समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2011 ते 2016 या कालावधीत 39 कोटी सहा लाख 39 हजार 193 हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदूमती अलगोंडा यांच्यासह 37 जणांवर मंगळवारी (ता. 22) रात्री जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला.
 
विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी सोमवारी जेलरोड पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी करून मंगळवारी रात्री उशिरा 37 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बाजार समितीत 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत 14 समिती सदस्य, एक सचिव आणि 18 ऑक्‍टोबर 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत 20 समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

हे आहेत संशयित आरोपी -
1 जानेवारी 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2011 या कालावधीतील गैरव्यवहार प्रकरणी सभापती इंदूमती अलगोंडा, उपसभापती बाळासाहेब शिंदे, सदस्य महादेव चाकोते, दिलीप माने, नागराज पाटील, शंकर येणगुरे, उर्मिला शिंदे, अविनाश मार्तंडे, रजाक निंबाळे, धोंडीराम गायकवाड, महादेव पाटील, अप्पासाहेब उंबरजे, प्रभाकर विभूते, दगडू जाधव, सचिव डी. व्ही. कमलापुरे हे संशयित आरोपी आहेत. 18 ऑक्‍टोबर 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी सभापती दिलीप माने, उपसभापती राजशेखर शिवदारे, सदस्य केदार विभूते, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजन पाटील, इंदूमती अलगोंडा, शांताबाई होनमुर्गीकर, उत्तरेश्‍वर भुट्टे, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, चंद्रकांत खुपसंगे, नसीरअहमद खालिफा, बसवराज दुलंगे, हकीम महदम शेख, सिद्रामप्पा यारगले, सचिव डी. व्ही. कमलापूरे, प्रभारी सचिव यु. आर. दळवी हे संशयित आरोपी आहेत. 

हे आहेत आरोप -
बाजार समितीच्या रकमा मुदत ठेव म्हणून ठेवताना फायदा होईल अशाप्रकारे गुंतवणूक केल्या नाहीत, बाजार समितीमधील बांधकाम मुदतीमध्ये न करणाऱ्या ठेकेदाराला दंड केला नाही, सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी बाजार समितीमध्ये शिपाई, लिपिक व अन्य कर्मचारी नियुक्त करता येत नसतानाही नियुक्ती केली आहे यासह 14 मुद्दांचा फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

आमचा कार्यकाळ संपून आता दीड वर्ष झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी केलेले हे राजकीय कारस्थान आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू. 
- दिलीप माने, माजी सभापती

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 39 crore fraud in Solapur Agricultural Produce Market Committee