आषाढीतील स्वच्छता, पाण्यासाठी पाच कोटी - बबनराव लोणीकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

पंढरपूर - राज्यात येत्या तीन वर्षांत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पंढरपूरच्या आषाढी यात्रेतील स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे दिली.

आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील संत नामदेव पायरीपासून शहर व चंद्रभागा नदी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी मंत्र्यांनी हातात झाडू घेऊन नामदेव पायरीचा परिसर स्वच्छ केला. लोणीकर म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतूनच "नमामि चंद्रभागे‘चा प्रकल्प पुढे आला आहे. संपूर्ण विश्‍वाला एकात्मतेचा संदेश देणाऱ्या आषाढी पायी पालखी सोहळ्यात या वर्षी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच पंढरीतदेखील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

पंढरपूरमधील स्वच्छता राखण्यासाठी शहरातील नागरिकांचादेखील सहभाग महत्त्वाचा राहणार असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

64 लाख कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील पाच हजार गावे हागणदारीमुक्त केली आहेत. तरीही ग्रामीण भागातील 56 लाख, तर शहरातील आठ लाख कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे या लोकांची कुचंबणा होत आहे. येत्या तीन वर्षांत शासनाच्या वतीने या कुटुंबांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.