महाबळेश्‍वरात 70 शाळा शिक्षकांअभावी बंद

रविकांत बेलोशे
बुधवार, 30 मे 2018

भिलार - शासनाच्या शिक्षक बदली प्रक्रियेचा फटका महाबळेश्वर तालुक्‍यातील शाळांना बसला असून, तालुक्‍यातील १२९ पैकी सुमारे ७० शाळा शिक्षकांच्या उपस्थितीविना कुलूपबंद झाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान सुरू आहे. या गावांतील विद्यार्थी शाळेत जाऊन घंटा वाजवून पुन्हा घरी परतत आहेत. या नुकसानीस जबाबदार कोण? शिक्षण विभागाने बंद असणाऱ्या शाळांना तातडीने शिक्षक हजर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी होत आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यात वाड्यावस्त्यांवर मिळून एकूण १२९ प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असून, बरीचशी गावे जलाशयापालीकडे, डोंगरमाथ्यावर, डोंगरकपारीत तर काही जंगलात वसली आहेत. अतिदुर्गम परिसर आणि दळणवळणाच्या गंभीर समस्येमुळे या परिसरात बहुतांशी शिक्षक जाण्यास धजावत नसून, त्यामुळे बालकांच्या शिक्षणाची आबाळ सुरू आहे.

नवीन शिक्षकांची पाठ
सध्या शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांचा घाट घातला आहे. सुगम आणि दुर्गम या दोन गटांची सांगड घालून ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन बदली झाली आहे, त्यांनी त्या शाळेत तातडीने हजर व्हावे, असा फतवाच शिक्षण विभागाने काढल्याने दुर्गम विभागातील शिक्षकांना सुगम व सोयीच्या ठिकाणी बदली मिळाल्याने ते शिक्षक तातडीने मिळालेल्या शाळेवर हजर झाले. त्यामुळे तालुक्‍यातील सुमारे ७० टक्के शिक्षकांअभावी शाळा ओस पडल्या आहेत. परिणामी त्या शाळेत नवे शिक्षक अद्यापही हजर न झाल्याने या साऱ्या शाळा आता बंद आहेत. गावातील विद्यार्थी शाळेत जाऊन घंटा वाजवून वाजवून पुन्हा घरी परतत आहेत. शाळांमध्ये नवीन शिक्षक हजर होण्यापूर्वी जुन्या शिक्षकांना सोडून शाळा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णयही पूर्णपणे चुकीचा असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. तद्वत शालेय पोषण आहारापासूनही हे विद्यार्थी वंचित राहात आहेत. 

15 जूनपासून सुटी 
महाबळेश्वर तालुका हा अतिपावसाचा असल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात शाळांना उन्हाळी सुट्या असल्या तरी महाबळेश्वर तालुक्‍यात उन्हाळ्यात शाळा सुरू असतात. त्यांना पावसाळ्यात म्हणजे १५ जूनला सुटी लागते. त्यामुळे आता या शाळा शिक्षकांअभावी बंद झाल्या आहेत. रिक्त जागांमुळे बंद असलेल्या शाळांवर तातडीने शिक्षक नेमून शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी तालुक्‍यातील पालक व नागरिकांनी केली आहे. 

दुर्गम विभाग म्हणून आमच्याकडे सेवा करण्यासाठी शासकीय कोणताही विभाग सकारात्मक पाहत नाही. आता तर आमच्या मुलाबाळांचे भविष्यही शिक्षण विभागाने अडचणीत आणले आहे. नवीन शिक्षक नेमणुकीआधीच जुन्या शिक्षकांना सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे आमच्या 
मुलांचे अतोनात नुकसान होत आहे.
-रामचंद्र पडगे, पालक

Web Title: 70 schools closed for lack of teachers in Mahabaleshwar