पोलिसांसाठी 800 घरांचा प्रकल्प

परशुराम कोकणे 
बुधवार, 30 मे 2018

सोलापूर : पोलिस वसाहतीमध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या घरात दिवस काढणाऱ्या पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलिस मुख्यालयातील जागेत सात मजली इमारत उभारण्यात येणार आहे. जवळपास 300 कोटींच्या या प्रकल्पात पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

सोलापूर : पोलिस वसाहतीमध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या घरात दिवस काढणाऱ्या पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलिस मुख्यालयातील जागेत सात मजली इमारत उभारण्यात येणार आहे. जवळपास 300 कोटींच्या या प्रकल्पात पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

शहरात पोलिस मुख्यालय, किल्ला पोलिस लाइन, वसंतनगर, कवितानगर, शामानगर, अरविंदधाम या ठिकाणी पोलिसांच्या वसाहती आहेत. अरविंदधाम वगळता इतर ठिकाणच्या वसाहतींमधील अनेक घरे मोडकळीस आली आहेत. अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, मोकाट जनावरांचा त्रास यामुळे पोलिस कुटुंबीय वैतागले आहेत. राहण्यायोग्य उत्तम घरे नसल्याने अनेक पोलिस बाहेर भाड्याने राहत आहेत. पोलिस मुख्यालयात 800 घरांचा प्रकल्प उभारण्याबाबत पोलिस महासंचालकांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 513 घरे बांधून पूर्ण होतील. उर्वरित घरे दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होतील. सात मजली इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा असेल. पोलिस मुख्यालयासोबत फौजदार चावडी पोलिस ठाणे परिसरात किल्ला पोलिस लाइनमध्ये 200 घरांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. 
 

  • पोलिस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र इमारत 

सदर बझार पोलिस ठाणे परिसरात असलेल्या जागेत सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीही इमारतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात येतील. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी नव्याने स्वतंत्र बंगले प्रस्तावित आहेत.

पोलिस वसाहतीचा प्रश्‍न लवकर सुटणार आहे. जुन्या पोलिस मुख्यालयात नव्याने बांधकाम करून उत्तम वसाहत करण्यात येईल. याठिकाणी अरविंदधाम पोलिस वसाहतीप्रमाणे सुविधा असतील. लवकरात लवकर या कामाला सुरवात होणार आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. - महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 

पोलिस मुख्यालयातील अनेक घरे मोडकळीस आली आहेत. पावसाळ्यात चिखल होतो, अनेक घरांमध्ये पाणीही शिरते. पोलिसांसाठी नवीन इमारत होणार असल्याचे कळाले आहे. या कामाला लवकर सुरवात व्हावी. 
- सचिन गिराम, पोलिस कुटुंबीय

Web Title: 800 homes project for police