'सकाळ'च्या 'कास महास्वच्छता' अभियानात दोन तासांत 750 पोती प्लॅस्टिक जमा

750 plastic bags deposited in two hours in Sakals Kaas campaign
750 plastic bags deposited in two hours in Sakals Kaas campaign

सातारा : मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुमारे 750 पोती प्लॅस्टिक कचरा अवघ्या दोन तासांत गोळा झाला. या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते व सातारचे सुपूत्र सयाजी शिंदे उपस्थित होते. निमित्त होते 'सकाळ'च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानाचे ! 

कास तलाव परिसरात "सकाळ'ने लोकसहभागातून जानेवारीपासून कास स्वच्छता मोहीम राबविली. गेल्या चार महिन्यांत हजारो नागरिकांनी कित्येक टन प्लॅस्टिक कचरा पिण्याच्या पाण्यात जाण्यावाचून वाचवला आहे. या मोहिमेंतर्गत आज सातारा ते कास या सुमारे 25 किलोमीटर अंतरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले.

नियोजनानुसार अभियानात सहभागी झालेले नागरिक सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेमलेल्या ठिकाणांवर हजर झाले. उगवत्या सूर्याच्या साक्षीने त्यांनी रस्त्यावर प्लॅस्टिक़ वेचण्यास सुरवात केली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्त काम सुरू केले. सातारा मॅरेथॉन फाउंडेशनच्या सुमारे 400 धावपटूंनी बोगद्यापासून प्रकृती रिसॉर्टपर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटर अंतरातील प्लॅस्टिक वेचले.

काही नागरिक सहकुटुंब या अभियानात सहभागी झाले होते. शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या. गणेशखिंड, यवतेश्‍वर पठार परिसरातील कचरा त्यांनी वेचला. मित्रमंडळाशिवाय काही ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप, योगा ग्रुपही सहभागी झाले होते. कास रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच महिलांचाही श्रमदानात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. 

गाडीतून बाहेर भिरकावल्या जाणाऱ्या कचऱ्याबरोबरच यवतेश्‍वर पठार, तसेच याच प्रकारच्या काही ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे वेस्टन, द्रोण व पत्रावळ्या, पाण्याचे प्लॅस्टिक ग्लास, प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्या, सिगारेट व गुटख्याची पाकिटे, बडीशेप व चॉकलेटचे कागद, लहान मुलांचे डायपर, कॅरिबॅग, प्लॅस्टिक चमचे आदी प्रकारचे प्लॅस्टिक कासपर्यंतच्या मार्गात पसरले होते. नागरिकांनी सोबतच्या पिशव्या व पोत्यांमध्ये गोळा केलेले प्लॅस्टिक भरले. नंतर या पिशव्या नगरपालिकेच्या वाहनातून गोळा करण्यात आल्या.

श्रमदानात सहभागी झालेले काही ग्रुप कास तलावाजवळील कामात गुंतले होते. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच काही तरुण मंडळांचे कार्यकर्ते हातात पोती घेऊन तलावाशेजारच्या घनदाट झाडीतील कचरा वेचत होते. सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान महास्वच्छता मोहीम थांबविण्यात आली. अभियानात सक्रिय योगदान देणारे नागरिक व संस्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात सयाजी शिंदे यांच्या हस्ते रोप देऊन गौरव करण्यात आला. 

जैन सोशल ग्रुपच्या महिला सदस्यांनी स्वच्छता विषयक सादर केलेल्या जागृतीपर कार्यक्रमास उपस्थितांची दाद मिळाली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, वनक्षेत्रपाल महेश पाटील, नगरसेवक सागर पावसे, "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर व नागरिक उपस्थित होते. 

सातारा-कास रस्ता तसेच कास तलाव परिसरातून आज अवघ्या दोन तासांत 750 पोती प्लॅस्टिक कचरा गोळा झाला. पालिकेच्या "टीपर' या गाडीला सातारा-कास अशा तीन फेऱ्या माराव्या लागल्या तरीही गोळा केलेला कचरा हटला नाही. 

श्रमदानात सहभागी संस्था-ग्रुप 

सातारा वन विभाग, कास कार्यकारी समिती, कास ग्रामस्थ, मॅरेथॉन फाउंडेशन, बंधन बॅंक कर्मचारी वृंद, भारत भोसले परिवार, शाहूपुरी माध्यमिक विद्यालय तसेच आजी-माजी विद्यार्थी, शाहूपुरी विकास आघाडीचे कार्यकर्ते, सिनर्जी नॅचरल योगा ग्रुप, गोलबाग मित्रमंडळ, रानवाटा निसर्ग मंडळ, हेरिटेजवाडी ग्रुप, मन:शक्ती ग्रुप, सातारा केमिस्ट असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, संस्कृती प्रतिष्ठान, सातारा परिसरातील तनिष्का गटाच्या सदस्या, स्पंदन ग्रुप, होमिओपॅथिक प्रसार संस्था, वात्सल्य फाउंडेशन, एन बी. फिटनेस ग्रुप, एक टप्पा ग्रुप, साईप्रसाद पालकर मित्रमंडळ, निवृत्त सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटना. 

...यांच्यामुळे मोहिमेला मिळाले बळ 

गेल्या चार महिन्यांपासून कासची स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामध्ये सहभागी नागरिकांना मार्गदर्शन व पदरमोड करून उपक्रम राबविण्यात साताऱ्यातील काही पर्यावरणप्रेमी सजग कार्यकर्ते अग्रभागी आहेत. 

त्यांच्यामुळेच ही मोहीम सातारकरांच्या घरात व मनात पोचली. यामध्ये कन्हैयालाल राजपुरोहित, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, पंकज नागोरी, सुधीर सुकाळे, विशाल देशपांडे, डॉ. संदीप काटे, डॉ. दीपक निकम, निखिल वाघ, विजयकुमार निंबाळकर, प्रा. शेखर मोहिते, रवींद्र सासवडे, सुधीर चव्हाण, कैलास बागल आदींनी सहभाग दिला. 

"आपल्याला कासच्या रूपाने जैवविविधतेचे वैभव लाभले आहे. प्लॅस्टिक व कचऱ्यामुळे येथील दुर्मिळ निसर्गाला हानी पोचत आहे. प्लॅस्टिक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू असणारी मोहीम महत्त्वाची आहे.

माणूसच कचरा करतो आणि माणूसच स्वच्छता करतोय, हे चित्र इथे दिसले. सातारकरांनी आज मोहिमेतून प्लॅस्टिकमुक्तीसाठी दिलेले योगदान भविष्यासाठी मोलाचे ठरेल. निसर्ग संवर्धित करण्यासाठी अशीच एकजूट दाखवूया.'' 

-सयाजी शिंदे, अभिनेते 

"जागतिक वारसा लाभलेल्या कास परिसराच्या जतनासाठी वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जरूर ते प्रयत्न सुरू आहेत. यापुढील काळातही ते होत राहतील. "सकाळ'च्या पुढाकारातून या मोहिमेतून जागृती झाली आहे. या परिसरातील स्वच्छता पाहिल्यावर आणि श्रमदानात सहभागी होणारे लोक पाहिल्यावर त्याची प्रचिती येते. यापुढेही कचरा होऊ नये, या दिशेने मोहीम जायला हवी. त्यासाठी प्लॅस्टिक ताटांऐवजी स्टीलची भांडी वापरण्याबाबत केलेली कृतिशील जागृती महत्त्वाची ठरेल.'' 
 

- अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक, सातारा 

"जिल्हा परिषद या मोहिमेसाठी योग्य ती मदत करेल. परिसरातील हॉटेल, रिसॉर्टना योग्य सूचना दिल्या जातील. हॉटेलच्या परिसरातील दोनशे मीटरपर्यंत स्वच्छतेची जबाबदारी त्यांना देण्यात येईल. आठवड्यातून कचरा संकलित करण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात येईल.'' 

- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com