गुणवत्तेमुळे विद्यापीठाची राज्यात ओळख 

गुणवत्तेमुळे विद्यापीठाची राज्यात ओळख 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन व दर्जेदार शिक्षणातून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या "बेटी बचाओ' अभियानासाठी ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून कुस्तीपटू रेश्‍मा माने हिच्या नावाची घोषणा केली. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. 

डॉ. वंजारी म्हणाल्या, "कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाचा पाया रचला. त्यानंतरच्या कुलगुरूंनी विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनीही विविध उपक्रमांतून विद्यापीठाचा लौकिक वाढविण्यावर भर दिला आहे. सामाजिक बांधिलकी, कर्तव्याची जाण व सारासार विवेक या त्रिसूत्रीतून हे घडत गेले आहे.'' त्या म्हणाल्या, "मानवता, सहिष्णुता, सत्यान्वेषण व कारणमीमांसा ही मूल्ये विद्यार्थ्यांत रुजावीत, अशी अपेक्षा पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना होती. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची ही राष्ट्रीय उद्दिष्टेच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नाहीत. आजच्या काळात ती अधिकच अधोरेखित झालेली आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी युवकांना ज्ञान व देण्यातला आनंद शिकविला आहे. राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे महत्त्व पटवून दिले आहे.'' 

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठामार्फत बेटी बचाओ अभियानासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद करणारे हे एकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या "बेटी बचाओ' अभियानासाठी कुस्तीपटू रेश्‍मा माने हिची ब्रॅंड ऍम्बॅसडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर रेश्‍माला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात कुलगुरूंच्या या घोषणेचे स्वागत केले. डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. आता विद्यार्थी ग्रामीणतेचा शिक्का पुसून ग्लोबल होण्याकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. 

या प्रसंगी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र तसेच एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या "माध्यमविद्या' व "मीडिया स्पेक्‍ट्रम' या प्रायोगिक अनियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी डॉ. शिंदे यांना वॉक्‍हार्ट फाऊंडेशनचा प्रभावी कुलगुरू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला. तत्पूर्वी, सकाळी कुलगुरू डॉ. वंजारी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाने प्रभावी सादरीकरण केले. सांगली जिल्हा एन.एस.एस. समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी पथकाचे नियोजन केले. बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व पसायदान सादर केले. या प्रसंगी नूतन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. 

पोवाडा ऐकून रोमांच 

विद्यापीठाच्या गतवर्षीच्या 53 व्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. देशमुख हे विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचा इतिहास व लौकिक ऐकून भारावून गेले होते. त्यातून त्यांनी विद्यापीठाचा पोवाडाच तयार केला. हा पोवाडा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांकरवी संगीतबद्ध करवून घेऊन यंदाच्या 54 व्या वर्धापन दिन समारंभासाठी आवर्जून पाठवून दिला. पोवाड्याची सीडी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पोवाडा संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात डॉ. देशमुख यांचे अभिनंदन केले. 

गजानन चव्हाण यांचे पोस्टर प्रदर्शन 

प्रशासकीय सेवक गजानन चव्हाण यांनी विद्यापीठातील विविध घडामोडींविषयी, सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांविषयीचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविले होते. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही कुलगुरूंसह उपस्थितांनी कौतुक केले. 

महिला सन्मान दिन 

विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रॅंड ऍम्बॅसडर म्हणून रेश्‍मा माने हिची निवड जाहीर केल्यानंतर आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांसह पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची संख्या पाहता विद्यापीठाचा आजचा वर्धापन दिन हा "महिला सन्मान दिन' म्हणूनच साजरा होत असल्याची भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com