महावीर गार्डनजवळील 50 केबिनवर हातोडा 

महावीर गार्डनजवळील 50 केबिनवर हातोडा 

कोल्हापूर - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग राजारामपुरी व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाने महावीर गार्डनशेजारील अतिक्रमणे हटविली. एकाला लागून एक, अशी केबिन्सची संख्या येथे वाढत चालली होती. आज दिवसभरात सुमारे 50 हून अधिक केबिनवर कारवाई करून ती हटवण्यात आली. या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला; पण हा विरोध मोडून काढत कारवाई करण्यात आली. दिवसभर ही कारवाई सुरू होती. 

शहरातील मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. मध्यंतरी सीपीआर हॉस्पिटलसमोरील केबिन्सचा विषय गाजत होता. त्यानंतर येथील अतिक्रमणेही महापालिकेने हटविली. त्याचबरोबर महावीर उद्यानासमोरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत होती. पूर्वी अगदी दोन-चार केबिन्स येथे दिसत होती. आता मात्र संपूर्ण उद्यानाला केबिन्सनी विळखा घातल्यासारखी परिस्थिती होती. दररोज येथे केबिन्स वाढतच होती. केबिन एकाची, व्यवसाय दुसऱ्याचा, परवाना पानपट्टीचा आणि सुरू आहे चायनीजची गाडी, असे प्रकार येथे दिसून आल्याने महापालिकेने येथे कारवाई करायचा निर्णय घेतला. 

गुरुवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजारामपुरी आणि ताराराणी मार्केटचे अधिकारी, कर्मचारी येथे आले. त्याचबरोबर जेसीबी, डंपर आदी यंत्रणाही येथे आली होती. महावीर उद्यानालगतच्या अनधिकृत टपऱ्या हटवायला सुरवात करताच फेरीवाल्यांनी कडाडून विरोध केला. येथेच कारवाई का? परवानाधारक केबिन्सही का हटवता? असे मुद्दे उपस्थित करत कारवाईला विरोध केला. स्थानिक फेरीवाल्यांसोबतच फेरीवाले संघटनेचे दिलीप पोवारही तेथे आले. त्यांनीही कारवाईला विरोध केला. हर्षजित घाटगे, महादेव फुल्लारी, एन. एस. पाटील आदी अधिकाऱ्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केला. पण फेरीवाले आक्रमक होते. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपायुक्त विजय खोराटे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले आदींनी महावीर उद्यानाजवळ जाऊन लोकांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा कारवाईला सुरवात झाली. 

मंजूर परवान्यापेक्षा जादा आकाराचे केबिन टाकणे, व्यवसाय परवाना एकाचा आणि व्यवसाय दुसऱ्याचाच असणे, तसेच हातगाडी व ढकलगाडीऐवजी फिक्‍स केबिन असणे अशा प्रकारच्या केबिन्सवर कारवाई करण्यात आली. गुरुवारी अचानक कारवाईला सुरवात झाल्यामुळे फेरीवाल्यांना आपले साहित्य स्थलांतरित करताना मोठा त्रास झाला. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी साहित्याचे नुकसान नको, लवकर काढून घ्या, अशी संधीही दिली. पण कारवाई मात्र होणारच, असे स्पष्टपणे सांगितले. दिवसभरात महावीर उद्यानशेजारची सुमारे 50 हून अधिक केबिन्स महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली. 


वीज कनेक्‍शन नकोच 
अनेक विनापरवाना केबिन्सला महावितरण कंपनीने वीज कनेक्‍शन जोडणी दिली आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन कारवाईत अडथळे येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे महावितरण कंपनीने केबिन्सधारकांना वीज कनेक्‍शन देताना महापालिकेचा ना हरकत दाखला घ्यायला हवा. परवानाधारक केबिन्सलाच वीज जोडणी द्यावी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com