दुनियामे कितना गम है मेरा कितना कम है ! 

अभय दिवाणजी
शनिवार, 25 मार्च 2017

माझे दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. त्यावर मात करण्यासाठी जयपूर फूटचा मोठा उपयोग होतो. मी तयार करीत असलेल्या फूटमुळे लाखो लोकांना चालता येऊ लागले आहे, याचे मोठे समाधान वाटते. 
- रामनारायण जलावाद, जयपूर 

सोलापूर - स्वतः दोन्ही पायांनी अपंग... परंतु ज्यांना पाय नाहीत, अशांसाठी जयपूर फूटच्या निर्मितीत ज्याचे हात लागत आहेत, असा रामनारायण जलावाद (रा. जयपूर) हा गेल्या 35 वर्षांपासून आपले काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करत आहे. एका दिवसात सहकाऱ्यांच्या मदतीने शंभर-दीडशे फूटच्या निर्मितीनंतरच त्यांना समाधान मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून "दुनियामे कितना गम है, मेरा कितना कम है' या पंक्तीचाच प्रत्यय येतो. 

सोलापुरातील नीलमनगर परिसरात असलेल्या लोकमंगल जीवक हॉस्पिटलमध्ये 18 मार्चपासून आरोग्य शिबिर सुरू आहे. या शिबिरात अपंगांना जयपूर फूट, कॅलिपर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, कुबड्यांचे वाटप सुरू आहे. भारतीय साधारण विमा योजनेच्या सीएसआरमधून लोकमंगल फाऊंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी मुंबईच्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे सहकार्य लाभले आहे. दररोज शेकड्याने येणाऱ्या अपंगातील काहींना अक्षरशः उचलून आणावे लागते. परतताना मात्र ते आपल्या पायावर चालत जातात. या शिबिरात येणाऱ्या अपंगांना लागणाऱ्या जयपूर फूटची निर्मिती येथेच केली जाते. 

यासाठी जयपूरमधील रामनारायण जलावाद (वय 63) हे आपले योगदान देत आहेत. जयपूर फूट कच्च्या स्वरुपात तयार झाला की त्याला मूर्त स्वरुप देण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. अगदी पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या रामनारायण यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाक्‍याची... त्यामुळे गावात जमा झालेले शेण मोठ्या वाहनात भरण्याचे काम त्यांच्याकडे होते. लहान कोवळ्या वयात हे काम करताना त्यांच्या दोन्ही पायाला जखमा झाल्या. त्यांनी व कुटुंबियांनी त्याकडे लक्षच दिले नाही. त्यातून पायाला "सेप्टीक' झाले. पाय काळे पडू लागल्याने त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापावे लागले. याचे त्यांना अतीव दुःख झाले. त्यांच्या मनात आपल्या अपंगत्वाबद्दल घृणा वाटली. त्यातून मार्ग काढायचा त्यांनी ठरविले. त्यानुसार त्यांनी भगवान महावीर विकलांग सहायता समिती गाठली. त्याठिकाणी त्यांना जयपूर फूट बसविण्यात आले. दोन्ही पाय नसतानाही या कृत्रिम पायामुळे आपल्याला चालता येत असल्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला. अगदी स्वर्ग दोन बोटे उरल्याची भावना झाली. आपल्याला झालेले दुःख, आपल्यावर आलेली वेळ इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी त्या दिवसापासूनच "पण' केला अन्‌ ते कामाला लागले. त्यांनी जयपूर फूट निर्मितीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतले. आपण तयार केलेला जयपूर फूट घालून अपंगत्वावर मात करीत चालत जाणारी व्यक्ती पाहिल्यावर ते मनोमन सुखावतात. 

माझे दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. त्यावर मात करण्यासाठी जयपूर फूटचा मोठा उपयोग होतो. मी तयार करीत असलेल्या फूटमुळे लाखो लोकांना चालता येऊ लागले आहे, याचे मोठे समाधान वाटते. 
- रामनारायण जलावाद, जयपूर