आटपाडीत सात मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सांगली - आटपाडी येथे सात मेगावॉट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीवर  शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पासाठी लागणारी ३८ हेक्‍टर जागा महानिर्मितीकडे हस्तांतरित करा, अशा मागणीचे पत्र महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना पाठवले आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना  माफक दरात व सोयीनुसार वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आटपाडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी जागेची पाहणी झाली होती. शासनाकडे सध्या २४ हेक्‍टर जागा उपलब्ध आहे. अजून १४ हेक्‍टर जागा लागणार आहे. ती शेतकऱ्यांकडून भाडेकरारावर घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू करून ३८ हेक्‍टर क्षेत्र महानिर्मितीकडे द्यायचे आहे. पैकी शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. शासकीय जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्टयाने द्यायची आहे. त्यासाठी एक रुपया नाममात्र भाडे असेल. आता शेतकऱ्यांकडून उर्वरित  जमीन भाडेपट्टयाने घेण्यात येईल. त्याचा भाडेपट्टा बाजार दराप्रमाणे आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

आटपाडी येथे वीज उपकेंद्रालगतची २६०५ गटक्रमांकाची जमीन यासाठी दिली जाणार आहे. यानिमित्ताने दुष्काळी टापूत मोठा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याची वीज टेंभू योजनेसाठी वापरणे शक्‍य होणार आहे. कृषी पंपांना आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठा होईल.