शेतमजुरांना कायद्यानुसार किमान वेतन मिळावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - शेतमजुरांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनांची कामे शेतमजुरांना मिळावीत या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शेतमजूर युनियनने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. निदर्शनासाठी आलेल्या शेकडो महिलांनी लाल साडी परिधान करून केलेल्या आंदोलनाने शहराचे लक्ष वेधले. 

जिल्ह्यातील शेतमजुरांच्या मागण्यांबाबत संघटनेच्यावतीने वेळोवेळी निवेदन व निदर्शने, मोर्चे काढले आहे. याशिवाय प्रत्यक्ष चर्चा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतमजुरांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गोरगरिबांना मोठा फटका बसला आहे. शेतीची कामे मिळणे दुरापास्त झाले आहे. शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे. त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेच्यावतीने शेतमजुरांनी धरणे आंदोलन केली. या वेळी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून शेतमजुरांना किमान वेतन मिळावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे शेतमजुरांना मिळावीत, बेघरांना घरकुल आणि घरकुलासाठी जागा मिळाली पाहिजे, साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, शेतमजुरांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा व साहित्य मोफत मिळाले पाहिजे, शेतमजूर महिलांना आर्थिक साहाय्य मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी अध्यक्षा सुशीला यादव, दिलीप पवार, मिलिंद यादव, सुनीता वाघवेकर, कमल नाईक, माया जाधव, वैशाली तांदळे, शोभा नवले, शोभा पाटील, लीला नागावे, मेहराजबी मोमीन, मेघा चव्हाण, सुषमा हराले, दीपाली पाटील, सरिता कांबळे, मंगल हांडे उपस्थित होत्या.