सोलापुरात मद्यविक्रीत आठ लाख लिटरची घट

प्रमोद बोडके
शनिवार, 13 मे 2017

पाचशे मीटरच्या आदेशाचा परिणाम : बिअरविक्रीत मोठी घट

पाचशे मीटरच्या आदेशाचा परिणाम : बिअरविक्रीत मोठी घट
सोलापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून पाचशे मीटरच्या आतील देशी, विदेशी मद्यविक्री व बिअरची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दारूविक्रीत कमालीची घट झाली आहे. एप्रिल 2016 च्या तुलनेत एप्रिल 2017 मधील जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य व बिअरच्या विक्रीत 8 लाख 36 हजार 280 लिटरची घट झाली आहे, त्यामुळे दारूबंदी व व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आपोआपच हातभार लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 895 देशी, विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बिअरशॉपी, बिअरबार आणि परमीट रूमपैकी सध्या फक्त 254 ठिकाणीच विक्री सुरू आहे. पिणाऱ्यांची संख्या अधिक आणि दारू मिळण्याची ठिकाणे कमी असल्याने वाइन शॉप, बिअरशॉपी, परमीट रूम आणि बिअरबार सध्या "हाउसफुल' झाले आहेत. ज्यांची दुकाने सुरू आहेत, त्यांच्यासाठी सध्याचा काळ हा सुगीचा काळ आला आहे. संपूर्ण माळशिरस तालुक्‍यात फक्त एकच वाइनशॉप सुरू असल्याने या ठिकाणी मद्य खरेदीसाठी शेजारच्या पुणे व सातारा जिल्ह्यातीलही मद्यशौकीन येत आहेत.

उन्हाळ्यात देशी व विदेशी मद्यापेक्षा बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. यंदा तर अंगाची काहिली करणारे ऊन असतानाही बिअरच्या विक्रीत सर्वाधिक 4 लाख 49 हजार 321 लिटरची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पन्नास टक्के घट झाली आहे. विदेशी मद्याच्या विक्रीत 1 लाख 63 हजार 928 लिटरची (गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत 36 टक्के) घट झाली आहे. देशी मद्यात 2 लाख 23 हजार 31 लिटरची (गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत 31 टक्के) घट झाली आहे.

मद्यविक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कार्यवाही केली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील 895 पैकी फक्त 524 ठिकाणी देशी, विदेशी मद्य व बिअरविक्री सुरू आहे. सील केलेल्या दुकानांतील मद्याची चोरून विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग दक्ष आहे. याबाबत कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा.
- सागर धोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर

आकडे बोलतात...
दारूचा प्रकार एप्रिल 2016 मधील विक्री एप्रिल 2017 मधील विक्री (आकडेवारी लिटरमध्ये)
देशी 7 लाख 16 हजार 269 4 लाख 93 हजार 238
विदेशी 4 लाख 51 हजार 769 2 लाख 87 हजार 841
बिअर 9 लाख 1 हजार 14 4 लाख 51 हजार 693