प्राथमिक शाळेची इमारत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

आजरा - वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हाळोली येथील प्राथमिक शाळेची इमारत आज पहाटे साडेपाच वाजता कोसळली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ जागे झाले. भूकंपाच्या भीतीने अनेक जण घराबाहेर आले, त्या वेळी त्यांना शाळेची इमारत पडल्याचे दिसले.

इमारत साठच्या दशकातील असून, दोन खोल्यांची आहे. इमारतीमध्ये चौथीपर्यंत वर्ग भरतात. धोकादायक अवस्थेत असतानादेखील वर्ग भरत होते. यंदा मात्र इमारतीमध्ये शाळा भरवू नका, अशी सूचना शिक्षण विभागाने दिल्याने महिनाभरापूर्वी वर्ग दुसरीकडे हलवले. ही इमारत निर्लेखनासाठी प्रस्तावित आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट न झाल्याने व अन्य तांत्रिक अडचणीमुळे या इमारतीबाबत पुढे कार्यवाही रखडली असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

१३ इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत 
शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव व धोकादायक इमारतींबाबत पंचायत समितीच्या बैठकीत चर्चा झडली. याबाबत शासन व प्रशासनाकडून हालचाल दिसत नाही. तालुक्‍यातील १३ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.